वणी- लखमापूर : भाजपने राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांना लोकसभेत धडा शिकवला. महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिले, आता राज्यातही सरकार जाणार या भितीने विविध योजना जाहीर करत आहेत, मात्र जनतेचा या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आगामी विधानसभेत महाविकास आघाडीलाच जनता सत्ता देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (Testimony of Jayant Patil over maha vikas aghadi)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रा दिंडोरीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आलेली आहे. सटाणा, देवळा, कळवणमार्गे ही यात्रा दिंडोरीत येत संस्कृती लॉन्स येथे सभा झाली, त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले,‘ दिंडोरी तालुक्यात आमची सत्ता होती, तेव्हा मांजरपाडा व अनेक वळण योजना करत समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी आणण्याच्या योजनांना चालना दिली. अजूनही अनेक योजना करणे गरजेचे आहे, नारपार योजनेचे पाणी तापी आणि गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी आमचे सरकार आल्यावर आपण निश्चित प्रयत्न करू. उमेदवारीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार देतील तो निर्णय आणि त्याच उमेदवारास विधानसभेत पाठवा.
खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. येथील जनतेचा विश्वास शरद पवार यांच्यावर असून सर्वसामान्य भास्कर भगरे यांना जसे निवडून दिले तसेच पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन केले. खासदार भगरे यांनी लोकसभेत निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानत नारपार वळण योजना व मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवत जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले.
ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी जयंत पाटील यांनी जलसंपदा मंत्री असताना मांजरपाडा व विविध वळण योजना मार्गी लावल्याचे आवर्जून सांगितले. खासदार भास्कर भगरे यांनी वाघाड, करंजवण, ओझरखेड धरण लिंक योजना राबवावी असे सांगितले. दिंडोरी- पेठ तालुक्याने नेहमी शरद पवार यांना साथ दिली असून आताही त्यांच्याच विचाराचा आमदार जनता निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.
माजी समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर, बी. आर. एस. पक्षाचे सचिन कड व कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सुनील गव्हाणे, रोहिणी खडसे, महबूब शेख, आमदार सुनील भुसारा, श्रीराम शेटे, दत्तात्रेय पाटील, सुनीता चारोस्कर, संतोष रेहरे यांची भाषणे झाली. हेमंत टकले, कोंडाजी आव्हाड, गोकूळ पिंगळे, गजानन शेलार, छबू नागरे, बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, भास्कर गावित, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव, गोकूळ झिरवाळ आदी उपस्थित होते. नरेश देशमुख यांनी आभार मानले. (latest marathi news)
बैलगाडी रॅलीने जोरदार स्वागत
शिवस्वराज यात्रा दिंडोरीत येताच ग्रामीण रुग्णालय येथे आदिवासी पथक, ढोल ताशाच्या निनादात स्वागत करत बैलगाडीवरून पालखेड चौफुलीपर्यंत श्री. पाटील, श्री. कोल्हे यांची मिरवणूक काढण्यात आली. शरद पवारांचे राष्ट्रवादीत इच्छुक असलेल्या उमेदवारांसह आज प्रवेश केलेल्या माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांचे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले.
गोकूळ झिरवाळ यांची उपस्थिती
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकूळ झिरवाळ यांनी स्वागत फलक लावले तसेच रॅली व सभेत हजेरी लावली. यामुळे गोकुळ झिरवाळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.
तीन ऑक्टोंबरपर्यंत जागा वाटप
राज्यभरात विधानसभेत तुतारी घेण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. सर्वसामान्य माणूस खासदार होऊ शकतो तसा आमदारही होऊ शकतो हे जनतेने दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या रूपाने दाखवून दिले. त्यावेळी सर्वांनी एकदिलाने काम करा असा सल्ला जयंत पाटील यांनी इच्छुकांना दिला. येत्या ३ ऑक्टोंबरपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण होईल असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.