Engineers Day : अभियंत्याचे दैवत भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या

Dr. Mokshagundam Visvesvaraya
Dr. Mokshagundam Visvesvarayaesakal
Updated on

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० ला म्हैसूर राज्यात (आताचे कर्नाटक राज्य) कोलार जिल्ह्यातील चिकबल्लापूर तालुक्यातील मुदेनहल्लीगावात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री संस्कृतचे पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते. त्यांच्या आईचे नाव व्यंकम्मा. सर विश्र्वेश्र्वरय्या १५ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले.

विश्र्वेश्र्वरय्या यांनी प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर येथे पूर्ण केले. यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील सेंट्रल महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले. मद्रास विद्यापीठातून १८८१ मध्ये बी.ए. पास केल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत, कॉलेज ऑफ सायन्स आताचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथून १८८३ मध्ये प्रथम श्रेणीत एलसीई आणि एफसीई परीक्षा उत्तीर्ण केल्या. या परीक्षा आताच्या बी.ई. परीक्षेच्या समकक्ष आहेत. (national Engineers Day God of Engineers Bharat Ratna Dr Mokshagundam Vishreveshwaraya Nashik Latest Marathi news)

सर मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या यांचे स्थापत्य अभियांत्रिकीतील शिक्षण पूर्ण होताच ब्रिटिश सरकारच्या मुंबई इलाख्यात सहाय्यक अभियंता या पदावर रुजू करून घेतले. त्यांची पहिली नेमणूक नाशिक, धुळे परिसरात झाली. स्थापत्य अभियांत्रिकीतील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ मध्ये शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

खडकवासला येथील धरणात संशोधन करून स्वयंचलित शीर्षद्वारे बसविण्यात आली. १९०६ मध्ये एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची सहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. १९०८ मध्ये सर विश्र्वेश्र्वरय्या सरकारी नोकरीतून निवृत्त झाले.

म्हैसूर राज्याचे महाराज श्री कृष्णराजेंद्र वाडियार यांच्या विनंतीनुसार सर विश्र्वेश्र्वरय्या यांनी म्हैसूर राज्यासाठी काम करण्याची तयारी दाखविली व ते म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंतापदावर रुजू झाले. त्यांनी म्हैसूर राज्यात सर्वांसाठी अनिवार्य शिक्षण लागू केले.

१९१२ मध्ये ते म्हैसूर राज्याचे दिवाण झाले. तिथे त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यक्षेमतेने काम करण्याचे व प्रशासकीय कामात सुधारणा करण्याचे आवाहन केले. उशिरा व अनियमितपणे कामावर येण्यावर कठोर पद्धतींचा वापर करून त्यांनी पायबंद घातला. कार्यालयातील फायली वेगाने हालण्यावर त्यांचा विशेष जोर होता.

फायलींचा निपटारा कसा करावा याबद्दल त्यांनी कार्यपद्धती आखून दिली. प्राधान्यतेप्रमाणे फायलींची विभागणी करणे, फायलींमधल्या कागदपत्रांची रचना त्यांच्या महत्त्वाप्रमाणे करणे, महत्त्वाच्या कागदांना फ्लॅग लावणे या नवीन पद्धतींची त्यांनी आपल्या कार्यालयात सुरवात केली. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे व त्यांचे कामाचे मूल्याकंन करणे या पद्धती त्यांनी अमलात आणल्या.

कर्मचाऱ्यांच्या भरतीबद्दलचे संस्थानचे नियम संदिग्ध होते. त्यामुळे भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व वशिलेबाजीला वाव होता. सर विश्र्वेश्र्वरय्या यांनी भरती नियमांमध्ये सुधारणा केल्या. त्यामुळे भरतीमधील अनियमितता संपुष्टात आली. न्यायदानाचे व अंमलबजावणी करण्याच्या अधिकारांचे त्यांनी विलगीकरण केले.

संस्थानमधील सर्व भागात कामकाज योग्य पद्धतीने चालते किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांनी दौरे करण्यास सुरवात केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी कार्यालयातील पत्रव्यवहारांचे योग्य पद्धतीने जतन होते की नाही, कार्यालय व कार्यालयीन परिसराची स्वच्छता, प्रत्येक कामाची प्रगती याचा ते बारकाईने अभ्यास करीत.

Dr. Mokshagundam Visvesvaraya
भगवती मूर्ती संवर्धन कामाची 8 वर्षांनी परिपूर्ती; निघाला 1800 किलो शेंदूर

१९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग, कृषी आदी सर्व क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी स्वरूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन, कन्नड साहित्य अकादमी, रेशीम उत्पादन, चंदन तेल, म्हैसूर सँडल साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट कारखाने, साखर कारखाने, लघुउद्योग, हॉटेल, उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली.

म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. सेवाभरती शर्ती मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्य त्यांनी केले. मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्न केले. सिंध विभाग (सध्या पाकिस्तान) येथील पाणीपुरवठा हा एक डोकेदुखीचा प्रश्न झाला होता. अनेक ब्रिटिश अभियंत्यांना तो सोडविता आला नाही.

तिथे येणारे पाणी हे कायमस्वरूपी गढूळ असायचे. फिल्टरेशन प्लॅन्ट बसविणे शक्य होते पण ते तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला परवडणारे नव्हते. सर विश्र्वेश्र्वरय्या यांची तेथे तज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली. त्या काळात सिंध हा मुंबई राज्याचाच एक भाग होता. पाण्यातील गाळ बाजूला करण्यासाठी पाणी गाळले जाणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी नदीपात्रातच एक विहीर घेतली. नदीपात्रात असलेल्या वाळूचा वापर करून पाणी आपोआप गाळून विहिरीत आणण्याची योजना होती.

त्यानंतर हे पाणी कलेक्शन वेलमध्ये जमा करून शहरात वितरणासाठी पाठविणे शक्य होणार होते. त्या गाळून पाणी जमा करणाऱ्या विहिरीला त्यांनी ‘पर्कोलेशन वेल’ असे नाव दिले. आजदेखील ही पद्धत रूढ असल्यासारखी वापरली जाते. त्या पर्कोलेशन विहिरीला ‘जॅकवेल’ असे नाव रूढ झाले आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब दिला.

मुंबई, कोलकता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी.लिट. देऊन गौरविले. १९५५ मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरविले. त्यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. देशातील अनेक संस्थांना विश्र्वेश्र्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. कर्नाटक सरकाने बंगलोर येथे ‘सर विश्र्वेश्र्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे.

हे म्युझियम भारतातले सर्वांत मोठे सायन्य म्युझियम आहे. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत १९९८ पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्न सर विश्र्वेश्र्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र्र शासनाने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरवात केली आहे.

सर विश्र्वेश्र्वरय्या यांच्या जन्मगावी असलेल्या घराचा १९७१ मध्ये राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातल्या वस्तुसंग्रहालयात विश्र्वेश्र्वरय्या यांच्या वापरातील वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भरतरत्न गौरवपदक ठेवण्यात आले आहे.

इंजि. संदीप पांडागळे, सहाय्यक अभियंता श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम विभाग

इंजि. हरिभाऊ गिते, अध्यक्ष, सरळसेवा वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य

Dr. Mokshagundam Visvesvaraya
Sahyadri Farmsमध्ये 310 कोटींची परकीय गुंतवणूक; देशातील पहिली वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()