पिंपळगाव बसवंत : सर्व निकष पूर्ण झाल्याने पिंपळगांव शहराला नगरपरिषदेचा दर्जा द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला देत १२ सप्टेंबर २०२४ पर्यत प्रक्रिया पूर्ण करा असे स्पष्ट केले होते. मात्र पिंपळगावच्या भाळी नगरपरिषदेचा कुंमकुम तिलक लागण्याचे भाग्य तूर्तास तरी दिसत नाही. हा मुहूर्त हुकला असून काल सायंकाळपर्यत तरी आदेश निघेल असे वाटत असलेल्यांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान दोन महिन्यात पिंपळगावचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यावरून पडद्याआड मोठे राजकीय शह- काटशह रंगल्याचे दिसत आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना नगर परिषदेसाठी उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्याने पिंपळगावच्या भाजप कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. (Pimpalgaon Baswant Municipal Council became daydream)