सिन्नर : लोकसभेच्या निवडणूक निकालाची तारीख जवळ येत आहे, तशी नाशिकमधील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नाशिक शहराबाहेर वास्तव्य असणारा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांना सामोरे गेले. शहरी मतदार राजाभाऊंना कितपत स्वीकारतील, याबाबत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे अंदाज आहेत. (Sinnar Assembly Constituency)
मात्र, शहरी भागातील मतदानाची घटलेली टक्केवारी आणि राजाभाऊ वाजे यांच्या होमग्राउंडवर अर्थातच सिन्नरमध्ये झालेले ७० टक्क्यांपर्यंतचे निर्णायक मतदान भाव खाऊन गेले आहे. नाशिकच्या खासदारकीच्या निवडणुकीत सिन्नरचे पारडे नक्कीच जड भरणार असून, सिन्नरमध्ये वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाला तारणार आणि कोणाला मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
सिन्नरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात अंतिम क्षणी हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार राहिले. गोडसे दहा वर्षे खासदार असल्याने ते संपूर्ण मतदारसंघात परिचित चेहरा होते; तर राजाभाऊंच्या प्रसिद्धीचे वलय केवळ सिन्नर तालुका आणि लगतच्या इगतपुरीतील टाकेद गटापुरते मर्यादित होते.
अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून प्रचाराची प्रभावी रसद पुरवली गेली. सिन्नरमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकजुटीने राजाभाऊंच्या प्रचारासाठी हातात हात घालून कामाला लागले. त्याचा परिणाम म्हणून गोडसे, भुजबळ की आणखी कोणी अशी उमेदवारीची खलबते सुरू असताना राजाभाऊ मात्र घराघरांत आपली छबी पोहोचविण्यात यशस्वी ठरले. शहरी भागातही कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केला. (latest marathi news)
इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी भागात तर ‘टेंभा’ या बोलीभाषेतील नावाने मशाल ही निशाणी सर्वांच्या डोळ्यांत भरली. महायुतीच्या विरोधात असणारी शेतकरी व सर्वसामान्य मतदारांमधील नाराजी, गोडसेंच्या प्रचार यंत्रणेत असणारा समन्वयाचा अभाव, सत्ताधारी असलेल्या पाच आमदारांचा प्रचारातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाचा अभाव या बाबी निश्चितच दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
नाशिकमध्ये मतांची कमी झालेली टक्केवारी आणि सिन्नर, इगतपुरीसह ग्रामीण भागात वाढलेला मतदानाचा टक्का नक्कीच कोड्यात टाकणारा आहे. सिन्नर ही वाजे यांची कर्मभूमी. वाजे घराण्याचा मोठा लौकिक सिन्नरमध्ये आहे. त्यामुळेच विरोधकही मतभेद विसरून राजाभाऊंना लोकसभेत पाठवायचे, या विचाराने एकत्र आले. आमदार ॲड. माणिकराव कोकाटे हे वाजे यांचे कट्टर विरोधक.
मात्र, तेही गोडसे यांच्या प्रचारापासून तटस्थ राहिल्याने मतदारांनीही काय तो बोध घेतला. सिन्नरमधून राजाभाऊ वाजे यांना निर्णायक आघाडी मिळेलच. एकूण, झालेल्या मतदानात किमान ७० टक्के मते राजाभाऊंच्या पारड्यात पडतील, असा अंदाज आहे. तसे घडल्यास सिन्नरच्या राजकारणाला निश्चितच नवी दिशा मिळेल. कारण, मागच्या निवडणुकीचा धांडोळा टिपला तर अपक्ष असणारे स्थानिक उमेदवार माणिकराव कोकाटे यांना सर्वाधिक ९१ हजार मते मिळाली होती.
त्या खालोखाल गोडसे यांनी राजाभाऊ वाजे यांच्या मदतीने दुसऱ्या क्रमांकाची ५४ हजार मते घेतली; तर भुजबळ ३९ हजार मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले होते. या निवडणुकीत कोकाटे, भुजबळ यांची भूमिका लपून राहिलेली नाही. गोडसे यांना ‘एकला चलो रे’ म्हणत मतांचा जोगवा मागावा लागला. त्यामुळेच मतांच्या वाढलेल्या टक्केवारीत वाजे यांच्यासाठी सहानुभूती अधिक असल्याचे जाणवते.
सिन्नरमधील मतदारांची ही सहानुभूती वास्तवात उतरली तर येथे मिळणारी निर्णायक आघाडी वाजे यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. सिन्नरमधून सव्वा लाखांची आघाडी राजाभाऊंनी घेतली, तरी इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही आघाडी भरून काढणे गोडसे यांना जड जाऊ शकते. तसे घडल्यास सिन्नरमधील निर्णायक मतदान व येथून स्थानिक उमेदवाराला मिळणारी आघाडी नाशिकच्या खासदारकीच्या निवडणुकीतील नवीन अध्याय ठरू शकतो.
शरद पवार यांचा बिनचूक वार
राजकारणातील चाणक्य असणारे शरद पवार यांनी नाशिकच्या जागेसाठी आघाडीकडून उमेदवार निवडताना सर्वांसाठी अनपेक्षित असणारा वार केला. पवार यांच्या शिफारशीनेच उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांच्या नावाची अनपेक्षित घोषणा केली. नाशिकमधील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करूनच पवार यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. मनाची तयारी नसताना फक्त शरद पवार यांच्या आग्रहाखातर शिवसेनेकडून मिळालेली उमेदवारी आदेश मानत राजाभाऊंनी होकार दिला. सिन्नर तालुका पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.