Nashik News : विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ‘मिशन मोड’वर आला असून, पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. २३ जुलैला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्हा मेळावा होणार आहे. (Nationalist Party on Mission Mode for Assembly Election)
या मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील विधानसभानिहाय आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन या पक्षाने ‘निष्ठावान संवाद यात्रा’ सुरू केली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याला गेल्या आठवड्यापासून साताऱ्यातून सुरवात झाली आहे. जळगाव २१, धुळे २२, नाशिक २३, नगर २४, बीड २५, जालना २६ आणि परभणीमध्ये २७ जुलैला ही संवाद यात्रा पोचत आहे. या संवाद यात्रेदरम्यान मेळावाही होणार आहे.
नाशिक जिल्ह्याचा मेळावा मंगळवारी (ता. २३) प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी दहाला जय शकंर फेस्टिव्हल लॉन्स, जेजूरकर मार्ग, पंचवटी, छत्रपती संभाजीनगर रोड येथे होणार आहे. सकाळच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष पाटील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. (latest marathi news)
दुपारच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष पाटील सर्व म्हणजे १५ विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद व संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा करणार आहेत. मेळाव्यास उपस्थितीत राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, दत्तात्रय पाटील, शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी केले आहे.
मतदारसंघाची चाचपणी
गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने लढविले होते. यात सहा जागा जिंकल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सर्व आमदार अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. फूट पडल्यानंतरही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पक्षाने विजय मिळविला. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाने दहा मतदारसंघावर दावा केला आहे. याशिवाय काही मतदारसंघ अदलाबदल करण्याची मागणी केली आहे. यात, चांदवड-देवळा मतदारसंघ राष्ट्रवादीला घेण्याची आग्रही मागणी पक्षाने केली आहे. त्यामुळे मेळाव्यात विधानसभा मतदारसंघाची चाचपणी होणार आहे. यात नेमक्या कोणत्या जागांवार चर्चा होते, याकडे लक्ष लागले आहे.
दौऱ्याकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग निफाड तालुक्यातून फुंकल्यानंतर विधानसभा निवडणुकीचाही एल्गार शुक्रवारी (ता. १९) याच तालुक्यातून पुकारला. पवार यांनी राजकीय भाष्य केले नसले तरी, विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने अनेक संकेत शेतकरी मेळाव्यातून दिले. यापाठोपाठ लागलीच प्रदेशाध्यक्ष पाटील जिल्हा मेळावा घेत असल्याने या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.