दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : गुरुवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर यंदा गोदावरी प्रथमच दुथडी वाहिली. मात्र या काळात पावसाळ्यात कोरडीठाक पडलेल्या गोदावरीची अवस्था पाहून अनेकांच्या ९ सप्टेंबर १९६९ च्या पहिल्या महापुराच्या म्हणजे ५४ वर्षांपूर्वीच्या स्मृती जागृत झाल्या.
स्वातंत्र्यानंतर १९५४-५५ च्या दरम्यान गंगापूर धरणाची निर्मिती झाली. स्वातंत्र्य मिळून जेमतेम सात- आठ वर्षेच झालेली असल्याने शासनाकडे पुरेसा फंड नव्हता.
नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याबरोबरच शेती क्षेत्रही ओलिताखाली यावे, म्हणून बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मातीच्या धरणातून शेतीसाठी दोन कालवेही काढण्यात आले.
कालौघात धरणाचा उजवा कालवा जमिनीखाली गेला तरी डाव्या कालव्याद्वारे थेट जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावरील शेतीला आजही पाणीपुरवठा सुरू आहे. गंगापूर धरणाच्या निर्मितीनंतर १९६९ ला ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये त्र्यंबक भागात झालेल्या जोरदार पावसाने प्रथमच धरणाच्या बांधकामाला धोका नको म्हणून दुपारनंतर पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
सायंकाळनंतरही जोरदार पाऊस सुरूच राहिल्याने धरणाच्या सर्व नऊ मोऱ्यांमधून पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू झाला. या दरम्यान शहरालगतचे नंदिनी (नासर्डी), वरुणा (वाघाडी), सरस्वती असे सर्वच नैसर्गिक नालेही भरभरून वाहू लागल्याने पाणी पातळीत आणखीनच वाढ झाली.
सायंकाळनंतर हे पाणी सोमवार पेठ, तिवंधा, सराफ बाजार, कापड बाजार, नेहरू चौक, दहिपूल, गुलालवाडी अशा सखल भागातही पोचले अन् खऱ्या नाशिककरांना पहिल्या महापुराची अनुभूती मिळाली. या वेळी या भागातील तळ व पहिला मजला रात्रभर पाण्यात राहिल्यावर पहाटे पाणीपातळीत कमी झाली अन नाशिककरांचा जीव भांड्यात पडला.
धरणाच्या निर्मितीनंतर गोदावरीला आजवर तब्बल चार वेळा महापूर आले, परंतु पहिल्या महापुराच्या वेळची स्थिती इतर तीन वेळेपेक्षा अधिक भयानक असल्याचे जुनेजाणते सांगतात. या पुरात जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती.
अन रुग्णांना हलविले
१९६९ नंतर गोदेच्या पाणीपातळीत १९७६ ला पुन्हा मोठी वाढ होऊन गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेला. तेव्हा गणेशवाडी परिसरातील आयुर्वेद सेवा संघाचे रुग्णालय नुकतेच सुरू होऊन नागरिकांच्या सेवेत दाखल झाले होते.
पुराचे पाणी रुग्णालयात शिरू लागल्यावर स्थानिक नागरिकांनी झोळी करून रूग्णालयातील अनेक रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविल्याचे आल्याचे जुनेजाणते सांगतात.
आजवर आलेले महापूर
९ सप्टेंबर १९६९, १९ सप्टेंबर २००८, १७ ऑगस्ट २०१६ व १ ऑगस्ट २०१९ (चारही वेळी गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेला होता.)
सिडको : मुसळधार पावसामुळे सिडको, अंबड पाथर्डी भागात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.
नंदिनी नदी पुन्हा एकदा भरून वाहू लागल्याचे सुखद दृश्य शुक्रवारी (ता. ८) नागरिकांनी अनुभवले. सतत दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाने अंबड औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल झाले.
दुचाकी चालवताना रस्त्यावर पाणी साचल्याने कामगारांना विविध अडचणी आल्या. गणेशोत्सव जवळच आल्याने विक्रीसाठी बाजारपेठेत स्टॉल उभारले होते. डेकोरेशनसह अन्य स्टॉलही उभारले होते.
अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह, भाजी तसेच पथविक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पवननगर, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, उपेंद्रनगर यासह पाथर्डी फाटा, इंदिरानगर, कलानगर, साईनाथनगर, सिटी सेंटर मॉल चौक, अंबड गाव आदी ठिकाणी मुख्य चौकाचौकात पाणी साचले होते.
बांधकाम विभाग, ड्रेनेज विभागाकडून साफसफाई करण्यात आलेल्या पावसाळी गटार तसेच अनेक चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेजमिश्रित सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून आले.
दोन दिवसांच्या पावसाने रस्त्यांच्या कामातील निकृष्ट दर्जाचीही चांगलीच पोल खोल झाली आहे. अनेक ठिकाणाच्या मुख्य रस्त्यांवरील डांबर वाहून जाऊन फक्त खडी रस्त्यावर राहिली.
यामुळे रस्त्यांचे काम करणारे ठेकेदारांनी कोणत्या गुणवत्तेत रस्त्यांची कामे केली आहे आणि मनपा अधिकाऱ्यांनी गुणवत्ता कशी तपासली असेल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सहा तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत
कामटवाडे, खुटवडनगर परिसरात उच्च दाबाच्या विद्युत तारेवर झाडाची फांदी कोसळल्याने शुक्रवारी सकाळी दहापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल ६ तासांनंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असल्याने दुसरीकडे कामटवाडे शिवारातील खुटवडनगर, कार्तिकीनगर, माऊली लॉन्स परिसर, साळुंखेनगर यासह विविध भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली होती.
इंदिरानगर : मुसळधार पावसाने पाथर्डी फाटा भागातील प्रभाग ३१ मध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने मोकळे भूखंड पाण्याने वेढले गेले. पाथर्डी पंचक्रोशीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वालदेवी नदीला या हंगामातील पहिला पूर आला.
पुरामुळे दाढेगाव गावाजवळ असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने दाढेगाव आणि पाथर्डी गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे आता दाढेगाववासीयांना पिंपळगाव खांब मार्गे शहरात यावे लागणार आहे. नदीला पूर आल्याने नदीवर असणारे बंधारे तुडुंब झाले आहेत.
प्रभाग ३१ मध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे आणि पदाधिकाऱ्यांनी भरपावसात रस्त्यावर उतरून नागरीकांची मदत केली.
वासननगर, ज्ञानेश्र्वरनगर, माढा कॉलनी, नरहरीनगर, डेमसे मळा, पांडवलेणी परिसर भागात पावसाचे पाणी साचून नागरिकांचे हाल झाले.
वासननगर येथील गार्डन लगतच्या कॉलनी भागात पाणी घरात शिरले. त्यामुळे कॉलनीमध्ये तलावसदृश्य परिस्थिती झाली होती. वासननगर येथील मुरली फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र गामणे व सहकाऱ्यांनी नागरिकांना मदत केली.
कॉलनी रस्त्यावरून वाहणारे पाणी मोठा पाइप टाकून थेट उद्यानात सोडल्याने संपूर्ण उद्यानात पाणीच पाणी झाले. अनेक महिन्यांपासून या पाइपद्वारे उद्यानात जाणारे पाणी बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
मात्र सिडको विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. माजी नगरसेवक डेमसे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तातडीने डेमसे, विभागप्रमुख चेतन चुंभळे, उपविभागप्रमुख तकदीर कडवे, शाखाप्रमुख मोहित पन्हाळे, सतेज महाजन आदी पोचले आणि प्रत्यक्ष पाणी हटवण्यासाठी मदत सुरू केली.
महापालिका कर्मचाऱ्यांना बोलावत चोकअप झालेले ड्रेनेज मोकळे करून परिस्थिती आटोक्यात आणली. आनंदनगर येथे श्रीमती सुराणा यांच्या घराची संरक्षक भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली.
त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले. येथील विद्युत विभागाची चालू स्थितीतील धोकादायक डीपी देखील उघड्यावर होती. त्यापर्यंत पाणी पोचल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.
महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब डेमसे यांनी निदर्शनास आणून दिली. श्री. राऊत, बोरसे, महाले, सूर्यवंशी, डंबाळे, सोनवणे, पाटील, मते आदींनी मदतीचा हात दिला.
दोन तास संपर्क तुटला
पांडव लेणीच्या पायथ्याजवळ असलेल्या म्हसोबापासून पाथर्डी गावाकडे वाहत जाणाऱ्या शिंदे -खोबरा नाल्याला यंदाच्या पावसाळ्यातला पहिला पूर आला. त्यामुळे धोंगडे आणि कोंबडे वस्तीवरील शेतकऱ्यांचा सुमारे दोन तास पाथर्डी- गौळाणे रस्त्याशी संपर्क तुटला होता.
पाथर्डी गावाला वळसा घालून वालदेवी नदीला नाला मिळतो. नाल्याच्या दुतर्फा असलेली जनावरे आणि इतर वस्तू शेतकऱ्यांना आतल्या बाजूला घ्याव्या लागल्या. पहिल्यांदाच नाल्याला पूर पाणी आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
येवला : जूनपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या अन् मोठा खंड दिलेल्या पावसाने सुमारे तीन महिन्यांनंतर येथे प्रथमच मुसळधार हजेरी लावली. शहर व तालुक्याच्या विविध भागांत सुमारे दोन तास झालेल्या पावसाने खरिपाला आधार व बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी (ता. ६) मध्यरात्री १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ हवामान असले, तरी पावसाने हुलकावणी देणे सुरूच होते.
तब्बल तीन महिन्यांपासून येवलेकर जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत असताना, शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकच्या सुमारास ग्रामीण भागासह शहरातही पावसाने हजेरी लावली.
तालुक्याच्या सर्वच भागांत यंदा प्रथमच मुसळधार पाऊस झाला. सुमारे दीड ते दोन तास पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना काही प्रमाणात जीवनदान मिळाले. बेभरोशावर अनेकांनी सुरू केलेल्या कांदालागवडीला या पावसाचा फायदा होणार आहे.
अर्थात पावसाने किमान १५ ते २० दिवस उशीर केल्याने ५० ते ६० टक्के मका, सोयाबीन, कापूस पाण्याअभावी सुकून गेला असून, या पावसाचा पिकांना काहीही फायदा होण्याची शक्यता नाही.
पाण्याअभावी मका पिकाला कणसे न आल्याने शेतकऱ्यांच्या हाती फक्त चारा येणार आहे. सोयाबीनचीही अशीच परिस्थिती असून, शेंगा लागण्याअगोदरच सोयाबीनने मान टाकली आहे.
पावसाअभावी रखडलेली कांदा लागवड मात्र जोरात सुरू होणार आहे. कांदा पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. अजून काही दिवस पाऊस असाच सुरू राहिल्यास विहिरींना पाणी उतरणार आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये झालेल्या पावसाने बंधारे, नाले भरले होते. मात्र, तालुक्यात इतर सर्वत्र बंधारे नदी, नाले कोरडेठाक असून, आता सुरू असलेल्या पावसात सातत्य राहिले, तरच काही प्रमाणात कांद्यासह इतर पिके येऊ शकतात.
दीर्घ प्रतिक्षेनंतर जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. कांदे, कपाशी पिके व अजून मुसळधार पाऊस झाला, तर रब्बीची पिकेही निघण्याचा आशावाद जागा झाला आहे.
पुढील आठ ते दहा दिवसांत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभाग व सोशल मीडियात हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. बळीराजा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात अवघ्या आठ-नऊ तासांत तब्बल ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ननाशी मंडळात तब्बल शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणेगाव, वाघाड व पालखेड धरण हाउसफुल झाले असले, तरी सर्वच धरणाच्या साठ्यात समाधानकारक वाढ होत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणातील साठा तालुक्यासह निफाड, येवला, चांदवडमधील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा होता. पण गुरुवारपासून सुरू असलेल्या व शुक्रवारीही संततधार बरसणाऱ्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
जवळपास सर्वच पिके पाण्यावाचून करपण्याच्या मार्गावर होती. पालखेड, वाघाड, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव या सर्वच धरणांत समाधानकारक साठा झाला, तर सकाळी कोरडे असलेले तिसगाव धरणात अवघ्या सात-आठ तासांत २२ टक्के भरले.
वाघाड धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असून, मध्यरात्रीच्या सुमारास ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असून, पालखेड धरण ८० टक्के भरले आहे.
आठ स्वयंचलित गेटमधून तीन हजार ३०० क्यूसेक पाणी कादवा पात्रात विसर्ग करण्यास सुरवात केली आहे. पावसाचा असाच जोर राहिल्यास यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
धरण पाणीसाठा
(सकाळी सहाला सायंकाळी पाचला)
पालखेड ५५ टक्के ८० टक्के
करंजवण ७१ टक्के ७९.४९ टक्के
वाघाड ८३ टक्के ९५ टक्के
पुणेगाव ९४ टक्के ९९.९४ टक्के
ओझरखेड ४७ टक्के ५३ टक्के
तिसगाव ००० २२ टक्के
नऊ मंडळात पडलेला पाऊस (सायंकाळी पाचपर्यंत)
दिंडोरी ७३ मिलिमीटर
रामशेज ६३.८ मिलिमीटर
ननाशी १०३ मिलिमीटर
उमराळे ६५ मिलिमीटर
लखमापूर ६६ मिलिमीटर
कोशिंबे ९७ मिलिमीटर
मोहाडी ५६ मिलिमीटर
वरखेडा ७८ मिलिमीटर
कसबे वणी ७२ मिलिमीटर
पेठ : तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. ऑगस्टअखेर टप्याटप्याने २०३. ८ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरी पर्जन्यमान ६६९.४ टक्के आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पडणाऱ्या पावसाने ओढ दिल्याने भातावर करपा पडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गुरुवारपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंत) ६१ मिलिमीटर पडल्याने आदिवासी शेतकरी राजा आनंदित झाला आहे.
२०२३-२४ अंतिम पीक पेरणी अहवाल
पीक सरासरी पेरणी टक्केवारी
भात १०६०१.०६- १२८१३.८०- १२०.८७
नागली ६१३९.०८- ५७६५- ९३.९१
वरई १५९४.९४- १९१०.७५- ११९.८०
तृणधान्य १८३३५.०८- २०४८९.५५- १११.७५
तूर १०३१.३५- ४७१.५०- ४५.७२
मूग ४८.८०- निरंक निरंक
उडीद २०८८.०६- १५५५.७० ७४.५०
कुळीद ११२८.६६- ६०७. ३० ५३.८१
कडधान्य- ४२९६.८७ २६३४.५० ६१३१
एकूण अन्नधान्य २२६३१.९५ २३१२४.०५ १०२.१७
भुईमूग १५४३.३२ ११६३.६० ७५.४०
सोयाबीन ५.६२ निरंक निरंक
खुरासणी १४८४.२४ ७२३.८५ ४८.७७
गळीत धान्य ८३.४० निरंक निरंक
एकूण गळीत धान्य ३११६.५८ १८८७.४५ ६०.५६
------------------------------------------------------------
एकूण खरीप हंगाम २५७४८.५३ २५०११.५० ९७.१४
एकूणच यंदाचा पीकपेरा अहवालावरून तालुक्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थिती चांगली असून, टप्पाटप्प्याने पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पेठमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंत ६२ मिलिमीटर, जोगमोडी ६२.४०, कोहोरमध्ये ४२ मिलिमीटर पाऊस झाला.
"मुख्य पीक भात आगाऊ लागवड झालेल्या ठिकाणी फुटवा परिस्थिती असून, ओढ दिलेल्या पावसामुळे काही प्रमाणात कडा करपा रोगाबाबत जागृती केली आहे. नागली, वरई, खुरासणी, तूर, उडीद, भुईमूग आदी पिकांवर किड, अळीचा प्रार्दुभाव नसून, आजमितीस समाधानकारक पिके आहेत. मात्र, टप्पाटप्पयाने पडणारा पाऊस टिकून राहयला हवा. ओढ दिलेल्यामुळे भात पीक उत्पादन १० ते १५ टक्के घटण्याची शक्यता आहे."
-अविनाश खैरनार, तालुका कृषी अधिकारी
खामखेडा : चणकापूर धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.
शुक्रवारी (ता. ८) चणकापूर धरणातून ३३ हजार व पुनंद धरणातून १६ हजार क्यूसेसचा विसर्ग सोडण्यात आला. धरण परिसरात खालच्या भागातून पाणी वाढल्याने गिरणा नदी दुथडी वाहत आहे.
दोन दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात पावसाने अधिक जोर दिल्याने धरणाच्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. पुनद व चणकापूर दोन्ही धरणांतून पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात आल्याने शुक्रवारी दुपारनंतर गिरणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते.
गिरणा नदीला पूर आल्याने पाण्याची पातळी वाढल्याने सावकी-विठेवाडीदरम्यान पुलावरून जवळपास दोन फुटांहून अधिक उंचीने पाणी वाहत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचनंतर हा पूल पाण्याखाली गेल्याने विठेवाडीहून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
देवळा पोलिस ठाण्यातर्फे पुलावर पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात आला होता. २०१३ नंतर पहिल्यांदा नदीच्या पाण्याची पातळी एवढी वाढल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांनी पूर पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
हा पूल पाण्याखाली गेल्याने सावकी व खामखेडा गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटलेला आहे. पूरपरिस्थितीमुळे नदीकाठावरील नागरिकांना धोक्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.