Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या सहायक कुलसचिवपदाचा पदभार श्रीपाद बुरकुले यांनी शुक्रवारी (ता.२३) स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती जाहीर झालेली होती. अखेर त्यांनी जबाबदारी स्वीकारताना कामकाजाला सुरवात केली आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य तथा उपकेंद्र विकास समिती अध्यक्ष सागर वैद्य यांच्या प्रयत्नांमुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. ()
शुक्रवारी बुरकुले यांनी उपकेंद्राच्या कार्यालयात दाखल होताना पदभार स्वीकारला. या प्रसंगी सागर वैद्य, प्रभारी समन्वयक प्रा. डॉ. सानप, उपपरिसर समितीचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. यापूर्वी २६ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्र अधिक सक्षम, विद्यार्थी उपयोगी व्हावे, यासाठी दोन्ही उपकेंद्रांना सहायक कुलसचिव दर्जाचा वर्ग एकचा अधिकारी देण्याची मागणी केली होती.
यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून निवड प्रक्रिया सुरू होती. या दोनही पदाची जाहिरात, अर्ज छाननी, मुलाखत आदी प्रक्रिया पार पडली. गेल्या २५ जानेवारीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि सागर वैद्य यांच्या निवड समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नाशिक उपकेंद्रासाठी श्रीपाद बुरकुले यांची निवड जाहीर केली होती.
श्रीपाद बुरकुले यांनी पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभाग, पीएच.डी. विभाग, सेट विभागात सहायक कुलसचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. अनुभवी अधिकारी लाभल्याने नाशिक उपकेंद्र अधिक विद्यार्थीभिमुख, सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
''विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रांच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उपकेंद्राला पहिला वर्ग एकचा प्रशासकीय अधिकारी मिळाला आहे. विद्यापीठाच्या आगामी वर्षातील उज्वल प्रगतीची, विद्यार्थीभिमुख तसेच प्राध्यापक, संस्थाचालकांच्या हिताच्या कामकाजाला गती येईल. लवकरच नाशिक उपकेंद्र विद्यापीठ कॅम्पस म्हणून नावारूपाला येण्यास मदत होईल. भविष्यातील नाशिकच्या विद्यापीठाच्या निर्मितीची ही पायाभरणी आहे.''- सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य
''विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इतिहासातील पहिला अधिकारी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद होतो आहे. आगामी काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कार्यान्वयन करणे, नाशिक कॅम्पसमध्ये अधिकाधिक रोजगार देणारे अभ्यासक्रम सुरू करणे, विद्यापीठ घटकांच्या सोयीसुविधा वाढविण्यावर भर राहील.''- श्रीपाद बुरकुले, सहायक कुलसचिव. (latest marathi news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.