नाशिक : पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींने होस्टेलमध्ये केलेल्या आत्महत्त्या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली. तर, त्यानंतर मयत विद्यार्थिनींच्या पालकांसह ग्रामस्थांनीही आयुक्तांची भेट घेतली. दरम्यान याप्रकरणात सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस सखोल तपास करीत असून, यातील संशयितांकडील मोबाईल जप्त करून तांत्रिक विश्लेषणानुसार तपासाला गती दिली जाईल असे आश्वासन आयुक्त कर्णिक यांनी दिले. (Suicide of female students will be investigated according to technical analysis )
के. के. वाघ महाविद्यालयाच्या गिताई हॉस्टेलमध्ये शुक्रवारी (ता. २०) अस्मिता संदीप पाटील (१८, रा. बागलाण) हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अस्मिताचे वडिलांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसात होस्टेलच्या रेक्टर संशयित उमा पुष्कर हरक यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाची दखल घेत, नाशिक दौर्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष तथा माजी गृहमंत्री जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, माजी नगरसेवक गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड यांच्यासह शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत तपासासंदर्भातील माहिती घेतली. तसेच, यावेळी याप्रकरणाची सखोल तपास करून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यानंतर, मयत अस्मिताचे वडील संदीप पाटील, बिंदू शर्मा, मनोहर देवरे, पंकज रौंदळ, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह सटाणाच्या ग्रामस्थांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेत सखोल तपासाची मागणी केली. यावेळी महाविद्यालय प्रशासनासह रेक्टरची भूमिका संशयास्पद असून, पोलिसांनी या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन तपास करावा आणि मयत अस्मिताला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पालकांनी केली. पोलीस आयुक्तांनी पालकांना दिलासा देत, गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करून संशयितांना गजा आड करेल असे आश्वासन दिले.
नातलगांनी व्यक्त केला संशय
महाविद्यालयाच्या गिताई होस्टेलमध्ये यापूर्वीही आत्महत्त्या झाल्या असून, त्यावेळी अशारितीने संस्थेने प्रकरण दडपून नेल्याचा आरोप नातलगांनी केला. मयत अस्मिता ही अभ्यासात हुशार होती तसेच, ती समंजस असल्याने आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही असा विश्वासही व्यक्त केला.
तसेच, या प्रकरणात संस्था प्रशासन आणि रेक्टरची भूमिका संशयास्पद असून गेल्या काही दिवसात तिची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारली कशी, असा प्रश्नही यावेळी पालकांनी उपस्थित केला. हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही नाहीत, हजेरी रजिस्टरवर तिची नोंद गैरहजरी दाखविली, होस्टेलमधील मुलींना बोलण्यास मनाई करण्यात आलेली आहे यासह घरून डबा आणलेला नसताना, तिच्या टेबलवर भेंडी, वड्यांच्या भाजीचा डबा आला कसा, असेही प्रश्न उपस्थित केले.
''विद्यार्थिनींच्या आत्महत्त्या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली. तसेच आत्तापर्यंतच्या पोलीस तपासाचीही माहिती घेत जलदगतीने तपास झाला पाहिजे. पोलीसही योग्य दिशेने तपास करीत असल्याचे सांगितले.''- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.