जुने नाशिक : त्र्यंबक नाका सिग्नल भागातील रिक्षा स्टॅन्ड येथे उभ्या रिक्षावर रविवारी (ता.६) अचानक वृक्ष कोसळला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने चालक थोडक्यात बचावला तर रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले. काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन पथकाने वृक्ष कापून रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सातपूर प्रबुद्ध नगर येथील सुनील धोत्रे यांची रिक्षा (क्रमांक एमएच १५ एफयु ८४८८) तील प्रवासी त्र्यंबक नाका येथे सोडले. ( tree fell on stopped rickshaw Incident at Trimbak Naka signal )
इतर प्रवाशांसाठी येथील रिक्षा स्थानकावर थांबले होते. अचानक दुपारी दोनच्या सुमारास येथील वृक्ष रिक्षावर कोसळला. त्याखाली रिक्षा दबल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्याच्या मधोमध वृक्ष कोसळल्याने त्याठिकाणी काही वेळ वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन विभागास माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या साह्याने त्यांनी वृक्षाची छाटणी करून वृक्ष रस्त्याच्या बाजूला केला.
सुमारे पंधरा मिनिटांनंतर वाहतूक सुरळीत झाली. वृक्ष कोसळला त्यावेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने दुर्घटना टळली. रविवारची सुट्टी असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. इतर वेळेस रस्ता गजबजलेला असतो. वृक्षाचे मूळ वाळलेले दिसून आले. गुलमोहराचे वृक्ष असल्याने त्याची मुळेही जास्त खोलवर गेलेली नव्हती. त्यामुळे मुळासकट वृक्ष कोसळला. परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. (latest marathi news)
येथील अन्य वृक्षही अशाच प्रकारे धोकादायक झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. इतकेच नाही तर वृक्षाचा विस्तार वाढलेला होता. त्याची बऱ्याच वर्षांपासून छाटणी झाली नसल्याने आणि वृक्षाचे मूळही सुकल्याने घटना घडल्याचे प्रथम दर्शनी समोर आले. कोसळलेल्या वृक्षाच्या छाटणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्य वृक्षाची छाटणीही काही प्रमाणात करून घेण्याचे सांगण्यात आले.
देव तारी त्याला कोण मारी
रिक्षा चालक सुनील धोत्रे वृक्ष कोसळला त्याच्या काही सेकंदांपूर्वी रिक्षातच बसलेले होते. पाण्याची गुळणी करण्यासाठी रिक्षातून बाहेर पडताच वृक्ष कोसळला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. त्यांच्या पायास किरकोळ जखम झाली. घटना बघताच अन्य रिक्षा चालकांच्या तोंडातून देव तारी त्याला कोण मारी असे शब्द बाहेर पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.