निफाड : निफाडच्या द्राक्षपंढरीला गारपीट आणि वादळी पावसाने झोडपून काढल्याने निफाड, कोठुरे, रामाचे पिंपळस, पिंपरी, शिवडी, सोनेवाडी, नैताळे, शिवरे, कसबे सुकेणेसह परिसराला रविवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास पावसाने दणका दिल्याने अनेक बागांचे शंभर टक्के नुकसान झाले.
हिरवं स्वप्न काळवंडल्याचे चित्र द्राक्ष पट्ट्यात दिसत आहे. (Nashik Unseasonal Rain green dream of grape leaves turned black)
आधीच दुष्काळी परिस्थिती त्यातून मार्ग काढून जे आहे, त्यात आपल्या द्राक्षबागा फुलवण्याचा प्रयत्न येथील बळीराजा करीत आहे.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आकाश दाटून आलं आणि सोसाट्याचा वारा, कोसळणाऱ्या गारा यामुळे द्राक्षबागांत चिखल साचला दरम्यान रविवारी झालेल्या पावसामुळे निफाड शहरात सुरत-शिर्डी मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.
त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. या ठिकाणी असलेले वृक्ष उन्मळून पडले, तर विजेचे खांब जमिनीवर कोसळले.
दहा मिनिटांत मेहनत गेली वाया
निफाड येथील शेतकरी संजयभाऊ गोळे यांनी द्राक्षबागेची परिस्थिती कथन करताना सांगितले, की माझी वर्षभराची मेहनत दहा मिनिटांत वाया गेली. आमच्या घराचे पूर्ण उत्पन्न फक्त द्राक्षबागेवर आणि गहू-कांदा या पिकांवर अवलंबून होते.
मात्र जेमतेम दहा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. आयुष्यात कधी पाहिला नव्हता एवढा मुसळधार पाऊस आणि दगडासारख्या गारा हे दृश्य हादरवून टाकणारे होते.
गारपिटीबरोबरच तब्बल तासभर झालेल्या मुसळधारेमुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, जेमतेम महिनाभराची कोवळी असलेली गहू, कांदा व हरभऱ्याची रोपे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. टोमॅटो, वांगे, ऊस, भाजीपाला या सर्व पिकांना प्रचंड फटका बसला आहे.
"बदलत्या निसर्गचक्रामुळे द्राक्षशेतीची वाताहात झाली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीला भाव नाही. जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे."
-बाबूराव सानप, सोनेवाडी बुद्रुक
"आमच्या द्राक्षबागांवर निसर्ग कोपला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे माझी द्राक्षबाग शंभर टक्के उद्ध्वस्त झाली आहे. पाणीटंचाई असतानाही द्राक्षबागांचे नियोजन केले होते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने सर्वकाही भुईसपाट झाले."- सागर पोटे, कोठुरे
"रविवारच्या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. काही बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे या पावसाने मोठे संकट आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागा तसेच थीनिंग झालेल्या व थिनिंगच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे."
- ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, द्राक्षबागायतदार संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.