येवला : भाळी रेखलेलं टपोरं कुंकू, नाकात नथ, गळ्यात सौभाग्याचं लेणं, कानात टापसं, हनुवटीवरचं हिरवं गोंदण अन् अंगावर भरजरी महावस्र असलेली पैठणी...! स्री देखणी, गोरीगोमटी असो कि अगदीच सावळी, जेव्हा ती पैठणी राजवस्र परिधान करते तेव्हा तिची नजाकत डोळे दिपवून टाकते.
या मनमोहक महावस्त्राचं वलय आजही टिकून आहे, ते येवला पैठणीच्या रूपाने... मात्र व्यावसायिक स्पर्धेत आणि ग्राहकांचे बजेट ओळखून या अस्सल पैठणीला येवल्याच्या बाजारात सेमी पैठणीने आव्हान उभे केले आहे. अस्सल मराठमोठी पैठणी महागडी असल्याने लो बजेट सेमी पैठणी येथील बाजारावर कब्जा करत आहे.
विक्रेतेही त्याला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र असल्याने दहा येवला पैठण्या विकतात, तोपर्यंत शंभर सेमी पैठण्या विक्री झालेल्या असतात. अस्सल पैठणीचा तोरा टिकवण्यासाठी साऊथच्या या साडीचा कुठेतरी बंदोबस्त होण्याची गरज आहे. (South Semi Paithani caputre yeola market)