जुने नाशिक : अवघ्या २४ तासांमध्ये शहर पोलिस आयुक्तालयाच्या (Police Commissioner office) हद्दीतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने शहर खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे. लागोपाठ झालेल्या खुनाच्या घटनेने शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तिन्ही खुनाची उकल करत यातील संशयितांच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nashik shaken by murder incidents Nashik News)
शहरातील दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (ता. १८) रात्री चोवीसवर्षीय यश गांगुर्डे या उभा असताना संशयित मयूर शिवचरण, सूरज गांगुर्डे आणि दोघा जणांनी तिथे येत यश यांच्यासोबत वाद घातला. संशयितांपैकी एकाने चॉपरने यशवर वार करत त्याचा खून केला. या वेळी पोलिसांनी तत्काळ संशयितांच्या मागावर जात संशयितांना ताब्यात घेतले. दुसऱ्या घटनेत गुरुवारी (ता. १९) रात्री प्रथमेश खैरे या तरुणाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगताना मिळून आला होता. प्रथमदर्शनी पोलीसांना त्याच्या अंगावर वार झाल्याचे कुठलेच लक्षणे दिसून आली नव्हते. त्यानंतर शवविच्छेदनामध्ये त्याच्या डोक्यावर वार झाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावल्याने तिघे यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यातील दोघे फरार झाले असून, एकास ताब्यात घेतले आहे. संशयित हा मयत प्रथमेशचा मित्रच असून, वडिलांकडे आपल्या चुगल्या करतो म्हणून प्रथमेशला दुचाकीवरून घेऊन जात तिघा संशयितांनी मारहाण करत मारल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले.
तिसरी खुनाची घटना शुक्रवारी (ता.२०) सकाळी द्वारका परिसरातील पोर्णिमा बस स्टॉप येथे घडली. पुणे येथील हरीश भास्कर पाटील (४९, रा. वारजे जकात नाका, पुणे) यांचा वादातून खून करण्यात आला. भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात घटनेची उकल करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. एक संशयित फरार आहे. मयत हरीश पाटील पुणे येथे वातानुकूलित यंत्र दुरुस्ती करण्याचे काम करतात. शुक्रवारी सकाळी आईला भेटण्यासाठी ते आले होते. द्वारका भागात बसमधून उतरून पायी घराकडे जात होते. मद्याच्या नशेत असलेल्या संशयितांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने संशयित आणि हरीश पाटील यांच्या वाद झाला. त्यानंतर एकाने हरीश पाटील यांच्यावर धारदार चाकूने वार केले.
पाटील रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच संशयितांनी तेथून पळ काढला. माहिती पोलीसांना मिळताच पोलिस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, दत्ता पवार, आचल मुदगल, दिलीप ठाकूर, विजय ढमाळ, आनंद वाघ, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक गवळी, श्री. पवार यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून संशयितांची ओळख पटली. संशयित विहीतगाव येथे असल्याची माहिती मिळताच संशयित अशोक दत्ता हिंगे (१९), नदीम सलीम बेग (२३), रोहित अशोक पताड (१९), शुभम दिलीप घोटेकर (२०, सर्व रा. विहीतगाव) अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.
दारू पडली महागात
संशयितांनी मद्यसेवन केले होते. नशेत दोन दुचाकीवर संशयित शहरभर फिरत होते. दरम्यान, घटनेच्या काही वेळापूर्वी त्यांनी भद्रकाली परिसरात चहा घेत विहीतगावच्या दिशेने घरी परतत होते. मृत पाटील यांना त्यांच्या दुचाकीचा कट लागला. त्या वादातून रागाच्या भरात घटना घडली. दारूने संशयितांना आत टाकले.
वाढदिवसाच्या पंधरा दिवसापूर्वीच खून
मृत हरीश पाटील यांचा पुढील महिन्यात ४ जूनला वाढदिवस होता. अवघे पंधरा दिवसांवर वाढदिवस असताना त्यांचा खून झाला. त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
गुन्हेगारीवर लगाम नाही...
शहरात मागील काही दिवसांमध्ये वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधक कारवाया केल्या जात आहे. यामध्ये नाकाबंदी आणि कोम्बिग ऑपरेशन राबविले जात आहे. मात्र, अद्याप यातून गुन्हेगारीवर लगाम बसलेला नाही. आम्ही आता यावर अवलंबून नसून इतर उपाययोजना वाढविल्या जाणार आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पहाटे, रात्री होणाऱ्या चोऱ्यांसह आता दुपारीदेखील भामटे घरात घुसून सोने ओरबाडत आहेत. पत्ता विचारण्याचा किंवा बहाणे देण्याच्या पॅटर्नवरून पोलिसांनी काही संशयितांचा माग काढला आहे. यामध्ये इराणी टोळ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याबाहेर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले
"तिन्ही खुनाच्या घटना छोट्या कारणातून घडल्या आहेत. यातील संशयितांना पकडण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधक कारवाई केली जात आहे. यासाठी रेकॉर्डवरील सराईत यांनादेखील ताब्यात घेतले जाऊन चौकशी केली जाईल."
- जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.