ओझर : ओझरसह परिसरात सध्या चार दिवसांनी अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ओझरसह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात साठा कमी झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. मार्चही संपलेला नाही, तोच पाण्याची चणचण सुरू झाली आहे. (Nashik Water Crisis Ozar marathi news)
उन्हाळ्याचे एप्रिल, मे, जून हे तीन महिने अद्याप बाकी आहेत. पुढील काळात ओझरसह परिसराला पाणीपुरवठा करणे ओझर नगरपरिषदेला जिकीरीचे होईल. ओझर, मोहाडी, जानोरी, जऊळके या चार गांवाना पालखेड धरणातून एमजीपीमार्फत पाणीपुरवठा केला जातो.
सद्यस्थितीत पालखेड धरणात उन्हाच्या तीव्रतेने पाणीसाठा कमी होत आहे. या धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजनांच्या ओझर, जऊळके, जानोरी, मोहाडी या गावांना पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत. लोकसंख्येचा सुमारे ८० हजारांचा टप्पा गाठलेल्या ओझर शहराला याची झळ बसत आहे.
वर्षाची पूर्ण पाणीपट्टी भरूनही सरासरी तीन ते चार दिवसांआड, तर कधी पाइपलाइन लिकेज व अन्य कारणांनी शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तीन महिन्यांच्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. (latest marathi news)
अनियमित पाणीपुरवठ्याची कारणे
कधी पाइपलाइनला गळती लागते, तर कधी मोटरी बंद पडतात. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. पालखेड धरणाजवळ ओझर नगरपरिषदेचा जॅकवेल आहे. मात्र, मोटारीपर्यंत पाणी पोचत नसल्याने नगरपरिषदेने पाणी खेचून आणण्यासाठी तिथे आता चर खोदला आहे.
मात्र, संबंधित विभागाकडून पाणी सोडताना जँकवेलची लेव्हल पाहणे आवश्यक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने जॅकवेलच्या लेव्हलकडे लक्ष न देता पाणी सोडल्यामुळे जॅकवेलमधील पाण्याची लेव्हल कमी होऊन दोन पंप पाणी ओढत होते. तेथे एकच पंप काम करतो.
त्यामुळे ओझरची पाण्याची टाकी भरली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याची चर्चा आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इरिगेशन कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालाही पाणीटंचाईची माहिती दिल्याचे ओझर नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
"ओझरला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणात साठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ओझर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाइपलाइनचा अधूनमधून खोळंबा होत असतो. पालखेड धरणाजवळ चर खोदला आहे. नवीन मोटर बसविली आहे. चार दिवसांऐवजी दोन दिवसांनी नियमित पाणीपुरवठा होईल, अशी तयारी नगरपरिषदने केली आहे."-प्रशांत पोतदार, उपमुख्याधिकारी, ओझर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.