Nashik News : ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असली तरी त्यापूर्वी नाशिक शहरातील पथविक्रेते त्यांच्यातील नोंदणीकृत फेरीवाल्यांमधून समिती सदस्यांच्या आठ जागांसाठी ३० ऑगस्टला मतदान करणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीया देवचके यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदानानंतर लगेचच सायंकाळी पाच वाजता मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. (Voting on 30 august for street vendors committee )
फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणांतर्गत सन २०१३ मध्ये महापालिकेने तीस सदस्यांची फेरीवाला समिती गठित केली होती. समितीच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर मात्र केंद्र सरकारने फेरीवाला धोरणा संदर्भात सुधारित निर्णय जाहीर केला.
त्यात फेरीवाला समिती ऐवजी २० सदस्यांची नगरपथविक्रेता समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. पथविक्रेता समितीमध्ये नोंदणीकृत फेरीवाल्यांमधून आठ सदस्यांची निवडणुकीद्वारे नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने ७,२५९ नोंदणीकृत फेरीवाल्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. राज्य शासनाच्या कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली होती. (latest marathi news)
आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सहा ऑगस्टला दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत जाहीर केली जाईल. त्यानंतर नऊ ते १३ ऑगस्ट दरम्यान सकाळी ११ ते ५ या वेळेत नाम निर्देशनपत्रांचे वाटप व स्वीकृती होईल. १४ ऑगस्ट रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल. त्याचबरोबर १६ ऑगस्ट रोजी वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध होईल. १९ ऑगस्टला आक्षेप अर्ज स्वीकारणे व निराकरण केले जाईल. २० ऑगस्ट रोजी माघारी होईल. अंतिम यादी २१ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल. २२ ऑगस्ट ला चिन्ह वाटप व ३० ऑगस्ट ला सकाळी ११ ते ३ या कालावधीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार आहे.
आठ सदस्यांसाठी निवडणूक
वीस सदस्यांच्या नगरपथविक्रेता समितीमध्ये महापालिका आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष तर पोलिस आयुक्त विशेष नियोजन प्राधिकरणाचे कार्यकारी प्रमुख किंवा प्रतिनिधी पोलिस सह आयुक्त (वाहतूक), आरोग्य अधिकारी व अग्रणी बँकेचा एक प्रतिनिधी असे सहा अधिकारी या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून फेरीवाल्यांमधून आठ सदस्यांची निवड केली जाईल. अशासकीय संघटना, समुदाय आधारित संघटना, निवासी कल्याण संघ, व्यापारी संघ, पणन संघ यातून सहा अशासकीय सदस्यांची नियुक्ती समितीवर केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.