Nashik Renuka Mata : महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजराजेश्वरी रेणुकामाता

navratri special article on Renuka Mata nashik
navratri special article on Renuka Mata nashikesakal
Updated on

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुकामातेचे प्राचीन, जागृत व प्रसिद्ध देवस्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवडला स्वयंभू विराजमान झाले आहे. श्री रेणुका मातेचे हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्गरम्य परिसरातील टेकडीच्या गुहेत वसलेले आहे. शारदीय नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची प्रचंड गर्दी असते.

देवीचे धड माहूर, तर शीर चांदवड येथे

चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई-आग्रा महामार्गाशेजारील सह्याद्री पर्वतांच्या डोंगररांगेत श्री रेणुकामाता स्वयंभू विराजमान झाली आहे. हे देवस्थान साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून ओळखले जाते. श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वत:च्या आईचे शीर धडावेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते. (navratri special article on Renuka Mata nashik)

त्या वेळी देवीच्या धडाचा भाग माहूर (ता. किनवट, जि. नांदेड) येथे असून, शीर चांदवड येथे आहे. त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध असलेली जगद्‍जननी, चांदवड निवासिनी राजराजेश्वरी, कुलस्वामिनी श्री रेणुकामाता म्हणून ओळखले जाते.

नवरात्रोत्सवात १० दिवसांचा यात्रोत्सव

या ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेले सर्व नवस, आराधना माता पूर्ण करते, या भावनेने संपूर्ण राज्यातून व देशातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात. पूर्ण झालेले नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवात १० दिवस व चैत्र पौर्णिमेला एक दिवस या ठिकाणी भव्य यात्रोत्सव साजरा केला जातो.

या नवरात्रोत्सव काळात हजारो स्त्री-पुरुष मोठ्या श्रद्धेने मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात घटी बसतात. नवरात्रात दुर्गाष्टमीला नवचंडी होमहवन होत असतो. या उत्सव काळात श्री रेणुका मातेच्या शृंगाराची सकाळ व सायंकाळच्या वेळी संपूर्ण गावातून विधीवत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येते. तसेच, दर महिन्यास असलेल्या पौर्णिमेला पालखी मिरवणूक काढण्यात येते.

१७३५ ते १७९५ कालावधीत मंदिराचा जीर्णोद्धार

ब्रिटिशकालीन सरकारच्या ताब्यात असलेल्या या पुरातनकालीन मंदिराचा जीर्णोधार पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी सन १७३५ ते १७९५ या कालावधीत केला आहे. या मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभामंडप, तीर्थ तलाव आदींचे बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर या त्या वेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुकामातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करीत असत.

navratri special article on Renuka Mata nashik
Jalgaon Manudevi Mandir : हेमाडपंथी शैलीतील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर; राजा ईश्वरसेन काळात बांधणीचा उल्लेख

हीच प्रथा अहिल्यादेवींनंतर होळकर घराण्याकडून होत आहे. सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालमार्फत दर पौर्णिमेस व नवरात्रोत्सवात दहा दिवस पालखी काढण्यात येते. तसेच, अहिल्याबाई होळकर यांनी लाकडी कोरीव कामात अप्रतिम असा ऐतिहासिक रंगमहाल या वास्तूचे बांधकाम केले आहे. या रंगमहालाला पुरातन रूप देण्यासाठी पुरातत्त्व विभागामार्फत काम सुरू आहे. मात्र, हे काम पाच ते सहा वर्षांपासून बंद असल्याने रंगमहालाचे मोठे नुकसान झाले. रंगमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे.

पौर्णिमेला पालखीची परंपरा

दरवर्षी नवरात्रोत्सव काळात श्री रेणुकामातेची भव्य अशी यात्रा भरत असल्याने येथे हजारो भाविक भक्त आपल्या आराध्यदैवताच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. मंदिराच्या उजव्या बाजूला रासलिंग इंद्रायणी किल्ला, तर डाव्या बाजूला भगवान शिवशंकराचे चंद्रेश्वर मंदिर आहे. दर पौर्णिमेस रेणुकादेवीची पालखी सकाळी अहिल्यादेवींच्या रंगमहालातून देवीच्या मंदिरात, तर सायंकाळी मंदिरातून रंगमहालात जाते.

या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुवासिनी आपापल्या घरापुढे मनोभावे पालखीची पूजा करतात. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. चैत्र पौर्णिमेला एक दिवस व अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दहा दिवस यात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

या उत्सव काळात भाविक आपले नवस नारळ, हळदी-कुंकू वाहून व जावळ काढून फेडतात. यात्रेच्या काळात फुलांच्या माळा, हार, नारळ यांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावून त्यांची विक्री केली जाते. या यात्रोत्सव काळात पहाटे चारपासून देवीचा महाभिषेक केला जातो. या वेळी नामवंत कीर्तन प्रवचनकरांचा लाभ भाविकांना होत असतो.

navratri special article on Renuka Mata nashik
Jagdamba Mata : सप्तशृंगीमातेची थोरली बहीण जगदंबा माता

भाविकांसाठी सोयी-सुविधा

या जागृत स्वयंभू पुरातनकालीन श्री रेणुकादेवी मंदिराचा कारभार अनेक वर्षांपासून अहिल्यादेवी होळकर सरकारकडे होता. सध्या मंदिराचा संपूर्ण कारभार ट्रस्टकडे असल्याने मंदिराचा परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. या ट्रस्टमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधी असल्याने यावर भारत सरकारचे नियंत्रण आहे. या मंदिराची देखभाल करण्याचे कामकाज ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार पाहत आहेत.

ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार यांनी व्यवस्थापनाच्या कारकीर्दीत मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. त्यात पिण्याचे पाणी, विजेचे मोठे दिवे, भाविकांना घटी बसण्यासाठी निवासगृह, दर्शनासाठी बॅरिकेड्‍स, विजेचे जनरेटर, बॅटरी इन्व्हर्टर, पाण्यासाठी स्वतंत्र कूपनलिका, विवाह समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मोठी जागा, स्वयंपाकाची भाडी, विजेची घंटा, क्लोज सर्किट, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

तसेच, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या निधीतून यात्रा स्थळ विकास निधीतून भक्त निवास, विश्रामगृह, स्त्रियांसाठी प्रसाधनगृह, शिर्डीच्या धर्तीवर रांगा लावण्यासाठी स्टीलचे बॅरिकेड्‍स, वाहनतळ, संपूर्ण मंदिर परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आल्याने परिसराला एक वेगळी झळाळी मिळाली आहे.

देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा

चांदवडच्या श्री रेणुकामाता मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भाविक श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. या मंदिराची देखभाल व्यवस्थापक मधुकर पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, विलास पवार, विजय जोशी, अमोल कुलकर्णी, हरेंद्र वैद्य, तानाजी आहेर, नारायण कुमावत, हरिभाऊ कासव आदी करीत आहेत.

navratri special article on Renuka Mata nashik
Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगड...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.