Nashik News : पुणे येथील अल्पवयीन तरुणाने मद्याच्या धुंदीत भरधाव चारचाकी चालवत तरुण, तरुणींना उडविले. यात दोघांचा हकनाक बळी गेल्याने या हायप्रोफाईल घटनेची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यातून अल्पवयीन तरुणांच्या हातात वाहने येतातच कशी? हा मुद्दा ऐरणीवर आला. शहर व तालुक्यात अल्पवयीन व वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तरुण, तरुणींच्या ताब्यात पालकांनी सर्रास दुचाकी दिल्या आहेत. (Minor young generation is riding two wheelers)
शहर वाहतूक शाखेतील पोलिसांचे व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे चित्र मालेगाव शहर परिसरातील आहे. तोकड्या मनुष्यबळाचे कारण देऊन शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी असमर्थता दर्शवितात. त्यामुळे तरुण, तरुणींचे फावले आहे. एखादी दुर्घटना घडली तरच प्रशासन सक्रिय होऊन कारवाई करणार का असा प्रश्न सामान्य नागरिक करीत आहेत.
मालगाव अन् नियमभंग हा जणू काही शिरस्ता झाला आहे, मात्र कमीअधिक फरकाने सर्वत्र स्थिती सारखीच दिसते. वाहतूक नियमांचे तर सर्रास उल्लंघन केले जाते. मालेगावात परिवहन विभागाने गेल्या आर्थिक वर्षात २४ हजार ५२४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून १ कोटी ८९ लाख ७० हजार ६०० रुपये दंड वसूल केला. या वाहनांमध्ये १५ हजार ३८३ दुचाकी आहेत.
नाव शिकवणीचे अन...
प्रारंभी अल्पवयीन मुले, मुलींना शिकवणीचे ठिकाण दूर अंतरावर आहे, सायकलवर मुलांची धावपळ होईल असे म्हणत पालक वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी सोपवितात. काही काळानंतर हीच मुले परतीच्या प्रवासात रेस लावणे, मित्रांशी भर रस्त्यावर स्पर्धा करण्याचा प्रकार करतात. यातून सातत्याने लहान मोठे अपघात होतात. (latest marathi news)
लायसेन्स नाही, पण दुचाकी
कारवाई होत नसल्याने व पालकही गांर्भीयाने घेत नसल्याने मुलांचे मनोधैर्य वाढते. कालांतराने मिसरूड न फुटलेली १४ ते १८ वयोगटातील मुले सर्रासपणे दुचाकी वापरताना शहरात जागोजागी दिसतात. दोन महिन्यापूर्वी सहाय्यक अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी किदवाई रस्त्यावर विनापरवाना व कागदपत्र नसलेल्या वाहनांची तपासणी मोहीम राबवत शंभरहून अधिक दुचाकींवर कारवाई केली होती. ही मोहीम निरंतर चालू ठेवू असे त्यांनी जाहीर केले होते. तथापि लोकसभा निवडणूक, बंदोबस्त यामुळे यंत्रणेवर ताण आल्याने मोहिमेकडे दुर्लक्ष झाले.
फुशारकी मारत ट्रॅक्टरही...
ग्रामीण भागात देखील शेतमळ्यात राहणारे सधन शेतकऱ्यांच्या विहिरी कधी नदीकाठी तर कधी पाणथळी दूर अंतरावर असतात. वीजपंप सुरू करण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या हातात सोपविलेल्या दुचाकीवरून हा सिलसिला ट्रॅक्टर व अन्य अवजड वाहनांपर्यंत पोचतो.
काही पालक तर फुशारकी करून आमचा मुलगा पाचवीत असताना दुचाकी शिकला. भन्नाट गाडी चालवतो असे अभिमानाने सांगतात. ज्या तत्परतेने गाडी दिली जाते त्या तत्परतेने वय पूर्ण होताच वाहन चालविण्याचा परवाना मात्र काढला जात नाही. कारवाई होत नसल्याने दिरंगाई वाढते.
कारवाई नसल्याने धाकही नाही
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या तरुणांकडून शहरात अनेक वेळा अपघात झाले आहेत. मात्र पुण्यासारखी मोठी व जीवघेणी दुर्घटना घडल्यास सर्व यंत्रणा व पालकही खडबडून जागे होतात. काही दिवस नियमांचे पालन, कारवाई व सक्ती होते. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. या वृत्तीला आळा बसणे गरजेचे आहे. शहरातील वर्दळीच्या चौकात वाहतूक पोलिस असावेत. पोलिसांचा आदरयुक्त धाक असावा. शहरवासीयांनी वाहतूक नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे, तितकीच जबाबदारी पालकांचीही आहे हेही ध्यानात घ्यायला हवे.
''परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी वाहने तपासणी, कागदपत्रे छाननी व वाहन चालविण्याचा परवाना तपासणी करण्याचे काम करीत असतात. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याचवेळी पालक व संबंधित तरुणांचे देखील काही कर्तव्य आहे. १८ वयोगटानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. त्याचे नाममात्र शुल्क आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून परवाना काढून घ्यावा.''- विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.