ऊसतोडणी मजूर असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या तिच्या नशिबीही कष्ट ठरलेलेच होते. महाराष्ट्रातून थेट गुजरातमध्ये स्थलांतरित होणाऱ्या परिवारात जन्म घेतलेल्या सदस्य म्हणून जगताना सासरीही परिस्थिती जैसे थे. होती. सासरच्या मंडळींमध्ये रममाण होतानाच गाव सुटलं... कष्टमय आयुष्याची वाट भक्कम करताना शाळेची पायरीही न चढलेल्या नाशिकच्या शिवाजीनगर, सातपूर येथील बेबाबाई संतोष गढरी यांनी कुटुंबाला आधार होतानाच महिलांसमोर आदर्श ठेवलाय. (Nashik inspirational Story Bebabai Gadhri)
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील रताळे (ता. पारोळा) येथील माहेर व पारोळा येथील सासर असलेल्या बेबाबाई संतोष गढरींना माहेरच्या परिस्थितीमुळे शाळेची पायरीही चढता आली नाही. वडील चुनीलाल झिपरू गढरी यांचा पत्नी नर्मदाबाई यांच्यासह दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार होता. माहेरी गरिबी जणू पाचवीलाच पुजलेली होती.
वर्षातून काही महिने गाव सोडून गुजरातमधील बारडोली येथे ऊसतोडणी कामगार म्हणून कुटुंबाला स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नसायचा. स्थलांतरित आयुष्य कुटुंबाच्या वाट्याला आल्याने बेबाबाई यांच्यासह अन्य भावंडांनाही जावे लागत होते. परिणामी, बेबाबाई यांना शाळेची पायरीही चढता आली नाही. अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षीच कुटुंबासमवेत बेबाबाई यांनाही ऊसतोडणीसाठी जावे लागत होते.
आव्हानं पाचवीलाच पुजलेली
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या चुनीलाल गढरी यांची होणारी कसरत कुटुंबासमवेत बेबाबाई यांही डोळ्यांदेखत अनुभवत होत्या. कधी कधी कुटुंबावर उपाशीही राहण्याची वेळ येत होती. परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवत असते;
मात्र नक्कीच त्यातून मार्ग निघतोच, या विचारांतून आयुष्याकडे सकारात्मक बघत त्यांनी संयम सुटू दिला नाही. कुटुंबाचा भार हलका करण्यासाठी कुटुंबप्रमुख म्हणून वडिलांनी मुलांच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली. त्यातच बेबाबाई यांचाही विवाह पारोळा येथील संतोष गढरी यांच्याशी झाला. पती संतोष यांचेही शिक्षण जेमतेम. (latest marathi news)
सासरीही परिस्थिती ‘जैसे थे’
संतोष गढरी यांच्या एकत्र कुटुंबात आयुष्याची लढाई जणू पाचवीलाच पुजलेली होती. परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती. विवाहानंतरही बेबाबाई यांच्या नशिबी शेतावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पतीसोबत मजुरी करत असतानाच त्यांच्यातील धडपड मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
याच काळात पती संतोष यांनी दूध व्यवसायातून कुटुंबासाठी आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र यश गढरी कुटुंबापासून दूरच राहिले. कुटुंबाचा आधार होत असतानाच मुलगा रामकृष्ण व भारत यांच्यानिमित्ताने कुटुंबाची सदस्यसंख्या वाढली. मात्र परिस्थिती स्थिर होती.
बिऱ्हाड हलवले नाशिकला
दुष्काळी परिस्थिती, उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने बेबाबाई यांनी पती संतोष यांना नाशिकला जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबाने आपले बिऱ्हाड नाशिकच्या सातपूर भागातील शिवाजीनगर येथे हलविले. प्रारंभी झोपडीवजा घरात राहून पडेल ते काम करण्याचा जणू कुटुंबाने विडाच उचलला होता.
सातपूर एमआयडीसी जवळ असल्याने बेबाबाई याही कंपनीत हंगामी कामगार म्हणून तुटपुंज्या रोजंदारीवर कामाला जाऊ लागल्या. मात्र त्यातून मिळणारी कमाई पुरेशी नसल्याने दुपारी चारनंतर घरी बसून कोणतेही काम नव्हते, याची जाणीव बेबाबाई यांना झाली.
शिवाजीनगर येथील कामगार वसाहतीचा वाढणारा विस्तार लक्षात घेऊन येथील कार्बन नाका परिसरात भाजीपाला विक्री करण्याबाबत पती संतोष यांना विचार बोलून दाखविला. बेबाबाई यांना नेहमीच पाठबळ देणाऱ्या संतोष यांनी विलंब न करता बेबाबाई यांना परिसरातच भाजीपाला विक्रीचे दुकान थाटून दिले. (latest marathi news)
चाकरमान्यांच्या वस्तीने दिला आधार
राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या नागरिकांसाठी शिवाजीनगर परिसर जणू मोठा आधारच बनला आहे. येथील चाकरमान्यांच्या वस्तीत भाजीपाला विक्री करतानाच कुटुंबातील सदस्यांसाठी जणू यशाचा रस्ताच गवसला होता. भाजीपाला विक्रीतून मिळत असलेल्या कमाईमुळे त्यांनी कंपनीतील काम सोडले.
या भागातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दिनकर पाटील यांच्या सहकार्याने गढरी कुटुंबासह येथील विक्रीची दुकाने थाटलेल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्याने अल्पावधीतच या बाजाराने विक्रेत्यांसाठी मोठा आधार दिला.
भक्कमपणे उभे राहा...
कार्बन नाका परिसरात भाजीपाला विक्रीतून कुटुंबाला आधार देतानाच पतीनेही परिसरात हातगाडीवर भाजीपाला विक्री सुरू केली. परिस्थितीमुळे मुलांनाही शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. मात्र दोन्ही मुलांसाठी वाहने खरेदी करून देतानाच फळविक्रीतून कुटुंबाला उभे करण्यासाठी बेबाबाई यांनी भक्कम आधार दिलाय. आयुष्यात आलेली परिस्थिती नक्कीच बदलते, या सकारात्मक विचारांवर काम करताना महिलांनी खचून न जाता परिस्थितीला सामोरे जावे, नक्कीच आपलेही चांगले दिवस येतात, असा सल्लाही बेबाबाई द्यायला विसरल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.