नाशिक : गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टी व पाणीपट्टीची समाधानकारक वसुली झाली असली तरी वसुलीचे उद्दिष्ट पूर्णपणे गाठण्यासाठी तीन दिवसात तब्बल दहा कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक रोड दिवाणी न्यायालय, मविप्र मेडीकल कॉलेज, वोकहार्ट हॉस्पिटल या सरकारी, खासगी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात आल्याने १४३ कोटी रुपयांच्यावर घरपट्टीची वसुली झाली आहे.
मोठ्या थकबाकीदारांकडे अधिकाऱ्यांचा मोर्चा
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतला. मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली समाधानकारक झाली असली तरी मागील वर्षी मात्र कोरोनामुळे वसुलीसाठी तगादा लावू नये, अशा स्पष्ट सूचना शासनाच्या व तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या होत्या. याचा सारासार विचार करून आयुक्त पवार यांनी कर वसुलीसाठी अधिकाऱ्यांकडे तगादा लावला. पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना वसुलीसाठी पेन्शन बंद होवू शकते, असा सूचक इशारा दिल्यानंतर अधिकारी वर्गात धांदल उडाली. त्यामुळे अधिकारी थेट मोठ्या थकबाकीदारांच्या घरापर्यंत पोचले. २६ मार्चपर्यंत १३७ कोटी रुपये घरपट्टीतून, तर पाणीपट्टीतून ६० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. अधिकाधिक वसुली होण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांकडे अधिकाऱ्यांनी मोर्चा वळविला. तीन दिवसात तब्बल दहा कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. बुधवारी (ता. ३०) घरपट्टीपोटी १४३. १४ कोटी, तर पाणीपट्टीतून ६३. २८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाडे थकविलेल्या गाळाधारकांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एकूण १, ५८१ गाळेधारकांना ४८ तासांत थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या असून, पश्चिम विभागात पाच ते सहा गाळे सील करण्यात आले.
शासकीय कार्यालयांकडे तगादा
नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस व्यवस्थापनाकडे थकीत असलेली १७ कोटी रुपयांची घरपट्टी वसुलीसाठी उपायुक्तांनी प्रेसला भेट दिली. प्रेसमधील कराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले. नाशिक रोड दिवाणी न्यायालयाकडून २५ लाख रुपये, आडगाव येथील मविप्र मेडीकल कॉलेज व्यवस्थापनाकडून २२ लाख रुपये, तर वोकहार्ट हॉस्पिटलकडून २५ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.