Nashik Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू असून, उमेदवारीसाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे. यातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नावावर पक्षांतर्गत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी दिली. मात्र, अलीकडच्या काळात शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासींचे मोठे मोर्चे काढून सरकारला आव्हान देणाऱ्या जिवा पांडू गावित यांनी राजकीय निरीक्षकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. (Nashik Lok Sabha Election Bharti Pawar again from BJP marathi news)
डॉ. पवार यांनी दिल्लीतील वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत डॉ. पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे गेल्या काही सर्वेक्षणांमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शेतकरीबहुल असून, कांदा निर्यातबंदी आणि द्राक्ष निर्यातीला अनुदानापासून वंचित ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत.
याचा सर्वांत मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता पक्षाकडूनच व्यक्त केली जात आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना एक आणि भाजप एक अशी आमदारांची स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी मतदारसंघावर दावा केला.
मात्र, चारवेळा एकहाती विजय प्राप्त केलेला मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नसल्याने पक्षाने विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दर्शवला आहे. डॉ. पवार यांच्यावर स्थानिक पक्षांतर्गत नाराजी असली तरी, कोविडमध्ये त्यांनी केलेल्या कामांच्या मूल्याकंनावर त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. (latest marathi news)
पदाधिकाऱ्यांची नाराजी
गेल्या आठवड्यात दिंडोरी लोकसभेचे निरीक्षक राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी केलेल्या वन-टू-वन चर्चेत डॉ. पवार यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त होते. पदाधिकाऱ्यांसह पक्ष संघटनेला त्यांचे सहकार्य नसल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांकडे केल्याची चर्चा होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्या भेटत नाहीत. कांदाप्रश्नात त्यांनी लक्ष न घातल्याची नाराजी पदाधिकाऱ्यांनी या वेळी बोलून दाखविली. हा अहवाल महसूलमंत्र्यांनी पक्षाकडे सादर केला आहे.
गावित यांची भूमिका निर्णायक
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विशिष्ट मतदान आहे. गेल्या निवडणुकीत गावित यांनी स्वबळावर लढत सव्वालाख मते प्राप्त केली होती. गावित यांचा मतदारसंघात विशिष्ट प्रभाव आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मध्यंतरी वनपट्ट्याच्या आंदोलनाद्वारे त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. शिस्तीने वागणारा पक्ष आणि लढवय्ये कार्यकर्ते जोडीला असल्याने गावितांची जादू इथे चालू शकते. माकप ‘इंडिया’ आघाडीत असल्याने गावित यांच्या नावाचा विचार झाल्यास भाजपसाठी पुढची वाटचाल बिकट होईल.
राष्ट्रवादी झाली आग्रही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत स्थानिक पदाधिकारी दिंडोरीसाठी आग्रही आहेत. या मतदारसंघात पक्षाचे चार आमदार असून, एक शिंदे शिवसेना गटाचा आमदार आहे. शेतकरीबहुल मतदारसंघात भाजप अन् राज्यमंत्री डॉ. पवार यांच्यावर नाराजी असल्याने जागा धोक्यात असल्याने राष्ट्रवादी सरसावली आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्षाला एकही जागा नसल्याने दिंडोरी तरी घ्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजपने डॉ. पवार यांना झुकते माप देत दिंडोरीतील विरोध झिडकारल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.