Nashik Unseasonal Rain : ‘आभाळ फाटलं, काळीज तुटलं,
हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं अन अवकाळी पावसानं सारं हिरावलं...’
अशी काहीशी परिस्थिती रविवारी (ता. २७) सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे झाली. पै पै लावत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्षबागा लिंबाएवढ्या गारांच्या पावसात उद्ध्वस्त झाल्या. डोळ्यांसमोर स्वप्ने पाण्यात विरलेली पाहायला मिळाली.
थंडी आणि उन्हाचा वेगळाच खेळ निसर्ग खेळत असताना अचानकच राज्यातील अनेक भागांत कोपल्याप्रमाणे गारांचा भडीमार झाला. जीवापाड जपलेली शेतातली उभी पिके आडवी झाली. खिन्न मनाची माणसे निसर्गाचा हा थयथयाट पाहत राहिली. (nashik unseasonal rain damage Collector Jalaj Sharma started inspection tour news)
निफाड तालुक्यात रविवारी (ता. २६) सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीट झाल्याने फळबागा उद्ध्वस्त झाल्या. कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. कुक्कटपालन व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला. तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत नुकसानीची अस्वस्थ करणारी माहिती पुढे येत होती.
त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भल्या सकाळीच कोठुरे, पिंप्री, रौळस आदी ठिकाणी पाहणी दौरा सुरू केला. रेल्वेगेट बंदचा फटका जिल्हाधिकाऱ्यांनाही बसल्याने त्यांनी थेट दोन किलोमीटर चालत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
कमी पाऊस झाल्याने आधीच निफाडवर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी अलीकडेच आमदार दिलीप बनकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. रात्रभर नुकसान झालेल्या भागातून माहिती येत होती.
जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शेतकरी आणि प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, कृषी अधिकारी सुधाकर पवार, स्थानिक मंडलाधिकारी, तलाठी यांना सोबत घेत पाहणी सुरू केली.
नुसतेच फोटोसेशन नको, तर हवीय मदत...
रविवारी कोठुरे, रौळस, पिंप्री आणि परिसरात बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले. या पावसामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, अस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून काही मदत मिळणार की केवळ पुढाऱ्यांचे फोटोसेशन होऊन दुःखावर फुंकर घालणार हा प्रश्न शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. दरम्यान, निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
"कोठुरे, रौळस पिंप्री आदी भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पंचनामे करीत सरसकट नुकसानभरपाई द्यावी." - रामनाथ आहेर, सरपंच, रौळस
"माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात प्रथमच एवढी गारपीट झाल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. जीवापाड जपलेली बाग उद्ध्वस्त होत असताना पाहण्याशिवाय पर्याय नव्हता." - रामनाथ कवडे, कोठुरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.