Nashik News : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सहा व्यक्तींसह शेकडो पशुधनाचा बळी घेतला; तर एक हजार ५०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या आधारे मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत केली जाते. उपचारांसाठी पाच हजारांपासून अडीच लाखांपर्यंतचे अर्थसहाय सरकार करते. (Nashik Unseasonal Rain Damage)
या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना साडेपाच लाख रुपयांची मदत मिळाली आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू असल्याने मदतीचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली. मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. विशेषत: दुष्काळसदृश म्हणून ओळख असलेल्या नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला.
अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नद्या, नाले एक झाल्याने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. बांध फुटल्याने पाण्याबरोबर शेतातील मातीही वाहत गेली. या पावसाचा फळबागांना फटका बसला. शिवाय, सहा व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यूही झाला. एक हजार ५६३ घरांची पडझड झाली.
कांद्याचे शेड उडून गेले. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या किंवा नुकसान झालेल्या व्यक्तींना नैसर्गिक आपत्ती निकषाच्या आधारे आर्थिक मदत केली जाते. मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा होतात. याव्यतिरिक्त गाय, मेंढी, शेळी, बैल, वासरू या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
प्राण्यांच्या प्रकारानुसार त्यांना ही मदत केली जाते. गाय, म्हैस, उंट, याक आदींचा मृत्यू झाल्यास ३७ हजार ५०० रुपये मिळतात. मेंढी, बकरी, डुक्कर यांचा मृत्यू झाल्यास चार हजारांची मदत मिळते. उंट, घोडा, बैल यांचा मृत्यू झाल्यावर मालकास ३२ हजार रुपये मिळतात. वासरू, गाढव, शिंगरू, खेचर यांचा मृत्यू झाल्यास २० हजारांपर्यंत मदत मिळते. कुक्कटपालनाचे दरही शासनाने निश्चित केले आहेत. (latest marathi news)
प्रतिकोंबडी १०० रुपयांप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त दहा हजार रुपये दिले जातात. जनावरांचा प्रकार व संख्या राज्य शासनाच्या स्थानिक प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे नोंदवली असली पाहिजे. तरच जनावरे दगावल्याचा दावा ग्राह्य धरण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात राज्य शासनाने २३ मार्च २०२३ ला शासन निर्णय जारी केला आहे.
त्यानुसार या मदतीचे वाटप केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत एका व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपये मिळाले आहेत. चांदवड तालुक्यात चार गायींचा मृत्यू झाल्यावर शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची मदत मिळाली. असे एकूण साडेपाच लाख रुपये मिळाले आहेत. अजूनही पंचनामा सुरू असल्याने मदतीचा आकडा वाढतच जाईल.
रस्ते, शाळा, पाणीपुरवठ्याला मदत
नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वजनिक मालमत्तेचीही हानी होते. यात रस्ते, शाळा, अंगणवाडी, कम्युनिटी हॉल यांसारख्या सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळतो. प्रमुख जिल्हा मार्गाचे नुकसान झाल्यास एक लाख ते सव्वा लाखापर्यंत मदत होते; तर ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ६० ते ७५ हजारांपर्यंत निधी मिळू शकतो. पिण्याच्या पाण्याची योजना दुरुस्तीसाठी दोन लाखांपर्यंत मदत मिळते. शाळा दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये, तर पंचायत घर, अंगणवाडी, कम्युनिटी हॉलसाठी अडीच लाख रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.
अशी मिळते मदत
- नैसर्गिक मृत्यू- ४ लाख रु.
- ४० ते ६० टक्के दिव्यांगत्व- ७४ हजार रु.
- ६० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व- अडीच लाख रु.
- एक आठवडा व त्यापेक्षा अधिक कालावधीकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास- १६ हजार रु.
- त्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाल्यास- ५४०० रु.
- घरातील साहित्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत
- पक्के घराचे नुकसान झाल्यास- एक लाख २० हजार
- डोंगरी भागातील घराचे नुकसान झाल्यास- एक लाख ३० हजार
- झोपडीला आठ हजार, तर गोठ्यासाठी तीन हजार रुपयांची मदत
पशुधनाला मिळणारी मदत
- गाय, म्हैस, उंट, याक- ३७,५०० रु.
- मेंढी, बकरी, डुक्कर- ४ हजार रु.
- उंट, घोडा, बैल- ३२ हजार रु.
- वासरू, गाढव, शिंगरू, खेचर- २० हजार रु.
- कुक्कटपालन- १० हजार प्रतिकुटुंब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.