Nashik Teacher Constituency Election : प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा मतदारांना फटका; मतदान केंद्राबाहेर दिवसभर रांगा

Nashik News : लोकसभा निवडणुकीप्रमाणे अत्यंत उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षक मतदारांना मतदान केंद्रातील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागला.
Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Electionesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीप्रमाणे अत्यंत उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षक मतदारांना मतदान केंद्रातील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागला. तब्बल दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागल्याने मतदारांनी थेट उमेदवारांसमोरच आपला संताप व्यक्त केला. पिण्यासाठी साधे पाणीही मिळाले नाही. तर बसण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे ताटकळत उभे राहावे लागले. (Teachers Constituency Election Bad planning of administration hit voters)

मतदार व उमेदवारांनी एकत्रितपणे याविषयी ओरड सुरू केल्यानंतर अखेर प्रशासनाने बूथ वाढवून प्रक्रिया गतिशील करण्याचे तोकडे प्रयत्न केले. मात्र, प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. नाशिक जिल्ह्यातील एकूण २५ हजार ३०२ मतदारांसाठी जिल्ह्यात २९ मतदान केंद्रांवर केलेल्या व्यवस्थेवर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

एका मतदान केंद्रात तब्बल एक हजार २०० मतदार येणार असल्याने प्रत्येकी एक मिनीट गृहित धरला तरी एक हजार २०० मिनिटांचा कालावधी लागेल. यादृष्टीने प्रशासनाने एका मतदान केंद्रात चार ते पाच बूथची (मतदान करण्यासाठी जागेची व्यवस्था) करणे अपेक्षित होते. पण फक्त दोनच बूथ लावल्यामुळे मतदानाची प्रक्रिया अंत्यत संथगतीने चालू राहिली. परिणामी, मतदानाची टक्केवारीही कमी राहिल्याचे दिसून आले.

रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांनी संधी मिळाली. मतदान केंद्रात बसण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. एकाच रांगेत महिला व पुरुष उभे राहिले. शहरातील बी. डी. भालेकर हायस्कूल या केंद्रावर मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या केंद्रात मतदार सर्रासपणे मोबाईल घेऊन जाताना दिसले.

त्यांना पोलिसांनी साधी विचारणाही केली नाही. आतमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या असताना फॅनची कुठलीही व्यवस्था नसल्याने मतदार घामाघूम झाले. दिव्यांग व गर्भवती स्त्रियांना मतदानासाठी प्राधान्य देण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. परंतु, त्यांचेही पालन झाले नाही. सर्वांना एकाच रांगेत उभे राहावे लागले. (latest marathi news)

Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 93.48 टक्के मतदान

केवळ एखाद्या मतदान केंद्रावर नियोजनाचा अभाव दिसून आला असे नाही, तर शहरातील बी. डी. भालेकर, रमाबाई आंबेडकर, मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील केंद्रावरही हाच प्रकार घडल्याचे दिसून आले. त्यामुळे केवळ मतदारांनीच संताप व्यक्त केला नाही, तर उमेदवारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना फोन करून बूथ वाढविण्याचे आवाहन केले. दुपारपर्यंत अत्यंत संथगतीने मतदान होत राहिल्याने मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाला. अखेर सर्वत्र टीका सुरू झाल्यानंतर प्रशासनाने दोन बूथ वाढवून देत केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदानाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या.

उमेदवारांसमोरच मांडली व्यथा

शिक्षक मतदार रांगेत उभे असताना उमेदवारांनी मतदान केंद्रास भेट देत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. पण एका महिला शिक्षिकेने मतदान केंद्रातील नियोजनाविरोधात आवाज उठवला. अशा पद्धतीने मतदानाला वेळ लागणार असेल तर मतदानाची टक्केवारी कशी वाढणार.

असा प्रश्‍न त्यांनी थेट अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यासमोर उपस्थित केला. मतदानासाठी वेळ लागत असल्याचे ऐकून काही मतदार घराबाहेरच पडले नाहीत. महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे यांनीही मतदारांच्या व्यथा थेट प्रशासनाला कळविल्या. पण त्यानेही फार बदल झाल्याचे दिसून आले नाही.

Nashik Teacher Constituency Election
Nashik Division Teachers Constituency Election : मतदानासाठी ओळखपत्राचे 10 पुरावे ग्राह्य : जिल्हाधिकारी गोयल

...म्हणून मतदान केंद्रावर गर्दी कायम

मतदान केंद्र ठरवताना जवळपास १२ किलोमीटरचा परिसर गृहित धरण्यात आला. त्यामुळे नाशिक रोड व नाशिक तालुक्यातील मतदारांना शहरातील बी. डी. भालेकर, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात मतदानासाठी यावे लागले. ग्रुपने मतदार येत गेले.

शहरातील मतदारांना मखमलाबादचे केंद्र मिळाले. दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून मतदान केंद्रात पोचल्यानंतर दोन ते तीन तासांचा वेळ लागला. काही मतदार सकाळची शाळा सुटल्यानंतर दुपारी घराबाहेर पडले. यामुळे सकाळपासून झालेली गर्दी सायंकाळपर्यंत कायम राहिली. सकाळ टप्प्यातील गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाने व्यवस्थेत बदल करणे अपेक्षित होते. पण त्यादृष्टीने काहीच प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही.

येथे झाली चूक

- एका मतदाराला मतदानासाठी साधारणतः किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज प्रशासनाने घेतला नाही

- प्रत्येक मतदान केंद्राशी सुमारे एक हजार २०० मतदार जोडले होते

- त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था नव्हती

- पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही

- महिला व पुरुषांच्या एकत्र रांगा

- सुशिक्षित मतदार असल्यामुळे काळजीपूर्वक मतदान झाल्याने वेळ फार लागला

- मतपत्रिका मोठी असल्याने वाचन करून मतदान करण्यात वेळेचा अपव्यय

- दिव्यांग मतदार, गर्भवती महिलांनाही एकाच रांगेत उभे ठेवले

- फॅनअभावी कर्मचाऱ्यांसह मतदारही घामाघूम

- सूक्ष्म नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवला

Nashik Teacher Constituency Election
Nashik Teachers Constituency : नंदुरबार, धुळे, जळगाववर शिक्षक आमदाराची मदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com