Nashik News : रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी एकदा नाशिक व ठाणेकरांच्या पदरात भरभरून ‘गिफ्ट’ देताना अनेक महिन्यांपासून खाच-खळग्यांमुळे शारीरिक व्याधी, तसेच वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना दिलासा दिला.
नाशिक-मुंबई चारपदरी महामार्गाचे सहापदरीत रूपांतर करताना संपूर्ण रस्ता सिमेंट-काँक्रिटचा करण्याची घोषणा करताना पाच हजार कोटी रुपये निधीची घोषणाही करण्यात आली; परंतु सिमेंट-काँक्रिट सोडा, आहे त्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वेळ, पैशांचा अपव्यय होणाऱ्या या महागड्या प्रवासाऐवजी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे शासन दरबारी गाऱ्हाणे मांडण्याची जबाबदारी असलेले नेतेही रस्त्याऐवजी रेल्वे प्रवास करीत असल्याने हे दुर्दैव म्हणावे लागेल. (Nashik Mumbai Highway concreting work is only announcement news)
मुंबई- पुणे- नाशिक या सुवर्ण त्रिकोणात समावेश असलेल्या नाशिकची बाजू विकासाच्या दृष्टीने कायम कमकुवत राहिली. भरभक्कम राजकीय पाठबळ नसल्याचा हा परिणाम आहे; परंतु आतापर्यंत जो काही विकास झाला आहे, तो नैसर्गिकदृष्ट्या किंवा मुंबईपासूनचे किमान अंतर यामुळेच. कुठल्याही शहराचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे सन १९९६ मध्ये युतीचे शासन असताना रस्ते विकासाची योजना आखली गेली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा त्यातलाच एक. याच वेळी मुंबई-नाशिक महामार्गाचेही नियोजन होते; परंतु येथील राजकीय धुरिणांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार असल्याने त्या वेळी रस्ते विकासाला अप्रत्यक्ष विरोध झाला. नाशिकच्या रस्ते विकासाची सुरू झालेली अडचण तेव्हापासून अद्याप कायम आहे.नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी समृद्धी महामार्ग उपलब्ध झाला आहे; परंतु ‘समृद्धी’ची मुंबईपर्यंतची लांबी फक्त आसनगावपर्यंतच आहे.
त्यातही इगतपुरीच्या पुढील महामार्ग अद्यापही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. नाशिकहून मुंबईला पावसाळ्यात जीवघेणा प्रवास असतो. सध्या मुंबईत पोहोचण्यासाठी चार ते साडेचार तासांचा वेळ लागतो. सायंकाळी प्रवास असल्यास हाच वेळ पाच तासांपर्यंत पोहोचतो. रस्त्यांची अवस्था चांगली असली, तरी भिवंडी बायपासपासून प्रवासात अडथळ्यांची शर्यत सुरू होते. कल्याण फाट्यापर्यंत दोन तासांपर्यंत पोहोचता येते. कल्याण फाटा येथे उड्डाणपूल झाला, तरी वाहतूक ठप्प होते.
पुढे अंजूर फाटा, खारेगाव टोलनाका तसेच खाडी पूल अशा महत्त्वाच्या तीन ठिकाणी वाहतूक ठप्प होते. ठाणे पार केल्यावर वाहनांचा वेग काही प्रमाणात वाढतो. कल्याण फाटा ते ठाणे हे साधारण १३ किलोमीटरचे अंतर विकासाला अडथळा ठरते. नाशिककरांना ज्याप्रमाणे मुंबईत जलदगतीने पोहोचणे महत्त्वाचे वाटते, त्यापेक्षा ठाणे व कल्याणकरांसाठी महत्त्वाचे आहे.
त्यामुळे वाहतुकीचे अडथळे दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ६३० किलोमीटर लांबीच्या व दोन हजार ९४८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली; परंतु अद्याप महामार्ग विकासाच्या दृष्टीने एक पाऊलही पुढे पडलेले नाही.
काय आहे प्रस्ताव?
मुंबई-नाशिक महामार्गाचे सहापदरीकरणात नाशिक- गोंदे, वडपेपर्यंतचा रस्ता सिमेंट-काँक्रिटचा केला जाणार आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जाईल. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच ठाणे ते वडपे रस्ता आठपदरी करण्यासाठी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. दोन्ही रस्ते समृद्धी महामार्गाला जोडले जातील.
रस्ते विकासासंदर्भातील घोषणा
- शिर्डी- सिन्नर- त्र्यंबकेश्वर या धार्मिक स्थळांसाठी १०२६ कोटींचा महामार्ग.
- सटाणा- मनमाड महामार्गासाठी ३३१ कोटींची तरतूद.
- नांदगाव- मनमाड- नस्तनपूरदरम्यान रेल्वेवर उड्डाणपूल.
- सुरत- चेन्नई ग्रीन फिल्डवरून वसईमार्गे वांद्रे-वरळीपर्यंत उड्डाणपूल.
- नाशिक शहरापासून समृद्धी महामार्गापर्यंत रस्ते विकास.
"मुंबईसह पुण्याला जाणारा रस्ते प्रवास वेळखाऊ आहे. पुणे रेल्वेमार्ग झाल्यास वेळ वाचेल, त्याचप्रमाणे नाशिक- मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण करण्याबरोबरच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा विस्तार आवश्यक ठरणार आहे." - अॅड. रमेश कुशारे
"मुंबई- नाशिक महामार्गाची परिस्थिती लक्षात घेता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने इतर शहरांशी असलेली कनेक्टिव्हीटीही वेगाने वाढली पाहिजे. शासनाने वर्षभरात प्रकल्प अमलात आणावा. यातून मुंबई- पुणे- नाशिक सुवर्ण त्रिकोण विकसित होण्यास मदत होईल."- योगेश गवळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.