संजय वाघ ः सकाळ वृत्तसेवा
Nashik Lok Sabha Election : अठराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांच्या मनात निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दरम्यान, या निवडणुकीत उमेदवारांसह त्यांचे पालक असलेल्या डॉ. विजयकुमार गावित, ॲड. के. सी. पाडवी, एकनाथ खडसे व डॉ. सतीश पाटील या आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (eyes are on tomorrow result as reputation of former ministers is at stake )
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासीबहुल आहे. २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाचा नावलौकिक होता. १९८४ ते २०१४ पर्यंत सलग आठ वेळा खासदारकीचा बहुमान माणिकराव गावित यांनी मिळविला आहे. काँग्रेसच्या टॉप टेन खासदारांमध्ये गणती होणाऱ्या माणिकरावांच्या विजयी अश्वाच्या घोडदौडीला २०१४ मधील मोदी लाटेमुळे लगाम लागला. राज्यमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हीना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव करून इतिहास घडविला होता.
राज्यमंत्री असल्याने डॉ. गावित यांनी केलेल्या विकासकामांचा व देशभरात असलेल्या मोदी लाटेचा डॉ. हीना यांना लाभ झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये डॉ. हीना गावित यांनी माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचा ९५ हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला. सलग दहा वर्ष असलेल्या खासदारकीच्या माध्यमातून केलेली विकासकामे व संपर्कामुळे पुन्हा तिसऱ्यांदा त्या निवडणुकीला सामोरे गेल्या आहेत. यामुळे स्वतःसह मंत्री असलेल्या वडिलांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे.
धडगाव विधानसभा मतदारसंघाची आमदारकी व मंत्रिपद भूषविलेले ॲड. के. सी. पाडवी हेदेखील नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आहे. २०१९ मध्ये माणिकराव गावित यांच्या पुत्राने निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने लोकसभा निवडणूक स्वतः ॲड. पाडवी यांनी लढवली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले. (latest marathi news)
२०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या महाविकास आघाडीकडून त्यांच्याच नावाची चर्चा होती, मात्र या वेळी त्यांनी निवडणूक न लढवता पुत्र ॲड. गोवाल यांच्या नावाची शिफारस केली. पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांच्या निवडणुकीमुळे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची होण्यामागे ॲड. पाडवी यांची रणनीती महत्त्वाची मानली जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ ते २०२४ पर्यंत सलग दहा वर्ष खासदार असलेल्या रक्षा खडसे या तिसऱ्यांदा भाजप महायुतीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. जळगाव जिल्ह्यात भाजपचे जाळे वाढविण्यात मोठा वाटा असलेले श्रीमती रक्षा यांचे सासरे एकनाथ खडसे हे अंतर्गत पक्षीय कलहामुळे भाजपपासून काही काळ अलिप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला.
विधान परिषदेची आमदारकी मिळवली. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजपमध्ये घर वापसीचे संकेत त्यांनी दिले. अधिकृत पक्षप्रवेश होण्याआधीच स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारात पुढाकार घेत त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कन्या रोहिणी मात्र पक्षाशी प्रामाणिक राहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या श्रीराम पाटील यांच्या प्रचारात गुंतल्या आहेत.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री असलेल्या खडसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे कामकाज उत्तम असताना त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत स्मिता वाघ यांची उमेदवारी नाकारून ऐनवेळी उन्मेष पाटील यांना पुढे केले होते, तोच कित्ता या निवडणुकीत गिरवीत विद्यमान खासदाराला डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली.
त्यामुळे दुखावलेल्या उन्मेष पाटील यांना भाजपची ही चाल जिव्हारी लागली. त्यांनी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना सोबतीला घेऊन भाजपचा राजीनामा दिला. मुंबईत शिवसेना भवनावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. त्याठिकाणी उन्मेष पाटील यांनी स्वतःसाठी उमेदवारी न मागता त्यांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी मिळवून दिली.
त्यामुळे यंदाची निवडणूक माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांचे काका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत नेते व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची प्रतिष्ठा यानिमित्ताने पणाला लागलेली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेचे या माजी मंत्र्यांच्या पाल्यांच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.