नाशिक : कर्नाटकमधील कांद्याचे ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाने दोन वर्षांमध्ये मोठे नुकसान केले. त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काही दिवसांचा खंड देत कांद्याची लागवड केली. शिवाय कर्नाटकमधील कांद्याखालील क्षेत्र १५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यातच आता मध्य प्रदेशातील कांद्याने देशांतर्गत बाजारपेठेवर ‘कमांड’ मिळवली आहे. पाकिस्तानसोबत तुर्की आणि इजिप्तमधील कांद्याने आखाती देशात आव्हान उभे केले. या साऱ्या घटनाक्रमांचा विपरित परिणाम नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या भावात झालाय. (Nashik-onion-prices-fall-marathi-news)
मध्य प्रदेशची देशांतर्गत ‘कमांड’; पाकसोबत तुर्की अन् इजिप्त निर्यातीचे आव्हान
कांद्याचे आगर असलेल्या नाशिकच्या बाजारपेठेत चार दिवसांत उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलला पन्नास ते तीनशे रुपयांची घसरण झाली. बाजारपेठनिहाय आज विकलेल्या कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये असा- (कंसात २१ जून २०२१ ला मिळालेला भाव रुपयांमध्ये दर्शवतो) : येवला- एक हजार ६५० (एक हजार ८५०), नाशिक- दीड हजार (एक हजार ८००), लासलगाव- एक हजार ७७० (एक हजार ९३०), मुंगसे- एक हजार ८०५ (एक हजार ९००), मनमाड- एक हजार ७५० (एक हजार ८००), पिंपळगाव- एक हजार ९०१ (एक हजार ८५१), देवळा- एक हजार ८०० (एक हजार ९००), नामपूर- एक हजार ७२५ (एक हजार ८५०).
४१ लाख टन उत्पादन अपेक्षित
जिल्ह्यात यंदा कांद्याची लागवड एक लाख ६५ हजार हेक्टरवर झाली असून, त्यातून ४१ लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार त्यातील २० लाख टनापर्यंत कांद्याची साठवणूक होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांशी सुरू असलेल्या संवादातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांनी कांद्याची साठवणूक होण्याची शक्यता पुढे आली आहे. गेल्या वर्षी एक लाख ७१ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. मात्र पावसाने कांद्याचे नुकसान झाले. कर्नाटकमधील कांद्याचे सलग दोन वर्षे झालेल्या नुकसानामुळे नाशिकच्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळाला होता. हे कारण साठवणूक वाढण्यामागील आहे. देशांतर्गत चांगली मागणी, ‘नाफेड’तर्फे बाजारभावाने सुरू असलेली खरेदी यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेत या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत बऱ्यापैकी भाव शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र मध्य प्रदेशच्या कांद्याने देशातील बहुतांश भागात ग्राहकांना आकर्षित केले असल्याने आणि निर्यातीचा वेग म्हणावा तितका वाढत नाही अशी कारणे भावाच्या घसरणीमागे असल्याचे दिसून येते. दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबर विक्रीसाठी उपलब्ध होणारा मध्य प्रदेशातील कांदा पुढील महिनाअखेर संपेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
निर्यातीवर आल्यात मर्यादा
पाकिस्तानमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन २२ टक्क्यांनी वाढले आहे. हा कांदा भारताच्या कांद्याच्या कमी भावात विकला जात आहे. तुर्की आणि इजिप्तचा कांदा दुबईमध्ये विकला जात आहे. त्यातच, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, बांगलादेशमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात येत आहे. परिणामी, भारताच्या कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा येत असल्याचे निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ'ला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.