नाशिक : वाहनांकडून सिग्नलचे उल्लंघन, ट्रीपल-सीटसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना ‘इ-चलन’ मशिन दिलेले असताना, द्वारका सर्कल येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून मात्र सर्रासपणे मोबाईलवर बेशिस्तांचे फोटो काढले जात असल्याचे ‘सकाळ’च्या निदर्शनास आले आहे.
बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करताना मोबाईलचा वापर न करण्याची सक्त ताकीद असतानाही वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत बिनधास्तपणे मोबाईलचा वापर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, यामागे त्यांचा नेमका हेतू काय, असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडला आहे. (Nashik E challan machine use police on Dwarka Circle marathi news)
शहरातील बेशिस्त आणि वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी शासनाने वाहतूक शाखेसाठी इ-चलन मशिनही पुरविण्यात आलेले आहे. इ-चलन मशिनच्या माध्यमातूनच बेशिस्त वाहनचालकांवर दंड आकारण्याचे आदेश पोलिस महासंचालकांचे आहेत.
असे असताना, नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांकडून मात्र मोबाईलचा वापर होत असल्याचे ‘सकाळ’च्या विशेष मोहिमेत आढळून आले. द्वारका सर्कल याठिकाणी सर्वाधिक वाहतुकीची समस्या आहे. तसेच, याठिकाणी वाहतूक नियमांचेही वाहनचालकांकडून उल्लंघन होते.
असे आले आढळून
द्वारका सर्कल चौकात गुरुवारी (ता.२१) दुपारी शहर वाहतूक शाखेचे चार ते पाच कर्मचारी कर्तव्यावर होते. द्वारका चौकातून सारडा सर्कलच्या दिशेने सिग्नल सुरू झाला. त्यामुळे वाहने सारडा सर्कलच्या दिशेने धावू लागली. त्यानंतर मुंबई नाका सर्कलकडून मालेगावच्या दिशेने सिग्नल सुरू झाला.
तरीही सारडा सर्कलच्या दिशेने एक खासगी ट्रॅव्हल्स, दोन कारचालकांनी सिग्नल तोडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी इ-चलन मशिनऐवजी त्यांच्याकडील मोबाईलमध्ये या तीन वाहनांचे फोटो काढले. वास्तविक, या वाहतूक पोलिसांनी इ-चलन मशिनवरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो काढून त्यावरून दंड आकारणे अपेक्षित होते. (latest marathi news)
मात्र तसे न करता मोबाईलमध्ये फोटो काढले. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालकांना दंडात्मक कारवाई केली की नाही, हे मात्र गुलदस्त्यात राहिले. ही बाब शंकास्पद असल्याचे निदर्शनास आले.
१३७ इ-चलन मशिन
नाशिक शहर वाहतूक शाखेकडे १४७ इ-चलन मशिन उपलब्ध आहेत. त्यापैकी १३७ इ-चलन मशिन शाखेच्या चार विभागांकडे वाटप केलेल्या आहेत. इ-चलन मशिन नादुरुस्त झाल्यास शाखेकडे असलेले १० इ-चलन मशिन उपलब्ध करून देण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यामुळे विभागांतील वाहतूक अंमलदारांकडे पुरेशा प्रमाणात इ-चलन मशिन असताना, या अंमलदारांनी त्यांचा वापर करण्याऐवजी मोबाईलचा वापर केला, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
"वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात इ-चलन मशिनद्वारेच फोटो काढून दंड आकारणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईलचा वापर करणे अपेक्षित नाही. अशा प्रकारे वाहतूक पोलिस वापर करीत असेल तर तो नियमाचा भंग असून त्या अंमलदारावर कारवाई करण्यात येईल."- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.