मालेगाव : शहराजवळील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लाॅन्सच्या कार्यालयात सकाळी साडेसातच्या सुमारास शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने दोन तासानंतर बेशुध्द करत जेरबंद केले. लॉन्सच्या कार्यालयात बसलेल्या चिमुकल्या मोहित विजय आहिरे (वय १२) याच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या (Leopard) जेरबंद झाला.
अन्यथा हा बिबट्या शहरातील मानवी वस्तीत शिरला असता तर अनर्थ होवून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला असता. गेल्या एक महिन्यापासून या भागातील वडगाव, लेंडाणे, कुकाणे, वजीरखेडे परिसरात वावरणारा बिबट्या सहजासहजी जेरबंद झाल्याने मोहीतच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Nashik Leopard rescued by forest department in malegaon marathi news)
शहराजवळील शेत वस्तीतील बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात मंगळवारी (ता. ५) सकाळी सातच्या सुमारास संकेत गार्डन या रहिवासी परिसरात दिसून आला. त्याचवेळी परिसरातील रहिवशांमध्ये बिबट्या आल्याची चर्चा सुरु झाली. याच भागातून फिरत बिबट्या नजीकच्या साई सेलिब्रेशन लॉन्समधील कार्यालयात घुसला.
त्यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील कॉटवर मोहीत बसलेला होता. त्याच्या जवळूनच बिबट्या कार्यालयात घुसला. बिबट्याचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. मोहित बिबट्याला पाहताच थोडा बिथरला. कॉटवरुन तातडीने उतरत त्याने प्रसंगावधान राखून कार्यालयाचा दरवाजा बंद केला.
कार्यालयात एका बाजुला बिबट्या निवांत पहुडला होता. घरी धाव घेत मोहितने वडील विजय आहिरे व कुटुंबियांना ही माहिती दिली. बिबट्याची आवई ऐकूण बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने जमले होते. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता.
वन अधिकारी वैभव हिरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने नाशिक येथे माहिती कळविली. वन विभागाचे नाशिक येथील बचाव पथक साडेदहाच्या सुमारास येथे दाखल झाले. या पथकाने कार्यालयाची खिडकी उघडून बिबट्याची पाहणी केली.
यानंतर खिडकीतून ब्लो पाईपने डॉट देत बिबट्याला बेशुध्द केले. तत्पुर्वी बिबट्याने खिडकीवर पंजा मारत काच फोडली. दोन तास हे रेसक्यु ऑपरेशन सुरु होते. यानंतर वन विभागाने रेसक्यु करुन विशेष वाहनातून बिबट्याला वन विभागाच्या कार्यालयात आणले. (Latest Marathi News)
कुकाणे, वडगाव शिवारात बिबट्याची दहशत
शहरानजीकच्या वडगाव, वजीरखेडे, लेंडाणे, कुकाणे परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याची दहशत होती. या भागात बिबट्याने काही पशुधन व कुत्री फस्त केली होती. बिबट्याचा या भागात वावर असलेले काही व्हिडिओ देखील प्रसारीत झाले होते. या भागातील रहिवाशांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. हाच बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात शहराकडे आला असावा, बिबट्याने भक्ष्य खाल्ले असावे, यामुळे त्याने मोहितकडे न पाहता कार्यालयात पहुडणे पसंत केले.
मोहितच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक
साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात बिबट्याला बंद करण्यास मोहित आहिरेचे प्रसंगावधानच कारणीभूत ठरले. त्याच्या या धाडसाचे व तातडीने कार्यालयाचा दरवाजा बंद करण्याच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून मोहितवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वन विभाग, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी पुष्पगुच्छ देत मोहितचा सत्कार केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.