Assembly Elections 2024 : ‘महाविकास’चा प्रत्येकी 5 जागांचा ‘फॉर्म्युला’; विधानसभा निवडणूक तयारी

Assembly Elections : विधानसभेची तयारी सुरू केलेली असताना जागावाटपाबाबत राज्यस्तरावर पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
Assembly Elections 2024
Assembly Elections 2024esakal
Updated on

Assembly Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत आत्मविश्‍वास उंचावलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभेची तयारी सुरू केलेली असताना जागावाटपाबाबत राज्यस्तरावर पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. यात नाशिक जिल्ह्यातील १५ जागांबाबत विचारमंथन होऊन पहिल्या टप्प्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाला प्रत्येकी पाच जागा देण्याचा फॉर्म्युला निश्‍चित केला जाईल. (Maha Vikas Formula of 5 Seats each Assembly Election Preparation )

त्यानंतर सर्वेक्षणातून पुढे येणाऱ्या इच्छुकांना उमेदवारी देताना पक्षाची अदलाबदल करण्याची तयारी महाविकास आघाडीने ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने आतापासून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निफाडला शेतकरी मेळाव्यास हजेरी लावत प्रचाराचे रणशिंग फुंकले. हा पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नसला तरी त्यातून विधानसभेची साखर पेरणीच झाली. आता जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.

शिवसेनेचा सात जागांवर पराभव

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक दहा जागा लढविल्या होत्या, त्यापैकी सहा जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आणि जिल्ह्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून ‘राष्ट्रवादी’चा वरचष्मा राहिला. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे मंत्री छगन भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतरच्या राजकीय स्थित्यंतरात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचेही आमदार महायुतीत सहभागी झाले.

यात मंत्री छगन भुजबळ (येवला), विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (दिंडोरी), नितीन पवार (कळवण-सुरगाणा), दिलीप बनकर (निफाड), ॲड. माणिकराव कोकाटे (सिन्नर), सरोज अहिरे (देवळाली) हे आमदार महायुतीमध्ये आहेत. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असल्याने मोठा भाऊ या नात्याने शिवसेनेने जिल्ह्यातील १५ पैकी नऊ जागा लढविल्या. यात कळवण, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, देवळाली, इगतपुरीतील उमेदवारांचा पराभव झाला.(latest marathi news)

Assembly Elections 2024
Assembly Elections 2024: भाजप खरंच विधानसभा स्वबळावर लढणार? अजित पवारांना दूर ठेवण्यासाठी सर्व्हे? अधिकृत माहिती वाचा

मविआ रणनीती बदलणार

२०२४ च्या निवडणुकीसाठी आता शिवसेनेचे दोन्ही आमदार महायुतीचा घटक म्हणूनच लढतील. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी या जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपने जिल्ह्यात सहा जागा लढविल्या होत्या. त्यांचा ‘स्ट्राईक रेट’ सर्वाधिक राहिला. चांदवड-देवळा, बागलाण, नाशिक पूर्व, नाशिक मध्य व नाशिक पश्‍चिम या मतदारसंघात त्यांना विजय मिळाला.

मालेगाव मध्य या एकमेव मतदारसंघातील दीपाली वारुळे यांचा पराभव झाला. त्यामुळे महायुतीचा संभाव्य उमेदवार लक्षात घेऊन महाविकास आघाडी ऐनवेळी आपल्या रणनीतीत बदल करणार आहे. त्यातही उमेदवार निश्‍चित करताना सर्वेक्षणाचा आधार घेतला जाणार असून, त्यांना पक्षाचा अडसर ठरल्यास घटक पक्ष बदलून देण्यात येणार आहे.

ऐनवेळी जागांत बदल शक्य

कळवण-सुरगाणा या विधानसभा मतदारसंघावर माकपने दावा केला असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून ही जागा मागितली आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच जागांमध्ये ‘राष्ट्रवादी’ला या जागेचाही विचार करावा लागेल. जागांची मागणी करताना आठ मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दावा केल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी जागांची ऐनवेळी अदलाबदल होऊ शकते.

दावे-प्रतिदावे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : गेल्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या नऊ जागांपैकी दोन ठिकाणी विजय मिळाला. हे दोन्ही आमदार सध्या महायुतीबरोबर गेले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही निवडणूक पूर्णत: वेगळी ठरेल. त्यांनी निफाड, दिंडोरी, देवळाली, सिन्नर, नाशिक पश्‍चिम, मालेगाव बाह्य व येवला या मतदारसंघांतील उमेदवारीवर दावा केला आहे.

Assembly Elections 2024
Assembly Elections 2024 : विधानसभेसाठी काँग्रेस-भाजप स्वबळावर लढणार! भाजपकडून आढावा बैठकांतून विधानसभानिहाय चाचपणी

येवला मतदारसंघ मिळविण्यासाठी शिवसेनेने धुळ्यातील एक जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : २०१९ च्या निवडणुकीत निवडून आलेले सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करीत येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, देवळाली, नाशिक पूर्व, सिन्नर या सात ठिकाणी उमेदवारीचा दावा केला आहे.

काँग्रेस : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, चांदवड-देवळा, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, नाशिक मध्य या पाच ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविले. त्यापैकी इगतपुरीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा अपवाद वगळता उर्वरित चार ठिकाणी दारुण पराभव झाला. आता २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना या पक्षाने सहा जागांवर दावा ठोकला आहे. यात त्यांना नाशिक पूर्व आणि नांदगाव हे मतदारसंघ हवे आहेत.

''गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लढविलेल्या पाच जागांसह नाशिक पूर्व व नांदगाव हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, यासाठी दावा केला आहे. पक्ष स्तरावर अंतिम निर्णय होईल, त्याप्रमाणे जागा व उमेदवारांची अदलाबदल होईल.''- ॲड. शिरीषकुमार कोतवाल, जिल्हाध्यक्ष (काँग्रेस)

''राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आम्ही पाठिंब्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीतच हा फॉर्म्युला ठरला. त्यामुळे आम्ही त्यादृष्टीने पाठिंबा जाहीर होण्याची वाट पाहत आहोत.''- जे. पी. गावित, माजी आमदार (माकप)

Assembly Elections 2024
Assembly Elections 2024 : सोसायट्यांच्या हॉलमध्ये उभारणार मतदान केंद्र!

मतदारसंघ व उमेदवारीचा दावा करणारे पक्ष

येवला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष/ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

नांदगाव : काँग्रेस/शिवसेना

मालेगाव बाह्य : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

मालेगाव मध्य : काँग्रेस

बागलाण : काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

चांदवड-देवळा : काँग्रेस

कळवण-सुरगाणा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

दिंडोरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष/ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

नाशिक पूर्व : काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

नाशिक मध्य : काँग्रेस

नाशिक पश्‍चिम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

देवळाली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष/ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर : काँग्रेस

सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष/ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

निफाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष/ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

Assembly Elections 2024
Beed Assembly Election 2024 : सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता ७३ मतदान केंद्रांची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.