देवळा : चणकापुर उजव्या कालव्याद्वारे होत असलेल्या पूरपाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पूर्व भागातील गावांना डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली असून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना या नागरिकांना करावा लागणार असे चित्र आहे.
यातच पूरपाणी न मिळाल्याने ‘करला’ धरण कोरडेठाक पडल्याने याचा थेट परिणाम पाणीपुरवठा योजनांवर पडत आहे.
त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेल्या गावांना चरकापूर कालव्याद्वारे पाणी देण्याची मागणी ग्रामस्थ करु लागले आहे. (Nashik Water Crisis Karla dam dry due to lack of supply Water supply schemes will be limited nashik)
जलजीवन मिशन अंतर्गत गुंजाळवाडी शिवारातील ‘करला’ धरणांवर तीन गावांच्या पाणीपुरवठा योजना असून त्यासाठी शासनाने चार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या या योजना राबविल्या आहेत.
पण जर धरणातच पाणी नसेल तर पाणीपुरवठा योजना कशा चालतील? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कारण या पावसाळ्यात देवळा तालुक्यामध्ये कमी पाऊस झाल्याने नद्या नाले कोरडेच आहेत.
डिसेंबर महिन्यातच दोन दिवसांआड अन तेही अल्प प्रमाणात पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. आजही काही ठिकाणी विहिरी व कूपनलिकामधील पाणी साठवून फक्त पिण्यासाठी पाण्याचा वापर होत आहे.
आणि अशा परिस्थितीत चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेले पूरपाणी ‘करला’ धरणात पडलेच नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या पाणीपुरवठा योजना या केवळ शोभेचा पुतळा म्हणून राहतील की काय असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत गुंजाळगाडी परिसरातील ‘करला’ धरणातील गुंजाळनगर, श्रीरामपूर, वाखारी या तीन गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे.
पण ‘आडात नाही तर मग पोहऱ्यात कोठून येणार’ अशी स्थिती असल्याने या धरणात खोदलेल्या विहिरींना पाणी येईल का? की नागरिकांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्याला जीवदान देणाऱ्या चणकापुर उजव्या कालव्याचे विस्तारीकरण झाल्याशिवाय तालुक्याचा व खास करून पूर्व भागातील गावांचा पाणीप्रश्न सुटणे अशक्य असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे.
‘नारपार’ प्रकल्प नवसंजीवनी ठरेल
चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘नारपार’ प्रकल्पास मान्यता मिळाल्यामुळे देवळा तालुक्यांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लावला आहे. तालुक्यासाठी नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प देवळा तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवेल अशी आशा आहे.
‘करला़’ धरणातून जलजीवन पाणीपुरवठा योजना गुंजाळवाडीसाठी १ कोटी ५० लाख रुपये, वाखारीसाठी २ कोटी ४७ लाख रुपये व श्रीरामपूर गावासाठी ८८ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून ९५ टक्के काम पूर्णत्वास झाले आहे.
धरणासाठी स्वतंत्र गेटची मागणी
उजव्या वाढीव कालव्यावर असलेल्या करला धरणासाठी स्वतंत्र गेट असावे. कारण करला धरणाच्या आधी लाखोरे धरण व एक पाझर तलाव भरून मग पाणी करला धरणात येत असते. पाणी अतिशय अल्प प्रमाणात प्रवाहित होते.
त्यामुळे करला धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. यासाठी स्वतंत्र गेटची मागणीचे ठराव तिन्ही गावाने पारित केला आहे. यासह श्रीरामपूर गावासाठी करला धरणांतून पाणलोट क्षेत्रासाठी पोटचारी देखील असाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
"पाण्याचा स्रोतचे पुरेसे बळकटीकरण नसताना करला धरणाच्या भरवशावर तीन गावांच्या पाणीपुरवठा योजना केल्या जात आहेत. त्यामुळे या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष पाणी या गावांपर्यंत पोचण्यास अडचणीच आहेत. जलजीवन ही योजना गावांची तहान भागविण्यासाठी योग्य असली तरी ती राबविताना त्या कामाचे फलित किती हे पाहायला नको का?"- विजय पगार, मविप्र संचालक
"करला धरणासाठी स्वतंत्र गेट करून तत्काळ पिण्याचे पाणी आरक्षित करावे. आताच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून उन्हाळ्यात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. करला धरणातील तीन गाव पाणीपुरवठा देखील तेव्हा सफल ठरतील अन्यथा योजना निष्फळ ठरतील. यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीन गाव मिळवून उपोषणाला बसू."
- मंगेश आहेर, उपसरपंच वाखारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.