Nashik News : देवळा तालुक्यात सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकऱ्यांकडून बंद पाडण्यात आले आहे. सदर क्षेत्र अपघातप्रवण होण्याची भीती असल्याच्या पार्श्वभूमीवर बंद पाडलेले काम सुरू करण्यासाठी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी शेतकरी, बांधकाम कंपनीचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांची बुधवारी (ता.१९) बैठक घेतली. (One way transportation even in rainy season Bhavadbari to Devla)
परंतु जमीन अधिग्रहणाविषयी असलेला संभ्रम दूर झाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू होऊ नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यामुळे पावसाळ्यात या एकेरी मार्गावर अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या असून प्रवाशी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
देवळा तालुक्यात भावडबारी घाट ते लोहोणेर या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे (क्र. ७५२ जी ) दुपदरी व चौपदरीकरणाचे काम बी. आर. गोयल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या बांधकाम कंपनीमार्फत चालू आहे. यातील काही भागात रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणाबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी या रस्त्यात्यालगतच्या गटधारक शेतकऱ्यांनी काम बंद पाडले आहे.
पावसाळयात हा मार्ग धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेऊन रस्ते बांधकाम कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेतली. सहाय्यक आयुक्त श्री. इंगोले उपस्थित होते. शेतकऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून संबंधित विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने संभ्रम निर्माण झाल्याची तक्रार केली. (latest marathi news)
तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी या मार्गावरील रामेश्वर फाटा ते एसकेडी विद्यालयापर्यंतच्या ६ कि.मी. रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती समजावून सांगितली. सामाजिक हिताचा विचार करून अपूर्ण असलेल्या ६ कि.मी.च्या दुसऱ्या लेनचे काम सुरू करण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याची शेतकऱ्यांना विनंती केली. परंतु शेतकरी आपल्या भुमिकेवर ठाम राहील्यामुळे महामार्गाचे काम चालू अशक्य वाटत आहे.
त्यामुळे या मार्गावरील एकेरी वाहतूक धोकेदायक ठरण्याची भीती कायम आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्यांचे जमिनीचे गट मोजण्याची तयारी दाखवत तहसीलदारांनी भूमिअभिलेख कार्यालयाला तातडीने शेतकऱ्यांचे गट मोजणीच्या सूचना द्याव्यात अशी विनंती केली. जिल्हाधिकारींशी चर्चा करून याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
जमिन संपादीत झाल्याचे निष्पन्न
भावडबारी घाट ते गुंजाळनगर या नऊ किमी मार्गावरील महामार्गालगत असलेल्या १७ शेतीगटांची मोजणी दोन महिन्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी चार गटधारक शेतकऱ्यांनी योग्य ते कागदपत्र सादर केल्यानंतर त्या चार गटांची शासनातर्फे मोजणी करण्यात आली असता त्यापैकी दोन गटधारकांची जमिन रस्त्यासाठी संपादित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामावरच प्रश्नचिन्ह लागले असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
वाहनचालकांची कसरत
भावडबारी घाटालगत असलेल्या एसकेडी विद्यालय ते रामेश्वर फाट्यापर्यंत एका लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सद्या दोन्ही बाजूकडून जाणाऱ्या वाहनांसाठी पूर्व बाजूकडील एक लेन खुला करण्यात आली आहे. या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी हा अरूंद रस्ता धोकादायक ठरत आहे. पूर्व बाजूला खचलेली साईड पट्टी व पश्चिम बाजूला दुसरी लेन तयार करण्यासाठी केलेले खोदकाम यामुळे वाहनचालकांना या एकेरी अरूंद मार्गावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते.
तीव्र उतारामुळे वाहने वेगात
भावडबारी घाटाकडून रामेश्वर फाटयाकडे तीव्र उतार असल्यामुळे वाहने वेगाने येतात आणि या अरूंद मार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास किंवा समोरून येणाऱ्या, व ओव्हरटेक करतांना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही छोटेमोठे अपघात झाले असले तरी पावसाळ्यात अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे.
"रस्त्याच्या कामांना आमचा विरोध नाही. हा महामार्ग हा किती मीटर रुंदीचा आहे? त्याचे मूळ दस्तऐवज मिळवण्यासाठी वर्षभरापासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु संबधित विभाग आम्हाला कोणतीही माहिती देत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आम्ही सर्व शेतकरी आमच्या सर्व गटांची स्वखर्चाने मोजणी करण्यास तयार आहोत. शासनाने आम्हाला यासाठी सहकार्य करावे." - अमित मोरे, शेतकरी, भावडे (ता.देवळा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.