Nashik Ganesh Visarjan Miravnuk: पारंपरिक वेशभूषेत ढोल-पथकांचा गजर! मिरवणुकीत भव्‍य मूर्ती, जिवंत देखावे अन्‌ चित्ररथ ठरले आकर्षण

Ganesh Visarjan Miravnuk : डोळ्यांचे पारणे फेडणारे जिवंत देखावे अन्‌ फुलांनी सजलेले चित्ररथ, असे वातावरण गणेश विसर्जन मिरवणुकीत बघायला मिळाले.
Nashik Ganesh Visarjan Miravnuk
Nashik Ganesh Visarjan Miravnukesakal
Updated on

नाशिक : मनाला तृप्त करणारे गणरायांचे भव्‍यदिव्‍य रुप.. अंगावर शहारे आणणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके.. डोळ्यांचे पारणे फेडणारे जिवंत देखावे अन्‌ फुलांनी सजलेले चित्ररथ, असे वातावरण मंगळवारी (ता.१७) गणेश विसर्जन मिरवणुकीत बघायला मिळाले. पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशा पथकांनी सहभागी होत तब्‍बल बारा तास गजर केला. (Magnificent idol lively scenes and Chitrarath became attraction in procession)

मिरवणूक मार्गावरील वेगवेगळ्या टप्प्‍यांवर पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासनासह राजकीय पक्ष, सामाजिक संस्‍थांनी आलेल्‍या भाविकांचे व्यासपीठावरून स्‍वागत केले. काहींनी मंडळ पदाधिकाऱ्यांना फेटे बांधत सन्‍मानित केले. दरवेळी मिरवणुकीत काहीतरी वैविध्य जपण्याची परंपरा नाशिकमध्ये रुजत असून, यंदाही नावीन्यपूर्णतेचा ध्यास मंडळांनी घेतला होता.

महिलांनीही लुटला आनंद

मिरवणुकीत महिलांचाही मोठा सहभाग राहिला. सायंकाळपर्यंत युवकांची मोठी गर्दी असल्‍याने बहुतांश युवती, महिला रस्‍त्‍याच्‍या कडेला उभे राहून मिरवणुकीचा आनंद घेत होत्‍या. परंतु साधारणतः दहानंतर मंडळांच्‍या चित्ररथांमध्ये अंतर पडल्‍याने गर्दी पांगली. हीच संधी साधत युवती, महिलांनीही संगीताच्या तालावर ठेका धरत मनसोक्‍त नृत्‍याचा आनंद घेतला.

प्रात्यक्षिकांसाठी गर्दी

ढोलवादनादरम्‍यान काही पथकांकडून मर्दानी खेळ, चित्त थरारक प्रात्‍यक्षिके सादर केली. खुबीने लाठी-काठी चालवत युवतींनी स्‍वसंरक्षणाचा संदेश दिला. युद्धकलांचे सादरीकरण बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

नयनरम्‍य सजावट

मिरवणुकीतील गणरायांच्या गगनचुंबी मूर्तींभोवती भाविकांची वर्दळ कायम होती. छायाचित्रे, सेल्‍फी टिपण्याची लगबग यावेळी बघायला मिळाली. तसेच काही मंडळांनी सुगंधी फुलांपासून चित्ररथ सजविल्‍याने, फुलांचा सुगंध संपूर्ण मिरवणुकीदरम्‍यान दरवळत होता. तर काही मंडळांनी बाप्पांच्‍या मूर्तीभोवती आकर्षक रोषणाई केली होती. (latest marathi news)

Nashik Ganesh Visarjan Miravnuk
Nashik Ganesh Visarjan Miravnuk 2024 : तयारी बाप्पाच्या निरोपाची! विसर्जन मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल

अन्‌ बालक स्‍वाधीन

मिरवणूक संपण्याची वेळ झालेली असताना साडे अकराच्‍या सुमारास पाच वर्षीय बालक बेपत्ता झाले होते. मेहेर सिग्‍नलवरील पोलिसांच्‍या व्‍यासपीठावरून बालकाबाबत ध्वनीक्षेपकाद्वारे पालकांना आवाहन केले. परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्‍याने अखेर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी पालकांच्‍या शोधार्थ पुढाकार घेतला. बालकाला काहीही सांगता येत नसल्‍याने पालकांना शोधण्याचे आव्‍हान होते. तोडक्‍या मोडक्‍या माहितीच्‍या आधारे कर्मचारी बालकाला मिरवणूक मार्गात घेऊन निघाल्‍या. मार्गात छोट्या व्‍यावसायिक दांपत्‍यापर्यंत पोचल्‍यानंतर बालक त्‍यांना स्‍वाधीन केले.

रील्स स्‍टार्सकडून सामाजिक संदेश

राष्ट्रीय पातळीवर महिलांवरील वाढत्‍या अत्‍याचाराच्‍या घटनांच्‍या पार्श्वभूमीवर मिरवणुकीतून रील्‍स स्‍टार्सने प्रबोधन केले. ‘लाडक्‍या बहिणीची काळजी घ्यायला लाडक्‍या भावांना सदबुद्धि देरे बाप्पा’, ‘जी मुलगी चौदा किलोचा ढोल बांधून चार तास वाजविते.. ती वेळप्रसंगी कुठल्‍याही नराधमाला वाजवू शकते’ असे फलक झळकावीत युवक युवतींनी उपस्‍थितांचे लक्ष वेधले.

महादेवा’च्‍या रूपांची भाविकांना मोहिनी!

हरियानाच्या कलावंतांचे सादरीकरण मिरवणुकीत ठरले लक्षवेधी

विराट रूपातील बाहुबली शंकर.. नंदीवर पार्वतीसोबत स्‍वार झालेले भोलेनाथ.. अन्‌ तांडव नृत्‍य करणारे नीलकंठ.. अशा महादेवाच्‍या विविध रूपांनी भाविकांवर मोहिनी फेरली होती. शिवसेवा मित्र मंडळाच्‍या देखाव्‍यात हरियाना येथील कलावंतांनी केलेले सादरीकरण संपूर्ण मिरवणुकीत लक्षवेधी ठरले. हरियानाच्या हिसार येथील सुनील अनिल तिलकधारी आर्ट ग्रुप यांच्‍यातर्फे मिरवणुकीत भगवान शिवाचे विविध रुप सादर केले. यामध्ये शिवतांडव करतानाचे रुप, भव्‍यदिव्‍य स्‍वरुपातील बाहुबली शंकराचे रुप आणि पार्वतीसोबत नंदीवर स्‍वार झालेले शिवपार्वतीच्‍या रूपाचा समावेश होता.

याशिवाय बाहुबली हनुमानासोबत वानरदेखील सहभागी झाले होते. भस्‍म लावलेले व गळ्यात कवटी घातलेले साधूंच्‍या वेशभूषेतील कलावंतांचे महाकाल नृत्‍य पाहताना उपस्‍थितांच्‍या अंगावर शहारे आले होते. आगीचे लोळ अन्‌ दाट धुरातून लयबद्ध पद्धतीने नृत्‍य करताना कलावंतांनी सर्वांचेच लक्ष वेधले. सुमारे वीस कलावंतांनी थरारक सादरीकरणात सहभाग घेतला होता. विशेषतः सायंकाळी अंधार पडल्‍यानंतर शिवतांडव व महाकाल नृत्‍य पाहण्यासाठी भाविकांनी विशेष गर्दी केली होती.

Nashik Ganesh Visarjan Miravnuk
Nashik Ganesh Visarjan: 2 लाख गणेशमूर्तींचे संकलन; मागील वर्षाच्या तुलनेत घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.