Nashik Onion Auction : काहीही करा आणि कांदा खरेदी करा अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याने आज येथे व्यापाऱ्यांनी खासगी जागेत कांदा खरेदी सुरू केली. मात्र अशी खरेदी चुकीची असल्याने हमाल-मापाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत हमाल, मापारी, व्यापारी व शेतकऱ्यांत जोरदार वादावादी होऊन राडा झाला. याचवेळी अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या दगडात एका शेतकऱ्याचे डोके फुटले आहे. पोलिस वेळीच घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला. (nashik There was heated argument between traders and farmers for onion purchase in yeola marathi news )
दरम्यान कांदा लिलाव सुरू करण्याच्या संदर्भात आता सोमवारच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. बाजार समितीतीत नोंदणीकृत व्यापारी व हमाल मापाऱ्यांच्या वादामुळे लिलाव बंद असून हमाल,मापारी आणि व्यापाऱ्यात लेव्हीवरून सुरू असलेल्या वादात शेतकरी नाहक भरडला जात आहे. येथील बाजार समितीत लिलाव सुरू करण्याच्या संदर्भात आज संचालक मंडळाने बैठक घेतली होती.
या बैठकीला संचालक मंडळासह व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व हमाल मापारी उपस्थित होते. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसून सोमवारी पुन्हा जिल्हास्तरीय परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे आजच्या बैठकीत ठरले. तहसीलदार आबा महाजन, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, उपसभापती बापूसाहेब गायकवाड व व्यापारी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
मनमाड मार्गावरील संतोषी माता मंदिराच्या बाजूच्या खासगी जागेत खासगी पद्धतीने कांदे खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे आज काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी कांदाही विक्रीला घेऊन आलेले होते. मात्र अवैधरीत्या होणारी ही खरेदी अमान्य असल्याचे सांगत हमाल मापारी यांनी त्याला विरोध दर्शविला. यावेळी बाचाबाची होऊन वादात रूपांतर झाले किंबहुना, या गर्दीत अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत नाटेगाव येथील एका शेतकऱ्याच्या डोक्यात लागल्याने शेतकरी जखमी झाला आहे. (latest marathi news)
रुमालाने तोंड बांधलेल्या एका व्यक्तीसह जमावाने चित्रीकरण करत असलेल्या पत्रकाराना धक्काबुक्की केली. खासगी जागेत लिलाव घेण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला. यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे समजताच शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी फौजफाट्यासह या ठिकाणी हजर झाले.त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.यानंतर पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये देखील काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
यावर सुरू आहे वाद!
लेव्हीच्या वसुलीच्या मुद्द्यावर वाद सुरू असून शेतकऱ्यांच्या पावतीमधून कपात केलेले माथाडी कामगारांचे १३६ कोटी रुपये लेव्ही २००८ पासून व्यापाऱ्यांकडे थकले आहेत. येवल्याची कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबजार अंदरसूल येथील माथाडी कामगारांची ३३ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम जमा करण्यास व्यापारी टाळाटाळ करीत आहेत. हमाल, मापारी व्यापाऱ्यांचे कामगार नसून माथाडीचे आहेत, हे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी लेव्ही कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा विषय न्यायप्रविष्ठ असताना व्यापारी लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आचारसंहिता संपेपर्यंत प्रचलित नियमानुसार व्यवहार करण्यास सांगितले असून आमचेही तेच म्हणणे असल्याची भूमिका हमाल-मापार्यांनी मांडली.
"बाजार समितीत शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यांच्यामध्ये झालेला वाद दुर्दैवी आहे. आधीच निर्यात बंदीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून कवडीमोल दराने कांदा विक्री होत असल्याने शेतकऱ्यांच प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. आता अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याच्या हितासाठी बाजार समितीसह हमाल, मापारी, व्यापारी यांनी कांद्याचे लिलाव सुरळीत करण्यासाठी पुढे यावे."- भारत दिघोळे, अध्यक्ष,महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
''माथाडी मंडळाने व्यापाऱ्यांवर काढलेल्या रकमा आम्हांला मान्य नाहीत.त्यामुळेच ही बाब न्यायप्रविष्ट आहे.लिलाव बंदचा निर्णय जिल्हास्तरीय असल्याने व्यापारी संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लिलाव सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल."- व्यापारी संघटना, येवला
''हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रचलित नियमानुसार कपात सुरू ठेवावी व न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कार्यवाही करावी. मात्र व्यापारी आडमुठे धोरण अवलंबत आहेत. खासगी जागेत १० - १२ शेतकऱ्यांना बोलावून लिलाव करण्याचा प्रयत्न केला. यात शेतकऱ्यांसह सर्वांचे नुकसान असल्याने नियमानेच लिलाव व्हायला हवे."- वसंतराव झांबरे, माथाडी कामगार
"खासगी बाजार समित्यांना चालना मिळावी यासाठी व्यापाऱ्यांचा खटाटोप सुरू आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेला कांदा विक्री व्हावा, एवढीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मात्र व्यापारी व माथाडी वाद उत्पन्न करून व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे. यावर तोडगा निघून सुरळीत लिलाव सुरू व्हावेत."- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.