Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात उमेदवार नसल्याने नाशिक शहर असो की, जिल्हा काँग्रेस पक्ष हरविला की काय असा प्रश्न पडलेला असतानाच प्रदेश पातळीवरून शहर व जिल्ह्यासाठी पाठविण्यात येणारे प्रभारीच पक्ष सोडून जात आहे. गत महिन्यात माजी खासदार उल्हास पाटील यांनी भाजपात प्रवेश केला तर, आता जिल्हा प्रभारी राजू वाघमारे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Nashik Lok Sabha Constituency City District Congress held without an incharge marathi news)
त्यामुळे स्थानिक काँग्रेस विना प्रभारी झाली आहे. नाशिक जिल्हा तसा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. नाशिक असो की, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पक्षाने तब्बल ४० वर्षे नेतृत्व केले आहे. मात्र, सन १९९९ ला आघाडी झाल्यापासून दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेले. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाला स्थान मिळविता आलेले नाही. अनेकदा पक्षाने या मतदारसंघावर दावा केला.
दिल्ली दरबारी जाऊन मतदारसंघ मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्यातील पक्षाची झालेली दयनीय स्थिती लक्षात घेऊन या मतदारसंघाबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर स्थानिक काँग्रेसने बैठका घेत नाशिक व दिंडोरी मतदारसंघावर दावा ठोकला होता.
त्यावेळी प्रभारी म्हणून असलेले माजी खासदार उल्हास पाटील यांनी बैठकीत दोन्हींपैकी एक मतदारसंघ घेणारच अशी वल्गना देखील केली होती. मात्र, पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. हे प्रभारी जात नाही तोच, जिल्हा प्रभारी म्हणून काम बघत असलेले राजु वाघमारे यांनीही शिंदे सेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला आहे. वाघमारे यांनी देखील जिल्हा काँग्रेस कमिटीत बैठका घेत तयारीचा आढावा घेतला होता. (latest marathi news)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पूर्वतयारीला वाघमारे यांनी बैठकांचा जोर लावला होता. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी १० मार्च रोजी शहरात महाविकास आघाडीची एकत्र बैठक घेतली होती. मात्र, वाघमारे यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे शहर व जिल्हा काँग्रेसला प्रभारी उरलेला नाही.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट सक्रिय झाले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ना प्रचारात, ना बैठका घेतांना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रेनंतर पक्ष उभारी घेऊन कामाला लागेल ही अपेक्षा होती. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसत आहे.
''वाघमारे यांच्या जाण्याने पक्षाला कोणताही फटका बसणार नाही. काँग्रेस एकदिलाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करीत आहे. प्रदेश पातळीवरून प्राप्त आदेशानुसार काम सुरु आहे.''- स्वप्नील पाटील (शहर-जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.