SAKAL Exclusive : शहरात मागील बारा दिवसांमध्ये प्राणघातक हल्ल्याचे सात गुन्हे दाखल झाले असून, चार गुन्हे तर नाशिकरोड, उपनगर हद्दीतीलच आहेत. यात गावठी कट्टा, चॉपर, कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. संशयितांना अटक होते, मात्र असे प्रकार थांबत नसल्याने आयुक्तांसमोर गुन्हेगारीला चाप लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बिनबोभाट सुरू असलेल्या अवैध धंदे अन् पार्सल पॉईंटस्वर धडक कारवाईचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिल्याने ‘वसुली’ धारकांचे धाबे दणाणले आहेत. ( Rising crime is challenge before Commissioner of city )
शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत परिमंडळ एकच्या तुलनेत परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. विशेषतः: प्राणघातक हल्ले आणि गंभीर स्वरूपाच्या हाणामारीच्या घटनांनी परिमंडळ दोन ‘हॉट’ ठरू पाहते आहे. गेल्या महिन्याभरामध्ये नाशिकरोड हद्दीत दोन प्राणघातक हल्ले अन् सहा गंभीर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
तसेच, अंबडमध्ये एक प्राणघातक अन् १० गंभीर मारहाणीच्या घटना, तर उपनगर हद्दीत दोन प्राणघातक हल्ले आणि पाच मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच, याच हद्दीमध्ये सलग टोळ्यांकडून दोन प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून अवैध धंद्यांच्या मुळावरच कारवाई होत नसल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
नाशिकरोड, उपनगराच्या हद्दीमध्ये रात्री-बेरात्री टवाळखोरांकडून सर्रासपणे कोयते, चॉपर, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांचा वापर मारहाणीच्या घटनांमध्ये होऊ लागला आहे. नाशिक रोड हद्दीत चहाच्या टपरीचालकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला तर, दाढेगावात संशयित कोयता घेऊन दोघांच्या मागे धावला. यामुळे गुन्हेगार, टवाळखोरांवर पोलिसांचा धाक नसल्याचीच चर्चा नाशिककरांमध्ये आहे. (latest marathi news)
पार्सल पॉइंट टोळक्यांचे अड्डे
शहरात चायनीज हातगाड्यांना रात्री १० वाजेपर्यंतच वेळ आहे. मात्र, असे असतानाही काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत चायनीज गाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री सुरू असते. विशेषतः: उपनगरीय परिसरात अशा हातगाड्यांवर मद्यपींना ‘पार्सल’ची विक्री केली जाते. अशी अनधिकृतरित्या सुरू झालेले पार्सल पॉईंट टोळक्यांचे, गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. मात्र, याकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे. परिणामी, रात्रीच्या हाणामारीच्या घटना यामुळेच वाढल्याचे बोलले जाते. यावर कठोरपणे कारवाईची आयुक्तांकडून अपेक्षा व्यक्त होते आहे.
तंबीनंतरही...
पोलिस आयुक्तांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभारी निरीक्षकांना कठोरपणे कारवाईची तंबी दिली होती. परंतु या तंबीनंतरही शहरातील अवैध धंद्यांवर पूर्वीइतका ‘अंकुश’ अद्याप आलेला नाही.
गुन्ह्यांची आकडेवारी (जूनमधील)
प्राणघातक हल्ले : नाशिकरोड - २, अंबड - १, उपनगर - २, पंचवटी - १, भद्रकाली - १, गंभीर वा मारहाण : इंदिरानगर - ६, नाशिकरोड - ६, अंबड - १०, उपनगर - ५, सातपूर - १,देवळाली कॅम्प - २ गंगापूर - ४, पंचवटी -४, भद्रकाली - ५, म्हसरुळ -१, मुंबई नाका - २, सरकारवाडा - १.
खून : पंचवटी - १, भद्रकाली - १, म्हसरुळ - १, मुंबई नाका - १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.