Pimplegaon Baswant MSRTC Depot : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे पिंपळगाव बसवंत आगार समस्यांनी मात्र बेजार असल्याचे दिसून येत आहे. एक ना अनेक समस्यांचा पीळ पिंपळगाव आगाराभोवती घट्ट बसला आहे. दिवसाला पाच हजार प्रवाशांना इच्छितस्थळी पोचविणाऱ्या व महिन्याकाठी सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या पिंपळगाव आगाराच्या सर्व ३८ बसेस धक्का स्टार्ट बनल्या आहेत.
बसच्या दुरावस्थेप्रमाणेच आगारात पायाभूत सुविधांचा वाणवा आहे. झाडाझुडपांनी वेढले गेलेले असल्याने बस आगार जंगलात आहे की काय असा प्रवाशांना भास होतो. आगाराबरोबरच बसस्थानकांच्या इमारतीत नियमित स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. छत गळतीमुळे पावसाळ्यात प्रवाशांना बसस्थानकात छत्री घेऊन बसण्याची वेळ येते. (Pimplegaon Baswant Depot in round of problems)
खिळखिळ्या ३८ बस देतात महिन्याला दोन कोटींचे उत्पन्न
परिवहन मंडळाचे तत्कालीन संचालक भास्करराव बनकर यांनी पिंपळगाव शहरासाठी बस आगार मंजूर करून घेतले. सन १९९५ मध्ये पिंपळगावला बस आगाराचा दर्जा मिळाला. मुंबई-आग्रा महामार्ग, निफाड-दिंडोरी-चांदवड अशा तीन तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र यामुळे पिंपळगाव आगाराच्या बसला सुरवाती पासूनच प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला.
अल्पावधीत जिल्ह्यातील उत्पन्नात पिंपळगाव आगार अव्वल ठरले असून ते स्थान आजही कायम आहे. ३८ बसेसच्या माध्यमातून महिन्याकाठी परिवहन मंडळाला तब्बल दोन कोटी रुपयांचे उत्पन्न पिंपळगाव आगार मिळवून देते. परंतु या सर्व बसेस आता खिळखिळ्या झाल्या आहेत.
चार फेऱ्यांनंतर प्रत्येक बस काही ना काही दुरुस्तीचे काम काढते. अनेकदा बसचा रस्त्यात बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. वारंवार मागणी करूनही अद्यापपर्यंत आगाराला नवीन बसची प्रतिक्षा कायम आहे.
आगाराच्या तांत्रिक विभागात स्पेअर पार्टचा तुटवडा
आगारातील अंतर्गत रस्ते उखडले
झाडाझुडपांनी परिसराला वेढले
देखभाल दुरुस्तीअभावी इमारतीची दुर्दशा
स्वच्छता होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग
प्रवासी दुर्गंधीमुळे त्रस्त
पुरेशा दिव्यांअभावी आगारात रात्री अंधार
हिरकणी कक्ष चार वर्षांपासून बंद अवस्थेत
जुन्या इमारतीला आले भूत बंगल्याचे स्वरुप
स्वच्छतागृहाच्या बाजूला रंगतो दारूड्यांचा अड्डा
डुकरे, जनावरांचा वावर
स्थानकात काही बस येत नसल्याने प्रवाशांची तारांबळ
निवारा शेडअभावी विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय
पिंपळगाव आगाराची स्थिती
बसेस -३८
फेऱ्या - २८७
अंतर -१३ हजार कि.मी.
मासिक उत्पन्न - दोन कोटी रूपये
दररोज प्रवाशांची संख्या - पाच हजार
चालक व वाहक संख्या - २०१
तांत्रिक कर्मचारी - ३९
"लांबपल्ल्याच्या बसेस पिंपळगाव स्थानकाला फाटा देऊन महामार्गावरून परस्पर नेल्या जातात. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसत आहे. त्या बसेस पिंपळगाव स्थानकात यायला हव्यात."- जुगलकिशोर राठी, प्रवासी
"ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझी परिवहन मंडळावर संचालकपदी नियुक्ती केल्यानंतर पिंपळगाव आगार मंजूर करून घेतले. उपलब्ध बसचे आयुष्य संपले असून तत्काळ नव्या बस मिळाव्यात. उत्पन्नात अव्वल असलेल्या पिंपळगाव आगाराला बस पुरविण्यात परिवहन मंडळाने सकारात्मक भूमिका घ्यावी."- भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत
"शासनाकडून निधी मंजूर करून पिंपळगाव आगारात अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण करण्यात आले. इमारतीची रोखण्याबरोबरच विविध देखभाल दुरूस्तीसाठी परिवहन मंत्र्याची भेट घेऊन समस्या मांडल्या जातील."- दिलीप बनकर, आमदार, निफाड
"बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. नव्या बसेसची मागणी केली आहे. उत्पन्न वाढीसाठी उपक्रम राबत असतो."- मनोज गोसावी, आगार व्यवस्थापक, पिपळगाव बसवंत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.