नाशिककरांचा जाहीरनामा विकासाला दिशा देणारा

भाजपच्या शिष्टमंडळाकडून कौतुक; अपेक्षापूर्तीचे आश्‍वासन
नाशिककरांचा जाहीरनामा विकासाला दिशा देणारा
नाशिककरांचा जाहीरनामा विकासाला दिशा देणाराsakal
Updated on

नाशिक : शहर विकासासाठी नागरिकांनी मूलभूत सोयी-सुविधासंदर्भात केलेल्या अपेक्षांची अधिकाधिक पूर्तता करण्याचा प्रयत्न सत्ताधारी या नात्याने भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्याव्यतिरिक्त विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या मदतीने विविध पायाभूत प्रकल्प नाशिककरांना दिले. भविष्यातही जाहीरनाम्यातून नाशिककरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. ११) दिले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सहा विभागांमध्ये मोहीम राबविली. मोहिमेअंतर्गत महिला व युवकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा नाशिककरांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या. महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या शिष्टमंडळाला नागरिकांच्या अपेक्षांचा अहवाल सादर करण्यात आला. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी भूमिका विशद केली. महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, महापालिकेचे सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, नगरसेवक मुकेश शहाणे आदी या वेळी उपस्थित होते.

नाशिककरांचा जाहीरनामा विकासाला दिशा देणारा
Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

काय हवयं नाशिककरांना?

  • किमान दोन तास व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा

  • नवीन नगरांमध्ये पाणीपुरवठ्याची सोय

  • शहरात सर्वत्र दोन इंची नळजोडणी हवी

  • जलकुंभांची निर्मिती व्हावी

  • रात्रपाळीची स्वच्छता

  • सार्वजनिक ठिकाणी १२ तास स्वच्छता

  • मोकळे भूखंड स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

  • प्लॅस्टिक वापरावर बंदी

  • महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण

  • महापालिकेचे व्यावसायिक संकुल महिला बचतगटांसाठी

  • मुख्य बाजारपेठेते महिलांसाठी आरक्षित जागा

  • बिले वाटपासाठी महिलांची नियुक्ती

  • दर दोन किलोमीटरवर स्वच्छतागृहे

  • महिला बचतगट किंवा महिलांच्या माध्यमातून स्वच्छतागृहे चालवावी

  • महिलांच्या सर्व आजारांच्या उपचारासाठी शहरात एक स्वतंत्र रुग्णालय

  • प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुधारावी

  • महापालिकेमार्फत सीबीएसई पॅटर्नच्या शाळा

  • शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

  • सोसायट्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक

  • शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण हटवावीत

  • प्रभागनिहाय भाजीमंडई

  • नवनगरांमध्ये ड्रेनेज पाइपलाइन

  • मनपाच्या संकुलामधील गाळे आयटी उद्योगांसाठी द्यावेत

  • विभागनिहाय क्रीडांगणे

  • शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे

  • अहिल्यादेवी होळकर पूल ते सोमेश्वरदरम्यान बोट प्रवास

  • तपोवन, सोमेश्वर, मुक्तिधाम, पांडवलेणीत मनोरंजन केंद्र

  • पर्यटन माहिती केंद्रनिर्मिती

  • पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र बस

  • स्पर्धा परीक्षांसाठी प्रभागनिहाय केंद्र

  • वाचनसंस्कृती वाढीसाठी विभागनिहाय वाचनालय

  • डिजिटल लायब्ररी, तसेच फिरते वाचनालय

  • सर्व महापुरुषांचे पुतळे असलेले एकच पुतळा उद्यान

  • अंतर्गत व बाह्य रिंगरोड विकसित करावेत

  • टायर बेस्ट मेट्रोच्या स्थानकांजवळ व्यापारी संकुल

  • ट्रक टर्मिनस विकसित करावे अवजड वाहनांना शहरात रात्री प्रवेश

  • सिग्नलवरील भिकाऱ्यांचा बंदोबस्त, निवारागृहात स्थलांतरण

  • दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

  • गंगाघाटावर खुले चित्रपटगृह ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

  • तंबाखू, सिगारेट, मद्यनशा मुक्ती केंद्राची स्थापना

"बीओटीवर जागा विकसित करणार असल्याने त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल. इमारतींच्या फ्लॅट संख्येनुसार नळजोडणीचा आकार ठरविण्याच्या सूचना नगररचना विभागाला देऊ. महापालिका आयटी पार्कसाठी प्रयत्नशील आहे. विकासाचे उद्दिष्ट साध्य करताना नागरिकांची अपेक्षापूर्ती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे."

- सतीश कुलकर्णी, महापौर

"शहर स्वच्छतेसाठी यांत्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या गाळ्यांचे भाडे कमी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गावर आडगाव येथील १४ एकर जागेत एक्झिबिशन सेंटर, तर ६३ एकर जागेत लॉजिस्टीक पार्क उभारले जाणार आहे."

-गणेश गिते, सभापती, स्थायी समिती

"महापालिकेने सहा कोटी रुपये खर्च करून ई-टॉयलेट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. उभारलेले मार्केट बचतगटांना देण्यासाठी धोरण ठरविले जाणार आहे. रिंगरोड विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्याचे आश्‍वासन मिळाले आहे. मिसिंग लिंक रोड रिंगरोडला जोडले जातील."

- हिमगौरी आहेर-आडके, शहराध्यक्ष, महिला आघाडी, भाजप

"केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक घेऊन उद्योगनिर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्प शहरात येत असून, त्या माध्यमातून शहर विकासाला योग्य दिशा मिळेल. ‘सब का साथ सबका विकास’, हे भाजपचे धोरण आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत कामे झाली. यापुढेही सुरू राहतील."

-गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप

"नमामि गोदा प्रकल्पात गोदावरीकाठी मनोरंजन पार्क उभारले जाणार आहे. पर्यटनासाठी दादासाहेब फाळके स्मारक विकसित केले जाणार आहे. सिडको व सातपूर भागात महापालिकेतर्फे रुग्णालये उभारली जाणार आहे. शहरात ९७ हजार एलईडी बसविले आहेत. येत्या काळातही विकासकामे गतीने सुरू राहतील."

-प्रशांत जाधव, शहर सरचिटणीस, भाजप

"शहरात महापुरुषांच्या पुतळ्यासाठी एकच उद्यान असावे, ही कल्पना अतिशय चांगली आहे. सिडकोत १७ एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या पेलिकन पार्कमधील जागेत महापुरुषांच्या पुतळ्यासाठी उद्यान उभारण्याचा प्रस्ताव आहे."

-मुकेश शहाणे, नगरसेवक, भाजप

"शहरात अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवशक्यता आहे, हे खरे असले तरी कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार हिरावल्याने छोटे व्यवसाय करून पोट भरत आहेत. त्यासाठी महापालिकेकडून विशेष उपाययोजना करू."

-कमलेश बोडके, सभागृहनेता, महापालिका

"विकासकामे करताना महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता आहे. खर्च करताना उत्पन्नाची बाजू ग्राह्य धरावी लागते. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातील."

-अरुण पवार, गटनेते, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.