राजवंश भारती : गुहिल (गहलोत) वंश

Latest Marathi News : आटपूर (अहार) येथील शिलालेखात गुहदत्तापासून शक्तिकुमारापर्यंत एकूण २० गहलोतवंशीय शासकांची नावे नोंदलेली आहेत. ‘रावळ’ हे एकप्रकारे पदनाम असून, ते ‘राजा’ला समानार्थी आहे.
Statue of Bappa Rawal & Lord Eklingaji Temple, Udaipur
Statue of Bappa Rawal & Lord Eklingaji Temple, Udaipuresakal
Updated on

लेखक : ॲड. सुशील अत्रे

राजपूत समाजामध्ये जे प्रमुख राजवंश होऊन गेले, त्यातला आद्य म्हणावा, असा वंश म्हणजे ‘गुहिल’ अथवा ‘गहलोत वंश.’ ‘मेदपत’, म्हणजेच आजचा राजस्थानमधील मेवाड प्रांत, हे गुहिल वंशाचे उगमस्थान आहे. ‘गुहदत्त’ किंवा ‘गुहिल रावळ’ हा या वंशाचा आद्यपुरुष मानला जातो.

त्याने इ. स. ५६५ च्या सुमारास मेवाड राज्याचा पाया घातला. आटपूर (अहार) येथील शिलालेखात गुहदत्तापासून शक्तिकुमारापर्यंत एकूण २० गहलोतवंशीय शासकांची नावे नोंदलेली आहेत. ‘रावळ’ हे एकप्रकारे पदनाम असून, ते ‘राजा’ला समानार्थी आहे. (saptarang latest article Guhil Gahlot dynasty)

गुहिल घराण्यातील राजा नागादित्य याने सातव्या शतकात ‘नागदा’ हे शहर वसवले. ही मेवाडची पहिली राजधानी होती. हे गाव आज उदयपूरजवळ आहे. नंतर ही राजधानी अल्लाता रावळ याने उदयपूरमधील भाग ‘अहर’ येथे इ. स. ९४८ मध्ये हलवली होती. गहलोत वंशाच्या कालांतराने दोन शाखा तयार झाल्या. त्यापैकी नागदा-अहर येथून राज्य करणारी शाखा ही ‘थोरली पाती’ होती. ‘नागदा गुहिल’ याच नावाने ती ओळखली जाते.

या वंशातील राजा राणासिंह याचा मुलगा रहापा याने १३ व्या शतकाच्या सुरुवातीला मेवाडमधील महासमंद प्रदेशात ‘शिसोदा’ हे गाव वसवले आणि तिथून आपली वेगळी राजशाखा सुरू केली. त्या वंशातील राजांना ‘रावळ’ न म्हणता ‘राणा’ हे नामाभिधान होते. गुहिलांची ही शाखा ‘शिसोदिया वंश’ म्हणून ओळखली गेली. आपल्या छत्रपती शिवरायांची वंशावळसुद्धा याच शिसोदिया कुळापर्यंत मागे जाते.

मेवाडची राजधानी आधी अन्यत्र असली तरी मेवाडचे नाव कायम जोडले जाते ते ‘चितोडगडाशी’! अनेक ऐतिहासिक महान व्यक्ती आणि प्रसंग या चितोडगडाशी संलग्न आहेत. आठव्या शतकातील महान राजपूत राजा ‘बाप्पा रावळ’ यांनी चितोडगड ताब्यात घेतला. बांधला नाही. तो बांधला होता, मोरी- मौर्य राजपूत ‘चित्रांगद’ याने.

चितोडचे आधीचे नाव चित्रकूट किंवा चित्रोर होते. बाप्पा रावळांनी तो दुर्ग इ. ह. ७२८-३० च्या आसपास ताब्यात घेतला आणि ती मेवाडची राजधानी केली. तसे बघितले, तर गुहिल वंशाचा संस्थापक गुहदत्त आहे. पण बाप्पा रावळ हेच सर्वार्थाने गहलोत ‘राज्यस्थापक’ म्हणता येतील.

त्यांचे मूळ नाव ‘कालभोज.’ पण त्यांच्या प्रजाहितदक्ष स्वभावामुळे लोक त्यांना वडिलांचा मान देत; म्हणून त्यांचे नाव ‘बाप्पा’ असे रूढ झाले. पहिल्या अरबी आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार करणारा आणि त्यासाठी हिंदू राजांची एकजूट करणारा दूरदर्शी शासक म्हणून ‘बाप्पा रावळ’ अजरामर आहेत. त्यांचे विश्वसनीय समकालीन चरित्र उपलब्ध नाही. पण त्यांच्याभोवती अनेक दंतकथा घुटमळताना दिसतात. (latest marathi news)

Statue of Bappa Rawal & Lord Eklingaji Temple, Udaipur
भूमिकांचा अभ्यासू शोध..

पौराणिक ‘हरितऋषी’ हे कालभोजाचे गुरू व मार्गदर्शक झाले, अशी कथा सांगतात. त्यांच्या आदेशानुसार बाप्पांनी भगवान शंकराची तपस्या केली. राजपूतांचे परम दैवत असणारे शंकराचे रूप- भगवान एकलिंगजी यांचे मूळ मंदिर उभे केले, तेही बाप्पा रावळांनीच. ते काळाच्या ओघात तोडले गेले, पुन्हा उभारले गेले... ही गोष्ट वेगळी. मात्र आज हे मंदिर उदयपूरजवळ कैलासपुरी या गावात आहे. ‘एकलिंगजी महात्म्य’ या काव्यात बाप्पा रावळांच्या कथा दिलेल्या आहेत.

बाप्पा रावळांचा वंशज खुमान रावळ-२ हे गुहिल राजवटीतील आणखी एक भव्य शिखर आहे. बाप्पांनंतर एका शतकाने इ. स. ८२८ मध्ये खुमान-२ सत्तेवर आला. तो कमालीचा शूर लढवय्या होता. सिंध प्रांताला अरबांकडून असलेला धोका तो चांगलाच ओळखून होता. अब्बासी खिलाफतीचे थोडे थोडके नव्हे, तर २४ अरबी हल्ले खुमान रावळाने परतवून लावले होते.

या परकीय आक्रमकांविरुद्ध त्याने ३८ राजपूत राजांची विक्रमी फळी तयार करून त्या संयुक्त सेनेचे नेतृत्वही केले होते. सिंध प्रांतावर त्याने सतत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले आणि तो जिवंत असेपर्यंत त्याने अरबांना भारतात घुसू दिले नाही. त्याच्या पराक्रमामुळे पुढेही जवळजवळ तीनशे वर्षे मेवाड प्रदेश अरबांपासून सुरक्षित राहिला.

दुर्दैवाने इतर काही राजवटींप्रमाणेच रावळ राजांचे शिलालेख, ताम्रपट वगैरे फारसे सापडत नाहीत. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास हा शाहिरी काव्यातून, भाट कथांमधून कळतो. पण हे ‘ऐतिहासिक स्रोत’ मानले जात नाहीत. आता हेच बघा ना खुमान रावळची एवढी मोठी कारकीर्द, इतक्या लढाया आहेत; पण अधिकृत नोंद फक्त एका लढाईची आहे. ‘पृथ्वीराज रासो’प्रमाणे ‘खुमान रासो’ हे दलपत विजय नावाच्या कवीचे एक प्रशस्तिकाव्य आहे, त्यावरून खुमानचा इतिहास समजतो. (latest marathi news)

Statue of Bappa Rawal & Lord Eklingaji Temple, Udaipur
तुला पाहते रे

आटपूर, चितोड, आबू आणि कुंभलगड येथील शिलालेखांवरून गुहिल वंशावळीची माहिती आपल्याला मिळते. स्वत: गुहदत्तापासून राणासिंहापर्यंत ३५ राजे- रावळ- गुहिल वंशाचे आहेत. इ. स. १२२३ नंतर दोन शाखा तयार झाल्या. त्यानंतरही मूळ नागदा शाखेचे आणखी नऊ शासक होऊन गेले. रत्नसिंह हा त्यांच्यातील शेवटचा होता.

इ. स. १३०२ मध्ये तो गादीवर आला. लगेच १३०३ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने चितोडवर आक्रमण केले. या लढाईत चितोडगड पडला. खिलजीने तीस हजारांपेक्षा जास्त हिंदूंची कत्तल केली. आपला भाऊ खिज्रखान याच्या ताब्यात चितोडगड दिला. चितोडला ‘खिज्राबाद’ असे नाव दिले. अमीर खुस्रो हा लेखक, कवी तेव्हा खिलजीसोबत होता.

त्याने चितोडच्या नरसंहाराचे मोठे काव्यात्मक आणि खिलजीच्या कौतुकाने भरलेले वर्णन करून ठेवले आहे. महाराणी पद्मिनीने ‘जोहार’ केला म्हणतात, तो याच प्रसंगी! आता जरा राणी पद्मिनी विषयी- ही खरोखर ऐतिहासिक व्यक्ती असल्याचा पुरावा नाही. बहुतांश इतिहास संशोधक तिला काल्पनिक व्यक्तिरेखा मानतात.

मलिक मुहम्मद जैसी या कवीने १५४० मध्ये ‘पद्मावत’ हे महाकाव्य अवधी भाषेत रचले. त्यात पहिल्यांदा ‘पद्मिनी’ अवतरली. इतरही जुन्या काव्यांमधे ‘पद्मिनी’चा उल्लेख येतो. अर्थात केवळ काव्यात आहे, म्हणून ती व्यक्तीच काल्पनिक, हा निष्कर्ष चुकीचा आहे. पण आजमितीला तरी पद्मिनीच्या असण्याचा ऐतिहासिक पुरावा मिळालेला नाही; त्यामुळे ती खरी की काल्पनिक, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच राहतो. गुहिलांची दुसरी शाखा म्हणजे शिसोदिया वंशाची माहिती आपण स्वतंत्रपणे घेऊ. 

Statue of Bappa Rawal & Lord Eklingaji Temple, Udaipur
खजुराहोतील सर्वोत्तम मंदिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.