नाशिक : बालपणी आलेला ताप, अंधश्रद्धेमुळे गावठी उपायांमुळे वयाच्या दुसर्या वर्षीच डोळे गमावल्याने आलेले अंधत्व, पित्याचे हरपलेले छत्र अन् आईने काबाडकष्ट करीत वाढवलेल्या ‘पुंडलिक’ने शिक्षणाचा कास धरली. दहावी, बारावीवरच न थांबता एमएड अन् त्यानंतरही बँकेच्या स्पर्धा परीक्षा देणारा ‘पुंडलिक’ आज बँक ऑफ महाराष्ट्राचा शाखा व्यवस्थापक (मॅनेजर) आहे. एवढेच नव्हे तर, वारकरी संप्रदायाची गोडी असल्याने कीर्तन, प्रवचन करणारा ‘पुंडलिक’ यातून मिळणाऱ्या अर्थाजनातून दिव्यांगांसह गरजवंता विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जातो. (World Blind Day Pundalik successfully overcomes blindness)
पुंडलिक पिंपळके हे आहेत नाशिकमधील नेहरु गार्डन (सावानासमोरील) बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे मॅनेजर. वैष्णववाडी (गिरणारे) येथील शेतकरी कुटूंबात जन्माला आलेले पुंडलिक यांना दोन वर्षांचे असताना ताप आला. तापामुळे डोळे उघडेनात. अर्थातच गावात वैद्यकीय इलाज नसल्याने भोंदूगिरी, अंधश्रद्धाच अधिक. गावातल्यांनी सांगितल्याप्रमाणे आई-बापाने काहीतरी गावठी औषध डोळ्यात टाकले अन् त्यांना कायमचे अंधत्व आले.
जेव्हा त्यांना काहीच दिसेनासे झाले तेव्हा डॉक्टरला गाठले. तोपर्यंत उशिर झाला होता. याचदरम्यान पित्याचे छत्र हरपले. भावकीने त्रास दिल्याने आईने तिघा भावंडांसह नाशिक गाठले. डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर उघड्यावर जिणं सुरू झालं. त्यांची आई दिवसा गवंडी काम अन् सायंकाळी धुणीभांडीची काम करून तिघा लेकरांना उदरनिर्वाह करीत होती.
भोसला शाळेत गवंडी कामाला असताना पुंडलिकसाठी अंध शाळेत टाकण्यास सांगितले. आई निरक्षर असल्याने त्या शेळके नामक भल्या माणसानेच कागदपत्रे करून १९९३ मध्ये नाशिकरोडच्या अंधशाळेत प्रवेश झाला. दहावीला ७८ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या पुंडलिक यांनी मागे वळून पाहिले नाही. भोसला स्कुलमधून १२वी, एचटीपीतून पदवी, केटीएचएममधून बीएड करणारे पुंडलिक यांनी पुणे विद्यापीठातून ७६ टक्के मिळवून एमएड केले.
याच दरम्यान त्यांना बँकेच्या स्पर्धा परीक्षेची माहिती झाली. सुरुवातीला क्लार्कची परीक्षा देत ते उत्तीर्ण होऊन बँक ऑफ महाराष्ट्रात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी बँक अधिकाऱ्याची परीक्षा दिली असता ते सहायक व्यवस्थापक तर, बँकेंतर्गत परीक्षा दिल्याने आज ते शाखा व्यवस्थापक आहेत. अथक परिश्रम अन् अंधत्वावर यशस्वी मात करीत पुंडलिक यानी यशाला गवसणी घातली आहे.
टेलीफोन ऑपरेटर ते मॅनेजर
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुंडलिक यांनी मुक्त विद्यापीठात टेलीफोन ऑपरेटरचे काम केले. याच दरम्यान ते मकरंद हिंगणे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत होते. सचिन जोशी यांच्या इस्पॅलियर स्कुलमध्ये संगीत शिक्षक म्हणूनही काम केले. बीएड झाल्यानंतर त्यांनी अंधांसाठीच्या नॅबच्या बीएड कॉलेजमध्येही शिक्षक होते.
मदतीचा हात लाभला
अंध मुलांसाठीही शाळा असते, हे त्यांना भोसला स्कुलमधील शेळके यांच्याकडून समजले. त्यामुळे शिक्षणाला सुरवात झाली. भोसला स्कुलमध्ये ११वीला प्रवेश तर घेतला पण फी भरण्याइतकी परिस्थिती नव्हती. शाळेतील शिक्षिका मंजुषा उपासनी यांनी पुंडलिकांच्या आईला बोलावले.
त्यांनी गळ्यातील दागिने विकून पैसे आणल्याचे समजल्यावर श्रीमती उपासनी यांनी त्यांच्या शाळेचा खर्च उचलला. एचपीटीत पदवीचे शिक्षण घेत असताना प्रा. प्रशांत देशपांडे यांनी पुंडलिक यांचा एमएडपर्यंतचा सारा खर्च उचलला. पुण्यात शिक्षण घेताना खर्च जास्त येऊ नये म्हणून पुंडलिक हे फक्त रात्रीचेच जेवण करायचे.
कीर्तन, प्रवचनाची गोडी
शाळेत असताना स्वाध्याय परिवारातील शारदा गायकवाड बालसंस्कार वर्ग घेण्यासाठी यायच्या. पुंडलिक यांना त्याची गोडी लागली. भगवतगीतेचे अर्धेअधिक श्लोक त्यांचे मुखोदगत आहेत. रिकाम्या वेळात ते असेच कीर्तनकारासारखे बोलत. आजोळी गाळोशी (धोंडेगाव) येथे त्यांना पहिल्यांदा कीर्तनाची संधी मिळाली.
त्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि ते कीर्तन, प्रवचन करू लागले. बँकेचा व्याप सांभाळून आजही ते वर्षाभरात किमान ७० कीर्तन-प्रवचन करतात. त्यातून मिळणारे अर्थाजन मात्र ते दिव्यांग वा गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.