नरकोळ : पुरातन काळापासून सुरू असलेली नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खानदेशसह कसमादे पट्ट्यात उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी घराघरांतून ‘अग्या हो विसरग्या हो’ हा गजर ऐकायला मिळाला. नवरात्रीतील तिसऱ्या, पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला ही पूजा गावोगाव केली जाते. (Navratri Kasmade Chakra Puja worship of deitys arrival adoration devotion and power nashik)
नवरात्रात देवीची पूजा मांडून चक्रपूजा करण्याची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर दर तिसऱ्या वर्षी प्रथा पडलेल्या कुटुंबांकडून चक्रपूजा करण्यात येते. चक्रपूजा म्हणजे कुलदेवतेचे आगमन, आराधना, भक्ती व शक्तीची उपासना असल्याचे मानले जाते.
चक्रपूजेसाठी पाच अथवा अकरा ओंजळ तांदूळ (त्यास मोती म्हणतात), अकरा कणकेचे दिवे, पेरू, सीताफळ, आंबे, चाफा, रामफळ, कापूर, उडीद, गुलाल, समीधा, पाच नारळ या साहित्यांबरोबरच अकरा पुरणपोळ्या (मांडे), पुऱ्या, करंजा आदी साहित्य लागते.
चक्रपूजा ही घटस्थापनेच्या ठिकाणी केली जाते. गोमूत्र टाकून जागा सारवली जाऊन शुद्ध करण्यात येते. त्यावर रांगोळी काढली जाते. या जागेवर चाफ्याची पाने ठेवून कापूर प्रज्वलित केला जातो.
तांदळाच्या राशीचे सात चक्र गोलाकार बनविण्यात येतात. या नळ्यामध्ये एक चक्र पांढरे, तर दुसरे चक्र रंगीत तांदळाचे, अशी सात चक्र कुटुंबप्रमुखाकडून काढण्यात येतात. या पूजेसाठी पाच व्यक्ती समोरासमोर बसतात. चक्राच्या चारही दिशेला दरवाजे तयार केले जातात.
या दरवाजांजवळ तांदूळ, राख, मीठ, उडीद यांचे चार मारुती तयार केले जातात. अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवले जातात. एक प्रमुख दिवा तयार करण्यात येतो. त्यास मेंढ्या म्हणून संबोधण्यात येते.
चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवण्यात येतात. घरात तेवत असलेल्या अखंड वातेवरून दिवे पेटवले जातात.
या ठिकाणी पूजा साहित्य अर्पण करून चक्रपूजा विधी होतो. नंतर देवीची आरती होऊन प्रसाद ग्रहण केला जातो. बाजूला होम पेटवून विधिवत पूजा होऊन नवसपूर्ती करण्यात येते.
"चक्रपूजेमुळे वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धी याबरोबरच माता लक्ष्मी प्रसन्न होते. निसर्गाचे चक्र सुरळीत चालावे, या उद्देशाने ही पूजा केली जाते."
-संजय देवरे, प्रगतिशील शेतकरी, सारदे (ता. बागलाण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.