मनमाड : खासदार भास्कर भगरे यांच्या रूपाने महाविकास आघाडीने विजयी जल्लोष केला खरा; मात्र नांदगाव तालुक्यात भाजपच्या डॉ. भारती पवार यांना मोठे मताधिक्य मिळाल्याचे आकडेवारीतून दिसून आले. यात आमदार सुहास कांदे यांचा मोठा प्रभाव आणि वरचष्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभेसाठी अधिक परिश्रम आघाडीला करावे लागणार आहे हे नक्की. (Nashik News)
आजच्या स्थितीनुसार आमदार कांदे यांची रणनीती आणि नियोजनामध्ये सरस असल्याचे दिसून आल्याने महाविकास आघाडीसमोर भविष्यात आव्हान उभे राहणार आहे. महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले असून, नांदगाव तालुक्यातून डॉ. भारती पवार यांना १ लाख ३ हजार इतके, तर भास्कर भगरे यांना ६१ हजार ३३६ इतकी मते मिळाली.
यामध्ये आमदार कांदे यांनी पवार यांना मताधिक्य देण्याचा केलेला संकल्प तडीस नेला असून, भगरेंना मिळालेल्या मतांपेक्ष डॉ. पवार यांना ४१ हजार ६६५ इतकी मते जास्त मिळाली आहे. तर महाविकास आघाडी आणि भगरे यांच्या प्रचाराची तालुक्याची धुरा असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी भगरे यांना ६१ हजारांच्यावर मते पडून देण्यात यश आले.
डॉ. पवारांच्या पराभवाचा विचार केला तर त्यांना केंद्रात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. केंद्र सरकार आणि भाजप पक्षात चांगले वलय असतानाही नांदगाव तालुक्याच्या दृष्टीने त्या अपयशी ठरल्याचे दिसून आले. आमदार कांदे यांनी अतिशय गांभीर्याने आणि पुढच्या निवडणुकीची तयारी म्हणून ही निवडणूक हाताळली. प्रचार यंत्रणेपासून पोलिंग एजंटपर्यंत सूक्ष्म नियोजन केले. याशिवाय केलेली विकासकामे जनतेसमोर प्रकर्षाने ठेवली. (latest marathi news)
मतदानाच्या दिवशी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम दिसून आला. या तुलनेने महाविकास आघाडीमध्ये शिथिलता दिसून आली. महाविकास आघाडी आणि भगरे यांच्या प्रचाराची तालुक्याची धुरा सांभाळणाऱ्या जिल्हाप्रमुख गणेश धात्रक गटाकडे मनमाड शहरात जास्त नगरसेवक आणि तालुक्यात शिवसेना उबाठा.
राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे असतानाही स्थानिक पातळीवर मतदानात रूपांतर झाले नाही. याशिवाय भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे. त्याचे मतदान शहरातून डॉ. पवारांना एकगठ्ठा झाले. मात्र, दलित, अल्पसंख्यांक आणि इतर घटक वगळता दुसऱ्या घटकातून अपेक्षित मतदान विजयी उमेदवार श्री.भगरे यांना होऊ शकले नाही, असे म्हणता येईल.
शिवाय मतदानाच्या दिवशी दुपारनंतर अनेक ठिकाणी झालेल्या घडामोडी या मतदानाची टक्केवारी वाढण्यात कारणीभूत ठरल्याची देखील चर्चा असून, त्यातून देखील मताधिक्य वाढले गेले. दरम्यान, या सर्व मिळालेल्या आकडेवारीचा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीवर काही परिणाम होतो का, याची खमंग चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे.
नाराजी ठरली पराभवाला कारण
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते. येथील हक्काची रेल्वे गेली. त्याचा फटका डॉ. पवार यांना बसला आणि भगरे यांचा विजय झाला असला तरी त्यांना तालुक्यातून पाहिजे, तशी आघाडी मिळाली नाही. तसेच, मतदारसंघात डॉ. भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असूनही आमदार सुहास कांदे यांनी आघाडी कायम ठेवण्यात यश मिळविले.
शेतकऱ्यांची नाराजी बघता भगरे यांना तालुक्यातून लिड मिळेल, असा अंदाज होता. परंतु, तसे चित्र दिसले नाही. त्यामुळे मनमाड, नांदगांव आणि ग्रामीण भागात आमदार कांदेचाच करीष्मा चालतो हे सिद्ध झाले हे तितकेच खरे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.