Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्त दराने खरेदी करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्था शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडूनच जास्त कांद्याची खरेदी करतात. सद्यःस्थितीला शेतकऱ्यांकडून १५ ते २० रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता व्यापारी ३० रुपयांनी विकत आहेत. (organizations NAFED and NCCF buy more onions from traders instead of farmers)
त्यामुळे या दोन संस्थांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होत असल्याने कांदा खरेदीच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर ठेवला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या सूचनांप्रमाणे कांदा खरेदीप्रक्रियेत बदल केले जातील. यासंदर्भातील अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयात सादर करण्याचे आश्वासन केंद्रीय पथकप्रमुख बी. के. पृष्टी यांनी दिले.
केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहे. जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधींसोबत बुधवारी (ता. ३) दुपारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांची बैठक पार पडली. या वेळी केंद्रीय विपणन व तपासणी संचालनालयाचे उपकृषी पणन सल्लागार बी. के. पृष्टी, किमान किंमत समर्थन उपायुक्त बिनोद गिरी, फलोत्पादन (सांख्यिकी) उपसंचालक पंकज कुमार, विपणन व तपासणी संचालनालयाच्या विपणन अधिकारी सोनाली बागडे उपस्थित होते.
‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांमार्फत यंदा पाच लाख टन कांद्याची खरेदी होणार आहे. कांदा खरेदी करताना फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु ठराविक कंपन्यांकडूनच कांद्याची खरेदी होते. शेतकऱ्यांच्या नावे पैसेही काढले जातात. एका शेतकऱ्याच्या नावे दहा ते वीस लाख रुपयांपर्यंत पैसे वर्ग झाल्याचे या कंपनी प्रतिनिधींनी केंद्रीय पथकासमोर सांगितले. (latest marathi news)
एका व्यक्तीने कांदे नाफेडला दिले, तर पैसे त्यांच्या भावाच्या खात्यावर वर्ग झाले. पैसे मिळाल्याची पावती पहिल्या भावाच्या नावावर आल्याचे पुरावे गणेश निंबाळकर यांनी केंद्रीय पथकासमोर सादर केले. त्यामुळे कांदा खरेदी पद्धतीत जास्तीत जास्त पारदर्शकता येण्यासाठी पद्धतीत बदल करण्याची सूचना शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचनांप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्रालयास समितीमार्फत अहवाल सादर केला जाईल.
जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरेदीत सहभागी होण्याचे आवाहन विपणन अधिकारी सोनाली बागडे यांनी उपस्थितांना केले. या वेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे गणेश निंबाळकर, पंडित वाघ, युवा मित्र संघटनेचे नितीन अढांगळे, शांताराम बागूल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर वाळुंज, अमोल खलाटे, मल्हारी जाधव, दगू चव्हाणके आदी उपस्थित होते.
"कांदा खरेदी करणाऱ्या घटकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. खरेदीप्रक्रियेत निश्चितपणे बदल सुचवले जातील. कामात अधिक पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने आम्ही कृषी विभागाला अहवाल देणार आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत." - बी. के. पृष्टी, उपकृषी पणन सल्लागार (केंद्र सरकार)
"कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, या दृष्टीने केंद्र सरकार आता लक्ष द्यायला लागले आहे, ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. खरेदीप्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे." - गणेश निंबाळकर, शेतकरी प्रतिनिधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.