शेतकरी कुटुंबात जन्माला आली, मात्र परिस्थिती नक्कीच बदलते, या विचारांवर लढत राहिली. पतीच्या आजारपणात कुटुंबाचा गाडा हाकतानाच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. पतीच्या निधनानंतर विपरीत परिस्थितीतून सावरताना मुलांना भक्कम आधार देतानाच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबाची सूत्रे हाती घेतली.
मेहनतीच्या जोरावर शेतमजूर म्हणून झालेली सुरुवात थेट आटा विक्रीचा ब्रँड उभा करून स्वतःची ओळख उभी केलेल्या नाशिकजवळच्या पळसे येथील अल्पशिक्षित पुष्पाताई आगळे यांचा उद्योजिका म्हणून झालेला प्रवास आदर्श ठरलाय..! (Inspirational Story of Pushpatai agle)
इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील माहेरवाशीण असलेल्या पुष्पा रमेश आगळे यांचे माहेर नाशिकजवळच्या पळसे येथील. वडील त्र्यंबक शिरसाठ यांचा पत्नी धोंड्याबाई यांच्यासह तीन मुलगे, तीन मुली असा मोठा परिवार होता. शेतीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नव्हते.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पुष्पाताई यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले. अभ्यासात हुशार असूनही गावात चौथीपर्यंतच शाळेची सुविधा असल्याने चौथीनंतर शाळा सुटली. लहानपणापासूनच जणू कुटुंबात शेतीकामाचे बाळकडू पुष्पाताईंना मिळाले होते. पुष्पाताई कुटुंबातील सर्वांत लहान सदस्या.
मात्र, कुटुंबातील सदस्यांबरोबर त्यांना शेतात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कुटुंबाची जबाबदारी कमी करतानाच वडिलांनी पुष्पाताई यांचा विवाह पळसे येथील रमेश आगळे यांच्याशी करून दिला. पती रमेश यांचेही शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंतच झाले. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबाचा घटक होताना विवाहानंतर आठवडाभरातच मजुरीसाठी वाट धरावी लागली.
कुटुंबातील सर्व सदस्य रोजच मजुरीसाठी परिसरातील शेतावर जायचा नित्यक्रमच आगळे कुटुंबाचा बनला होता. पती रमेश हे गावातीलच पीठगिरणीवर कारागीर म्हणून कामाला जात होते. मात्र, महिन्याला तुटपुंज्या २०० रुपये पगारावर कुटुंब चालविणे अवघड असल्याने पुष्पाताईंसह सर्वांनाच कामाला जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
कुटुंबाची रोजची होणारी ओढाताण पाहून मजुरीशिवाय काहीतरी करावे, म्हणून पुष्पाताईंची धडपड सुरू होती. मात्र, मार्ग सापडत नव्हता. याच काळात पुष्पाताईंच्या आगळे कुटुंबात मुलगा भास्कर, नानासाहेब, तसेच मुलगी दीपाली यांच्यानिमित्त सदस्य संख्या वाढली.
पुष्पाताईंनी काटकसर करीत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले. मात्र, याच काळात पतीच्या आजारपणाने डोके वर काढले. पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहून कुटुंबाचा गाडा त्या हाकत होत्या. परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही, या सकारात्मक विचारांतून त्यांनी रोजची वाटचाल सुरूच ठेवली. (latest marathi news)
कुटुंबाची सूत्रे घेतली स्वतःकडे
शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड असल्याने तसेच पळसे गावाचा वाढणारा विस्तार लक्षात घेऊन पुष्पाताई यांनी जुनी पिठाची गिरणी विकत घेतली. गिरणी घेण्यासाठी पैसे नसल्याने भावांसह पळसे गावातील माणुसकी जपणाऱ्या घटकांनी साथ देत कुटुंबासाठी आर्थिक पाठबळ देत पुष्पाताईंच्या धडपडीला साथ दिली.
गिरणी मालकीण म्हणून सुरुवात करताना पहिल्याच दिवशी शंभर रुपयांची कमाई केली आणि येथूनच पुष्पाताईंना यशाचा मार्ग गवसला. काही दिवसांतच पती रमेश यांच्या निधनाने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पुष्पाताई यांनी स्वतःकडे घेतली होती.
तोपर्यंत मुलांचा सांभाळ करतानाच भास्कर, नानासाहेब यांना व्यवसायात आणताना मुलगी दीपाली यांचाही विवाह झाला. धान्य दळून देण्याबरोबरच वाळवणाचे पदार्थ, मसाले दळून देण्याचीही यंत्रसामग्री खरेदी करीत या व्यवसायात स्वतःचा जम बसविला.
स्वतःचा बनविला ब्रँड
परिसरातील चाकरमाम्यांची गरज ओळखून धान्य दळून देण्याबरोबरच तयार आटा विक्रीला त्यांनी परिसरात सुरुवात केली. स्वतःच तयार केलेल्या आटाविक्रीला इच्छामणी आटा विक्री या नावाने ब्रँड तयार करताना नाशिक रोड परिसरात त्यांनी या निमित्ताने स्वतःची ओळख निर्माण केली.
भास्कर आणि नानासाहेब या दोन्ही मुलांकडे विक्री व्यवस्थेची जबाबदारी देतानाच दिवसाकाठी एक टन आटाविक्रीतून या व्यवसायाला भक्कमपणे पुढे नेले. शेतमजूर म्हणून जगण्याची धडपड करतानाच कुटुंबाची सूत्रे हाती घेत मुलांना भक्कमपणे व्यवसायाच्या निमित्ताने स्थिर केले. परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलते, हे शेतमजूर पुष्पाताई यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून उद्योजिका म्हणून ओळख उभी करीत खचून गेलेल्या महिलांपुढे आपला एक आदर्श ठेवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.