Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवाराची घोषणा केल्याने आक्रमक झालेल्या भाजपच्या आमदारांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी या जागेसाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले आहे. (nashik Lok Sabha Election 2024 BJP three marathi news)
जागा शिवसेनेकडे जाणार असली तरी त्यांना परिस्थिती अनुकूल नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपकडे घेण्याचा हट्टच मंत्री महाजन यांच्याकडे धरला. त्या वेळी मंत्री महाजन यांनी मुंबईत वरिष्ठांशी बोलून मार्ग काढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नाशिकचा तिढा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीनंतर भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याशी बंद दरवाजाआड चर्चा केली. यात नाशिकच्या जागेबाबत खासदार शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव परस्पर जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली. नाशिक लोकसभा मतदारसंघात गोडसे यांच्या विरोधात वातावरण असून, अनेक सर्वेक्षणातून हे पुढे आले आहे.
त्यांची उमेदवारी झाल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजपने ही जागा आपल्याकडे घेऊन उमेदवार द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मंत्री महाजन यांनी पदाधिकारी व आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्यांनी थेट या जागेचा हट्टच केला. पदाधिकाऱ्यांचा आग्रह व आमदारांचा होरा बघता मंत्री महाजन यांनी याबाबत मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यातून नक्कीच मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी दिला.( latest marathi news )
तरीही उमेदवार कोण, याबाबत सस्पेन्स
एकीकडे भाजपचे जागावाटपाबाबतच राज्यस्तरीय धोरण आणि श्री. गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा यावरून नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असले तरी उमेदवार कोण, याविषयी अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगत उमेदवारीचा ‘सस्पेन्स’मंत्री गिरीश महाजन यांनी कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठही जागा जिंकण्याचा निर्धार महाजन यांनी २०१९ प्रमाणे यंदा पुन्हा बोलून दाखविला.
ते म्हणाले, की विद्यमान खासदारांच्या पक्षाला जागा सोडण्याविषयी राज्यस्तरीय नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवरील समितीकडे ही नावे जातात आणि तेथून उमेदवारांची घोषणा होते. त्यामुळे एका व्यक्तीला वाटते म्हणून भाजपमध्ये उमेदवार निश्चित होत नाही किंवा उमेदवारी कापली जात नाही. नाशिक लोकसभेत शिवसेनेचाच उमेदवार राहणार असला तरी उमेदवार कोण राहील, याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगत त्यांनी खासदार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचा मार्ग पूर्णत: मोकळा झालेला नसल्याचे जणू संकेतच दिले.
भाजपमध्ये आणखी इनकमिंग
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी एखाद्या नगरसेवकाप्रमाणे नाशिकमध्ये चौकसभा घेतली. त्यांना बघायला किंवा ऐकायलाही कोणीही येत नाही. लोकांचा काँग्रेसवर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी मुंबईत पोचेपर्यंत अजून काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूतोवाच मंत्री महाजन यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना टीका करण्याशिवाय दुसरे कामच राहिले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.