श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून, या शक्तिपीठांपैकीच कोटमगाव येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्मस्वरूपिणी ओंकार स्वरूपात अधिष्ठित असलेली श्री जगदंबा माता होय. वणी (सप्तशृंगी), माहूर (रेणुकादेवी) व तुळजापूर (तुळजाभवानी) या तीन क्षेत्रांचे उगमस्थान कोटमगावची जगदंबा माता.
जगदंबेच्या स्थापनेचा काळ निश्चित नसला, तरी शहर वसण्याच्या शेकडो वर्षे अगोदरचे हे जागृत देवस्थान. मातेचे अतिशय प्रशस्त असे मंदिर असून, मंदिराचा कळस लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतो. नवरात्रोत्सवात येथे नऊ दिवस भव्य यात्रा भरते; तर राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे भाविकांची घटी बसण्याची परंपरा वर्षानुवर्षे टिकून आहे. (navratri special article Jagdamba Mata of Kotamgaon in 3 forms nashik )
शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले भाविकांचे श्रद्धास्थान अतिशय जागृत व जाज्वल्य म्हणून परिचित देवस्थान आहे. येथे मातेची अतिप्रसन्न तेजस्वी स्वयंभू तीन फूट उंचीची शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. श्री महाकाली, श्री महलक्ष्मी व श्री महासरस्वती हे तिन्ही रूप एकाच ठिकाणी पाहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्त्व आहे.
दिव्यांगांना आधार देणारी, दुर्बलांना सबळ करणारी अन निशस्त्रकाला शक्ती देणारी माता अशी ओळख असून, हे देवस्थान जगदंबा मातेचे स्वयंभू अधिष्ठान असल्याने लाखो भाविक मातेपुढे ‘उदे गं अंबे उदे, आई उदे गं अंबे उदे’चा जयजयकार करीत नतमस्तक होतात. नवसाला पावणारी माता अशी या देवस्थानाची ख्याती असल्याने घटी बसण्याची अतिशय जुनी व तुलनेने सर्वाधिक अशी परंपरा देसून येते. अडीच-तीन हजार भाविक घटी बसतात.
देवस्थानाला ४०० वर्षांचा इतिहास
जगदंबेच्या स्थापनेचा काळ निश्चित नसला, तरी शहर वसण्याच्या शेकडो वर्षे अगोदरचे हे जागृत देवस्थान असून, ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास सांगितला जातो. नारंदी नदीतीरी वसलेले अतिशय निसर्गरम्य असे पवित्र स्थान. नाशिक, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या सीमारेषेनजीकचे देवस्थान असल्याने येथे भक्तांची नेहमीच वर्दळ दिसून येते.
मातेचे अतिशय प्रशस्त असे मंदिर असून, मंदिराचा कळस लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराच्या समोरच भव्य सभागृह, भक्त निवास असून, नेत्रदीपक दीपमाळ आहे. तसेच, बाहेरील बाजूला असलेले दोन भव्य महाद्वार देवस्थानाच्या वैभवात भर घालतात.
नवरात्रोत्सवात यात्राकाळात मातेला नवनवीन प्रकारच्या पैठणी साड्या परिधान केल्या जाऊन सोन्या-चांदीचे अलंकार चढविले जातात. पुष्पमालांची सजावट केली जाते. मातेचा नैवेद्य चांदीच्या ताटात व चंदनाच्या पाटावर अशा शाही थाटात दाखविला जातो.
मातेचे तेजस्वी व मोहक रूप पाहून भक्तगण भारावून जातात. यात्राकाळात मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात येऊन मंदिराची शोभा वाढविली जाते. नऊ दिवस सकाळ व सायंकाळ महाआरती करण्यात येऊन दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नऊ दिवस भव्य यात्रा
येथील यात्रा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, येथे विविध प्रकारच्या खेळण्यांच्या दुकानांबरोबरच मिठाईची दुकाने तसेच प्रसादाची दुकाने दिसतात. पाळणे व अन्य दुकाने यात्रेच्या आकर्षणात भर घालतात. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी मोफत ने-आण करण्याची विविध संस्थांकडून व्यवस्था केली जाते. येवला-कोटमगाव हा तीन किलोमीटर रस्ता यात्रा काळात भाविकांनी दुतर्फा भरून वाहत असतो.
यात्रा काळात हजारो भाविक नऊ दिवस श्रद्धेनुसार शंकरपाळे, खारका यांची देवीसमोर उधळण करतात. हा प्रसाद म्हणून झेलणाऱ्यांचीही या वेळी झुंबड उडते. माता संपूर्ण विश्वाची जननी असल्याने आबालवृद्धांपासून तसेच गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वधर्मीय मनोभावे प्रार्थना करतात व आशीर्वाद घेतात.
(शब्दांकन : संतोष विंचू, येवला)
अशी आहे आख्यायिका...
कोटमगाव येथील देवीची एक आख्यायिका आहे. ती अशी ः महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालिंधर हा सती वृंदाच्या प्रभावाने त्रिलोकी विजयी झाला. त्याला अपयश माहीत नव्हते. सती वृंदाच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने सामांध होऊन देवलोकावर स्वारी केली. त्यामुळे सर्व देवांनी श्री विष्णूंचा धावा केला.
श्री विष्णूंनी जालिंधराच्या यशाचे सामर्थ्य सती वृंदेचे सतीत्व असल्याचे ओळखले व सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री भगवान विष्णूंनी जालिंधराचे रूप धारण केले व सतीचे शील हरण केले. शील हरण झाल्याबरोबर दैत्यराज जालिंधर पराभूत झाला व त्याचा मृत्यू झाला. जालिंधराचा मृत्यू झाल्याबरोबर सतीने श्री विष्णूंना ओळखले व तुम्ही शालिग्राम होऊन पडाल, असा शाप दिला. शापाने श्री विष्णू शालिग्राम होऊन कोटमगावी पडले.
श्री विष्णूंचा शोध करीत देवी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या. तेथे श्री विष्णू नसल्याने दोघी परत श्री महाकालीकडे गेल्या, तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही शोधावयास निघाल्या आणि शोधता-शोधता तिघींना श्री विष्णू कोटमगावी शालिग्राम रूपात दिसले. त्यांनी सती वृंदेचा उद्धार करून श्री विष्णूंना शापमुक्त केले आणि तिघी या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज, तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रूपात वास करू लागल्या व मग या त्रिगुणात्मक गुप्तरूपात एका नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून अवतीर्ण झाल्या, असे हे जगदंबा मातेचे स्थान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.