भाषासंवाद : विस्मृतीत चाललेल्या भक्तिसंवादाच्या साधनांची भाषा...

Latest Marathi Article : प्रत्येक कुटुंबातील भक्तिसंवादाचा शब्दसंग्रहदेखील समृद्ध होता. आज मात्र स्थिती नेमकी उलटी आहे. ही साधनांची नावेच नव्या पिढीला अवगत नसणे, हे मोठेच दुर्दैव आहे, ते बदलायला हवे.
Puja sahitya
Puja sahityaesakal
Updated on

लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे

सगुण भगवंताची पूजा म्हणजे भक्ताचा भगवंताशी मानससंवाद. या संवादाची साधने म्हणजे चौरंग, पूजेचा पाट, कुयरी, गंधपात्र, समई, नंदादीप, निरंजन, दिवा, तेल-वात, उदबत्तीपात्र, चंदन सहाण, दक्षिणापात्र, कलश, पंचपात्र, फुलपात्र, ताह्मण, पळी वगैरे वगैरे... सगुण भक्तिसंवादाची ही साधने पूर्वी घराघरांत वापरात होती.

वरील वस्तू घरात दिसणे आणि बोलण्यातून तेच शब्द कानावर पडणे, या दोन्हीही क्रिया होत होत्या. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील भक्तिसंवादाचा शब्दसंग्रहदेखील समृद्ध होता. आज मात्र स्थिती नेमकी उलटी आहे. ही साधनांची नावेच नव्या पिढीला अवगत नसणे, हे मोठेच दुर्दैव आहे, ते बदलायला हवे. (latest marathi article on forgotten means of devotional communication)

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका मराठी कुटुंबातील मोठ्या इंजिनिअरच्या बड्या घरात एका पूजेचे आयोजन केले होते. त्यासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याची गुगल सर्चवर शोधाशोध सुरू झाली. गुगलवर लिस्ट मिळाली; पण घरात पळी, पंचपात्र, ताह्मण आणि फुलपात्र वगैरे वगैरे, काही केल्या सापडेना.

इतक्यात त्या इंजिनिअरच्या लहान मुलीने त्याला पळी, ताह्मण आणि फुलपात्र कसे असते असे कुतूहलाने विचारले. सुदैवाने आयटी इंजिनिअरने त्याच्या लहानपणी या वस्तू बघितल्या होत्या आणि त्यासंबंधीचे शब्दही बऱ्याचदा ऐकले होते. त्याआधारे त्याने त्याच्या मुलीला बरेच वर्णन करून या गोष्टींचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मुलगी म्हणाली, ‘अच्छा म्हणजे कॉपर स्पून, कॉपर प्लेट आणि कॉपर, म्हणजे पळी, ताह्मण आणि फुलपात्र.’ इंजिनिअर हसला, पण काहीसा हताशही झाला आणि त्याच्या लक्षात आले, की या वस्तूंचे आपण कितीही वर्णन केले तरी जोपर्यंत आपण या वस्तू प्रत्यक्ष हिला दाखवत नाहीत, तोपर्यंत तिला त्यांचा अर्थ कळणार नाही.

मग या वस्तू दुसरीकडे कुठे मिळतात का म्हणून त्याने आपल्या दुसऱ्या एका इंजिनिअर मित्राला फोन केला. यावर कमाल अशी, की त्या बहादराने तर ही नावेही ऐकलेली नव्हती. अशारीतीने एक सार्थ पूजापाठ निरर्थक होत कसाबसा पार पडला. ही आजची परिस्थिती आहे.

भौतिक संपत्ती भरपूर आहे, पण शब्दांच्या संपत्तीचे काय? नव्या पिढीने श्रद्धा ठेवावी की नाही, हा इथे प्रश्न नाही; परंतु निदान स्वतःच्या विचारांवर श्रद्धा बसावी, ती शब्दांत मांडता यावी यासाठी जी संस्कारयुक्त किमान शब्दसंपदा लागते तीही या पिढीपर्यंत पोचू नये, हे दुर्दैव आहे.

त्या-त्या क्षेत्रातील शब्दसंपदा त्या-त्या क्षेत्राशी संबंधित लोकांना माहिती असते, हा भाग निराळा; पण कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था हेदेखील संस्कारांचे एक क्षेत्र आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये जीवनमूल्ये व संस्कृती जपणारी किमान शब्दावली टिकून राहणे, हे आज आव्हानस्पद झाले आहे. (latest marathi news)

Puja sahitya
सह्याद्रीचा माथा : 'हर घर जल' योजनेला लागली घरघर

सगुण भगवंताची पूजा म्हणजे भक्ताचा भगवंताशी मानससंवाद. या संवादाची साधने म्हणजे चौरंग, पूजेचा पाट, देव्हारा, आसन, कुयरी, गंधपात्र, समई, नंदादीप, निरंजन, दिवा, तेल-वात, कापूर आरती, उदबत्तीपात्र, चंदन सहाण, चंदन खोड, अष्टगंध, बुक्का, घंटा, तुळशी वृंदावन, देवाचे दागिने, मुकुट, दक्षिणापात्र, दानपेटी, कलश, पंचपात्र, फुलपात्र, ताह्मण, पळी, गंधाची तबकडी, धूपपात्र वगैरे वगैरे... सगुण भक्तिसंवादाची ही साधने पूर्वी घराघरांत वापरात होती.

वरील वस्तू घरात दिसणे आणि बोलण्यातून तेच शब्द कानावर पडणे, या दोन्हीही क्रिया होत होत्या. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील भक्तिसंवादाचा शब्दसंग्रहदेखील समृद्ध होता. पूर्वी प्रत्येक घराला एक हक्काचा, स्वतंत्र आणि प्रशस्त देव्हारा असायचा. ज्याप्रमाणे आपल्याला राहायला घर मिळाले, त्याच हक्काच्या घरात देवाचेही पवित्र घर असावे, ज्याप्रमाणे आपल्याला सुखसाधने लाभली आहेत त्याचप्रमाणे भगवंताचीही पूजासाधने समृद्ध असावीत, इतकी साधी भावना त्यामागे असायची.

देव्हारा म्हणजे फक्त ‘एक वेगळी जागा’ इतकेच नव्हते, तर तो एक संस्कारसोहळा असायचा, ती एक दुःख हलके करण्याची, मनःशांतीच्या वातावरणात नेणारी हक्काची जागाही असायची. ‌आज नव्या पिढीतील नव्या घरकुलांमधून अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात; परंतु घरातील सगुण मूर्तीच्या भक्तीसाठी पूजागृहाची किंवा देव्हाऱ्याची तरतूद मात्र अभावानेच केली जाते. त्यामुळे देव्हारा आणि त्याचे आजूबाजूचे

वरील बरेच शब्द कालबाह्य होत चाललेले आहेत. आस्तिक असो अथवा नास्तिक, प्रत्येक मनाला शांत व्हावेसे वाटते आणि त्यासाठी एक श्रद्धास्थान असावे लागते. नास्तिकांचे मला माहिती नाही; पण आस्तिकांसाठी भौतिकदृष्ट्या सहज हाताशी असलेले हे घरातले श्रद्धास्थान म्हणजे देव्हारा.

या श्रद्धास्थानाची देखभाल करणारी वरील साधने एकेक करून नामशेष होत आहेत आणि त्याच्या आजूबाजूचा शब्दसंग्रह देखील. ईश्वराचे अस्तित्व नाकारणे किंवा स्वीकारण्याची प्रगल्भता अनुभवयुक्त आत्मचिंतनातून येते. हा अनुभव शब्द आणि ओळख या दोन्ही पातळ्यांवरून घेता येतो.

उदा. समई, नंदादीप, निरंजन, दिवा, तेल-वात, कापूर आरती, उदबत्तीपात्र अशा शब्दांना आपण तेव्हाच मान्यता देतो जेव्हा त्या वस्तूंची आपल्याला ओळख होते किंवा आपण त्या हाताळतो. निर्गुण निराकार ईश्वराची आराधना करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्याच्या सोयीसाठी ईश्वर कसा दिसत असेल याची कल्पना करून, त्या कल्पनेबरहुकूम विविध पूजासाधने घडवली गेली आणि घरगुती देव्हाऱ्यात पूजाविधी सुरू झाले.

त्या काळात मानसशास्त्र या विषयाला वैद्यकीय क्षेत्रात विशेष स्थान नव्हते; पण साधनांनी मन एकाग्र झाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही, तसेच त्याची शक्ती फुलत नाही, हे माहिती होते. मनाला ज्या साधनांच्या सहाय्याने एकाग्र करता येईल अशी साधने विकसित होऊ लागली. (latest marathi news)

Puja sahitya
मध्य वर्तुळाचा, परीघ वर्तुळाचा...!

भारतीय अध्यात्म क्षेत्राने या साधन विकासात भरपूर प्रगती केली असे दिसते. पूर्वीच्या जाणकार विद्वानांनी असा विचार केला असावा, की हे साधन म्हणजे एखादी अशी वस्तू असावी जिच्या आकाराकडे पाहून साधकाला स्वतःच्या मनाचा आकार बघता यावा, गुण-दोषांचे चिंतन करता यावे, मनाने स्वतःच्या सुख-दुःखाचे ध्यान न करता भगवंताचे ध्यान करावे म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मनाला गुंतवून ठेवणारी ही पूजासाधने लोकप्रिय झाली असावीत.

मन एकाच वेळी दोन ठिकाणी राहात नाही, म्हणून अन्यत्र धावणारे मन साधनांच्या सहाय्याने एकाग्र करण्यासाठी ही साधने व त्यासंबंधीचा शब्दसंग्रह रूढ होत गेला. वास्तविक, या शब्दसंग्रहाला भारतीय अध्यात्माचे अधिष्ठान आहे. आज मात्र या शब्दसंग्रहाकडे रूढीवादी, परंपरावादी, बुरसटलेला आणि कालबाह्य शब्दसंग्रह म्हणून बघितले जाते आहे, म्हणून आजच्या आधुनिक काळात, या व अशा शब्दसंग्रहाची पीछेहाट होताना दिसत आहे.

आता हेच बघा ना, याच क्षेत्रातील ‘सहाण’ ही वस्तू आजच्या पिढीतील बहुतांश लोकांना माहिती नाही, तिचा शब्दही आणि अर्थही माहिती नाही. छोट्या पोळपाटासारखी पृष्ठभाग खरखरीत असलेली ही सुंदर वस्तू. यावर सुकलेले चंदनाचे खोड पाणी टाकून, थोडा दाब देऊन वर्तुळाकार फिरवितात. याला ‘चंदन उगाळणे’ असे म्हणतात. चंदन हे गुणधर्माने शीतल आहे.

सहाणीवर त्याच्या खोडाचे घर्षण होऊन त्याचे अत्यंत सूक्ष्म कण पाण्यात मिसळल्यामुळे गंध तयार होते. हे गंध देवास लाविले जाते; तसेच पूजा करणारा ते आपल्या कपाळास दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावर लावतो. त्याने मन शांत व एकाग्र होते. इतके सगळे फायदे असूनही आजच्या जीवनशैलीला ‘सहाणीवर गंध उगाळणे’ या क्रियेचा विसर पडावा याचे आश्चर्य वाटते. या ठिकाणी दत्त परंपरेतील अतिशय सुंदर पद आठवते ते असे-

करुनी मनाची सहाण, भक्ती जल ते वर घालून,

षटरिपू खोड उगाळून, अहंकार तो दूर सारून,

हरीला लावा तुम्ही गंध, केशर कस्तुरी सुगंध...

किती सुंदर भावार्थ आहे ! उगाच कुणाचे तरी दोष उगाळीत बसण्यापेक्षा, स्वतःच्या मनाची सहाण करून ते अशाप्रकारे शांत करणे बरे नाही का? सहाणीप्रमाणेच पूजेच्या प्रत्येक वस्तूमागे काहीतरी भावार्थ दडलेला आहे. सगुण पूजेची उपासना करणाऱ्या काही परंपरांमध्ये आजही या भावार्थाला धरून पूजा केली जाते. शब्दवैभवाच्या सहाय्याने हे आत्मवैभवाचेच जतन नाही का?

(क्रमशः)

Puja sahitya
५० टक्क्यांची आरक्षणकोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.