Nashik Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षाचे सर्वसामान्य व निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या भास्कर भगरे यांच्यावर पहिल्याच उमेदवारी यादीत उमेदवारी मिळवून शिक्कामोर्तब केले आहे. दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्याच्या सीमेवरील दिंडोरी तालुक्यातील अत्यंत छोट्याशा जेमतेम ४०० लोकवस्तीच्या गोंडेगाव गावातील सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील भास्कर भगरे यांनी एम.ए. बी.एड.चे शिक्षण घेतले असून, ते पिंपळगाव येथील कन्या विद्यालयात उपशिक्षक आहेत. (Nashik Lok Sabha Election Bhaskar Bhagare loyal activist without political heritage marathi news)
ग्रामस्थांनी त्यांची समाजसेवेची वृत्ती बघत त्यांना बिनविरोध गावाची धुरा देत सरपंच केले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे यांनी त्यांना पंचायत समितीत संधी दिली अन् ते सभापतीही झाले. त्यांची जनतेचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या हातोटीने ते लोकप्रिय झाले. त्यांचा पंचायत समिती गण खुला झाला. त्यांनी तालुक्यातील मडकीजांब गणातून उमेदवारी केली व निवडूनही आले.
पुढे जिल्हा परिषदेत उभे राहिले. परंतु माजी आमदार धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. त्यातून खचून न जाता आपला जनसंपर्क सुरू ठेवला. पुढे पोटनिवडणूक झाली अन् भगरे प्रचंड मताधिक्याने विजयी होत जिल्हा परिषदेत पोचले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सुरवातीपासून कार्यरत असताना त्यांनी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली. (latest marathi news)
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना जनसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवणे कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. आमदार झिरवाळ अजित पवार गटात गेले, तर भगरे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडे कुणीही सक्षम उमेदवार लोकसभेसाठी नसताना भगरे यांना पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी करण्याची गळ घातली. मोठा मतदारसंघ व निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक रसद आपल्याकडे नसल्याने त्यांनी मला शक्य नाही, असे सांगितले.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘त्यांना तुम्ही लढा आम्ही आहे’, हा विश्वास देत तयारी सुरू केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनीही त्यांच्या उमेदवारीला दोन महिन्यांपूर्वीच हिरवा कंदील देत त्यांना मतदारसंघात संपर्क करण्यास सांगितले.
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, धनराज महाले यांच्यासोबत मतदारसंघात प्रचार केलेला असल्याने मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा तसा त्यांचा परिचय असून, यंदा त्यांना शिवसेनेची मोठी साथ मिळणार आहे. जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते मार्गी लावण्याची त्यांची हातोटी असून, त्यांनी चार महिने जनतेच्या समस्या ऐकून घेत त्यावरच जनतेचा जाहीरनामा बनवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.