Nashik News : आयुक्तालय हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि प्रभारींच्या छुप्या अर्थकारणाच्या तक्रारी थेट पोलिस आयुक्तांपर्यंत पोचल्याने अपेक्षेप्रमाणे काही प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. गंगापूर, नाशिक रोड, सातपूर, आडगाव, म्हसरूळ प्रभारींची उचलबांगडी केली आहे तर, अंबड आणि मुंबई नाका ठाण्याचे प्रभारींची ठाणे बदलेले आहे. (Nashik Police)
आयुक्तांच्या या निर्णयामुळे ‘सकाळ’ च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र आयुक्तांनी यातून सूचक इशाराही दिला आहे. हद्दीतील वाढती गुन्हेगारी, प्रलंबित तपास, रखडलेल्या कारवायांसह प्रभारी निरीक्षकांच्या अर्थकारणाशी निगडित तक्रारीही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यापर्यंत पोचल्या होत्या. याची आयुक्तांनी अखेर गंभीर दखल घेतली.
गोपनीय चौकशी करीत काही निरीक्षकांच्या नावांची यादी आयुक्तालयाने तयार केली. त्यानुसार आयुक्तांनी शुक्रवारी (ता. १९) प्रभारींच्या बदल्यांसह त्यांच्या रिक्त जागी खांदेपालट केल्याचे आदेश जारी केले. गंगापूर ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तृप्ती सोनवणे यांची नाशिक रोड पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी, म्हसरूळचे प्रभारी सुभाष ढवळे, सातपूरचे सोहन माच्छरे आणि नाशिक रोडचे रमेश शेळके यांची बदली थेट शहर नियंत्रण कक्षात केली आहे.
तर, मुंबई नाका ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अशोक गिरी यांची नाशिक रोड, अंबडचे दिलीप ठाकूर यांची गंगापूर, भद्रकालीचे दुय्यम निरीक्षक संतोष नरुटे यांची मुंबई नाका ठाण्यात प्रभारी पोलिस निरीक्षकपदी बदली केली आहे. दुय्यम निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात अंबडचा कार्यभार सोपविला आहे. (latest marathi news)
त्याचप्रमाणे आडगावचे प्रभारी प्रवीण चव्हाण यांची विनंतीनुसार आर्थिक गुन्हे शाखेत दुय्यम निरीक्षकपदी तर, नव्याने हजर झालेले सचिन खैरनार हे आडगावचे, अतुल डहाके हे म्हसरूळचे नवे प्रभारी असतील. उपनगरचे दुय्यम निरीक्षक रणजित नलावडे यांच्याकडे पुन्हा सातपूरचे नवे प्रभारीपद सोपविले आहे.
विशेष शाखेतील दुय्यम निरीक्षक सुशीला कोल्हे या ॲन्टी नार्कोटिक्स सेलच्या (एएनसी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक ही अतिरिक्त जबाबदारी पाहणार आहेत. मुंबई नाक्याचे दुय्यम निरीक्षक श्रीनिवास देशमुख भद्रकालीचे दुय्यम निरीक्षक असतील. तर नव्याने हजर झालेले जयंत शिरसाट उपनगरचे दुय्यम निरीक्षक, ईओडब्ल्यूचे कुंदन जाधव सरकारवाडाचे दुय्यम निरीक्षक, नव्याने हजर झालेले सुशील जुमडे हे पंचवटीचे दुय्यम निरीक्षक म्हणून कामकाज पाहतील.
सहायक, उपनिरीक्षकांच्या बदल्या
नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक जितेंद्र वाघ हे मुंबई नाका, पीसीबी/एमओबीच्या सहायक निरीक्षक जया तरडे या तांत्रिक विश्लेषण शाखा (टीएडब्ल्यू) येथे कार्यरत असतील. सोबतच पोलिस उपनिरीक्षक पंडित अहिरे व महिला उपनिरीक्षक सुवर्णा महाजन पीसीबी/ एमओबीत, तर उपनिरीक्षक बळवंत गावित म्हसरूळ, राकेश न्हाळदे सातपूर, सचिन चव्हाण पंचवटी व प्रवीण देवरे हे देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात कार्यरत होतील.
यांची बढती
आयुक्तालयातील १९ हवालदारांना सहायक उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. तसेच, १६ पोलिस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या या आदेशामुळे शहर पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.