नांदगाव : यंदाच्या पावसाने सगळीकडे कमीअधिक हजेरी लावली असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वाधिक दाहकता असलेल्या नांदगाव तालुक्याला राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या उपाययोजनांमध्ये वगळण्यात आल्याने सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील खरीप हंगाम जून ते सप्टेंबरमधील पर्जन्यमान, टंचाईग्रस्त गावांना होणारा टँकरद्वारे पाणीपुरवठा व प्राथमिक नजर आणेवारी या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत नांदगावला कसे काय वगळण्यात आले असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (Nashik Rain Crisis most severe drought yet government ignores it Picture from Nandgaon Taluka)
दुष्काळाबाबत जिल्हास्तरावरून शासन दप्तरी या दाहकतेचा अहवाल पाठवूनही मदत व पुर्नवसन विभागाने कुठल्या निकषाच्या आधारे नांदगावला वगळले हा मुद्दा चर्चेचा बनला आहे.
दुसरीकडे तालुकास्तरावर वेळेवर अहवाल गेला असेल तर जिल्हास्तरीय यंत्रणेने त्याकडे गांभीर्याने का बघितले नसेल असा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी दुष्काळी स्थितीवर तातडीने तालुक्यातील यंत्रणेतील महसूल, कृषी विभागासह खातेप्रमुखांची उद्या (ता. १८) आढावा बैठक बोलावली असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कागदावरचा सोपस्कार कमी करून ग्राउंड लेव्हलला जाऊन दुष्काळासंबंधी उपाययोजनांना चालना देण्यासाठी आमदार कांदे यांनी गेल्या महिन्यात सूचना केल्या होत्या.
सध्या तालुक्यात पस्तीस टंचाईग्रस्त चौतीस गावे व १५८ वाड्या वस्त्यासाठी दररोज ८३ फेऱ्या टँकरद्वारे सुरु आहेत यावरून पाण्याच्या स्थितीचा अंदाज यावा.
चार आठवड्यापेक्षा जास्त खंड
खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये नांदगाव तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलेले होते.
त्यानुसार नांदगाव तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळामध्ये नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित सरासरी उत्पादकता २५ टक्क्यांपेक्षा कमी आलेली होती, म्हणजेच पिकाचे होणारे नुकसान हे ७५ टक्के पेक्षा जास्त होणार असल्याचे दिसून आले होते.
बहुतेक पिकाखालील क्षेत्र पाण्याअभावी करपले होते. तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ४ आठवड्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थिती निर्माण होऊन पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे, मात्र मदत व पुनर्वसन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
तुलनात्मक स्थिती आणेवारीची
मालेगाव : सरासरी ४३, ४४, ४५ पैसे
येवला : सरासरी ४७, ४८, ४९ पैसे
सिन्नर : सरासरी ४६ पैसे
नांदगाव : सरासरी ३६ पॆसे
तुलनात्मक स्थिती पर्जन्यमानाची
नांदगाव : ३१५ मिली,
येवला : ४०९ मिली
मालेगाव : ३३१ मिली
सिन्नर : ३६६ मिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.