नाशिक : जिद्द, स्वयं अध्ययनाच्या बळावर मखमलाबादच्या मयूर गवारीची संरक्षण क्षेत्रातील संशोधन संस्था डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, पुणे (डीआरडीओ) संस्थेत ‘सायंटिस्ट बी’ पदासाठी निवड झाली आहे. परदेशात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मिळणारी चांगल्या पगाराची नोकरी नाकारत त्याने देशसेवेला प्राधान्य दिले आहे. (nashik Success Story Mayur Gawari DRDO Scientist marathi news)
अभ्यासाचे सुनियोजन करताना मयूरने बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच आपले ईप्सित निश्चित केले होते. प्रचंड अभ्यासास सुरवात केली. विशेष म्हणजे त्याने उच्च माध्यमिक ते एम. टेक या पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात कधीच शिकवणी लावली नाही.
आदिवासी समाजातील ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. गोपाळ गवारी व डॉ. संगीता गवारी यांचा मयूर हा मुलगा आहे. शास्त्रज्ञपदी निवड झालेला आदिवासी समाजातीलच नव्हे तर महाराष्ट्रात तो एकमेव उमेदवार आहे. मयूरचे प्राथमिक शिक्षण जेलरोडच्या आदर्श प्राथमिक शाळा व नाशिकरोडचे पुरुषोत्तम शाळा आणि माध्यमिक शिक्षण मखमलाबाद येथील छत्रपती विद्यालयातून झाले.
मराठीतून शिक्षण घेत त्याने दहावीत तब्बल ९५ टक्के गुण मिळविले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून घेताना अभियांत्रिकी (बीई) शिक्षण मविप्र संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतले. पुढे एम. टेक शिक्षण पुण्यातील ‘सीओपी’तून घेतले. शिक्षण पूर्ण करत पुण्याच्या सुजन कूपर प्रा. लि. कंपनीत २०१८ ते २०२० अशी दोन वर्षे मेकॅनिकल इंजिनिअरपदावर काम केले. (Latest Marathi News)
चढ-उतारांना खंबीरपणे सामोरे
२०२० मध्ये कोरोना महामारीदरम्यान मयूर मखमलाबादला परतला. घरी राहून दोन वर्षे स्पर्धा परीक्षेचे स्वयं अध्ययन सुरू केले. एचपीसीएल कंपनी, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर (मुंबई), इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमिक रिसर्च (इस्रो), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (श्रीहरी कोटा) अशा विविध संस्थांच्या परीक्षेत यश संपादन केले.
मात्र भाभा अनुसंधान केंद्रात एकच पद असल्याने, मयूरला प्रतीक्षा यादीत समाधान मानावे लागले. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये कलपक्कम, तमिळनाडू येथील अणुऊर्जा प्रकल्प येथे ‘सायंटिस्ट सी’ पदावर नेमणूक झाली. पुढे डिसेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत ११ महिने अणुऊर्जा शास्त्रज्ञ म्हणून नोकरी केल्यावर पुन्हा राजीनामा दिला. आयुष्यातील चढ-उतारांना तो खंबीरपणे सामोरे गेला.
वडिलांच्या साहित्यातून झाली जाणीव
आपल्या यशाबद्दल मयूर म्हणाला, की वडिलांची एलआयसीतील नोकरी, त्यांनी आमच्या शिक्षणासाठी सोडून दिलेले करिअर आणि काहीशा सुखवस्तू कुटुंबात वाढलो असलो, तरी मला आदिवासी समाज बांधवांच्या दुःखाची जाणीव आहे.
आदिवासी समाजावर लेखन करणाऱ्या वडिलांच्या साहित्यामुळे सामाजिक जाणीव झाली. म्हणून वंचित आदिवासी समाजाचे आपण देणे आहोत, याची जाणीव आहे. घरात अभियंता होणारा पहिलाच असून, कठोर परिश्रमाला आणि प्रामाणिक प्रयत्नाला यश आल्याचे मत त्याने व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.