सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा
Nashik News : येथील नगरपरिषदेमधील प्रशासकांच्या आलबेल धोरणांमुळे सुरू असलेला कारभार अनेक कारणांनी गाजत असताना त्याची थेट झळ गावठाणामधील हजारो लोकांना बसत आहे. येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी गटारमिश्रीत येत असल्याने साथीच्या आजारांची शक्यता बळावली आहे. प्रशासकांचे विस्कळीत वेळापत्रक पाहता सामान्य लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. या गंभीर बाबीची दाहकता गाव कारभाऱ्यांना कधी येणार हा मुख्य प्रश्न आहे. (Ozar drinking water of residents is mixed with sewage)
लाखाच्या घरात गेलेली लोकसंख्या विचारात घेता ओझर हे नाशिकचा भाग होऊ पाहत आहे. येथील वाढलेले उपनगरे याची साक्ष देतात. परंतु पिण्याच्या पाण्याबाबत कुठलेही ठाम धोरण अद्याप पावेतो प्रशासकांना बनवता न आल्याने नळाला दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांना पोटाच्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळत आहे.
पाणी सोडल्यावर ते शेवटच्या टोकाला पाईपमधून काही मिनिटे वाया जाऊ द्यावे लागत असून ते पाणी पाहिल्याबरोबर भविष्यातील मूलभूत सुविधा नेमक्या काय हव्या याचा आराखडा न बनवता प्रशासकांनी इतके वर्ष ओझरला गृहीत धरल्याचे स्पष्ट जाणवते. त्यातही गावाला जास्त वेळ न दिल्याने याचा मोठा फटका सामान्यांना बसत आहे.
त्यांचा बराच वेळ इतर काम व जवळच्या लोकांच्या बैठकांमध्ये जात असल्याने तक्रार घेऊन आलेले नागरिक मात्र वैतागून माघारी फिरत आहे. या विषयी तातडीने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान मुख्याधिकारींशी या प्रश्नाबाबत संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. (latest marathi news)
पाणीप्रश्नाला 'अर्थ'नाही!
ज्या गावठाणला गटारीचे पाणी मिश्रीत होऊन घरात येते, त्यात अनुसया पार्क, राजवाडा, शेटे मळा, सरकारवाडा, अत्तार लेन, कुंभार गल्ली, गायकवाड गल्ली, खालचा माळीवाडा, कोळीवाडा, मरिमाता गेट, रूपेश्वर गल्ली, कासार लेन, नारखेडे चाळ या भागांचा समावेश आहे. येथील पाईपलाईन या जवळपास चाळीस वर्षे जुनाट झाल्या आहेत, त्याचा प्रारूप आराखडा तयार करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खरेतर गावात घडणाऱ्या या गंभीर समस्येकडे प्रशासकांनी कधी भेट दिली का, बैठका घेतल्या का, सामान्य लोकांची काळजी केली का? हाच खरा संशोधनाचा विषय आहे.
काळ्याकाचा, गडद पडदे
सध्याचे प्रशासक हे प्रथम नागरिक, मुख्याधिकारी आणि प्रशासक अशा तिहेरी भूमिकेत असताना त्यांनी ‘जल ही जीवन है’ हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून हा प्रश्न सोडवणे गरजेचे होते. परंतु ते कधी येतात अन् जातात हेच गावाला आजपर्यंत माहीत झालेले नाही. कार्यालयात आले तरी त्यांचे दालन पॅक असल्याने त्यास काळ्या काचा, गडद पडदे आणि पहारेकरी असल्याने ते अँटीचेंबर आहे की कार्यालय हेच समजत नाही.
हे दृश्य पाहूनच सामान्य गावकऱ्यांना मात्र लोकशाहीच्या देशात हुकूमशाहीची आठवण करून देते. खरेतर इतक्या मोठ्या गावात नागरी समस्या सोडवण्यासाठी खुलेद्वार धोरण अभिप्रेत असताना केवळ दोन तीन मर्जीतल्याच साहेबांशी चर्चा करत बसलेले राहतात, त्यामुळे सामान्य नागरिकांना ताटकळत बसावे लागते.
"ओझरबाबत अनेक तक्रारी असून लवकरच राजकारण विरहित आढावा बैठक घेतली जाईल. प्रशासकांना देखील अशा गंभीर समस्यांबद्दल विचारणा केली जाईल. आचारसंहितेमुळे काही बंधने आहेत, पण मूलभूत सुविधांबाबत प्रशासकांनी देखील सतर्क राहायला हवे." - दिलीप बनकर, आमदार, निफाड
"ओझरचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या कार्यकाळातील सर्वच कामांची चौकशी शासनाने करायला हवी. जागा बिनशेती करणे, बांधकाम परवानगी, पूर्णत्व देणे यात ते जेवढं कौशल्य वापरतात, तेवढा त्यांनी सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी वापरावे. इतकीच माफक अपेक्षा आहे. शासनाने पूर्णवेळ अधिकारी द्यावा." - संदीप देसाई, रहिवासी, ओझर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.